माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 d ago
सीताराम येचुरी
सीताराम येचुरी

 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. अखेर रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली, ते ७२ वर्षांचे होते. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १९ ऑगस्टपासून दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सुत्रांनी येचुरी यांचं उपचारांदरम्यान निधन झाल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे. पीटीआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.

कोण आहेत सिताराम येचुरी?
सीताराम येचुरी यांचा तमिळ ब्राह्मण कुटुंबातून जन्म झाला. १९७४ मध्ये स्टुडेंट्स फेडरेशन ऑफ इंडियामध्ये (एसएफआय) सहभागी झाले होते. एका वर्षानंतर ते भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (मार्क्सवादी) सदस्य झाले होते. दिल्लीतील प्रसिद्ध जवाहरलाल नेहरु विद्यापीठात अर्थात जेएनयूत शिकत असताना त्यांची राजकीय जडण घडण झाली. इथं डाव्या विचारसरणीचा प्रसार करण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

सिताराम येचुरी यांनी अर्थशास्त्रात मास्टर्स केली आहे. आणीबाणीच्या काळात त्यांना अटक करण्यात आली होती, त्यामुळं त्यांची पीएचडी पूर्ण होऊ शकली नव्हती. कोरोनाच्या काळात विषाणूची लागण झाल्यामुळं त्यांच्या मोठ्या मुलाचा (वय ३५) मृत्यू झाला होता.

सिताराम येचुरी हे नव्वदच्या दशकामध्ये आघाडीच्या राजकारणाचा प्रमुख चेहरा होते. १९९६ मध्ये संयुक्त आघाडी सरकारच्या काळात पी. चिदंबरम यांच्यासोबत येचुरी यांनी कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवण्याचं काम केलं होतं. त्यानंतर २००४ मध्ये त्यांनी युपीए सरकारच्या निर्मितीत देखील महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांना प्रो काँग्रेस म्हणूननही संबोधलं जायचं. कारण त्यांनी अणुकराराला पाठींबा दिला होता. जेएनयूचा विद्यार्थी ते मार्क्सवादी नेता बनण्यापर्यंत तसंच सीपीएम पक्षाचे प्रमुख म्हणून काम करताना त्यांनी ५० वर्षे राजकारणात घालवली.
 
२००५ मध्ये सिताराम येचुरी हे पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर खासदार झाले. १८ ऑगस्ट २०१७ पर्यंत ते खासदार होते. त्यांना संसदपटू म्हणून देखील पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी संसदेत अनेक जनहिताचे मुद्दे उपस्थित केले. येचुरी हे सामाजिक कार्यकर्ते, लेखक, पत्रकार, अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांनी काही पुस्तके लिहिली आहेत.

येचुरींचं पार्थीव रुग्णालयाला दान
सीताराम येचुरी यांच्या निधनानंतर एम्सनं एक निवेदन जाहीर केलं आहे. यामध्ये म्हटलं की, ७२ वर्षीय सीताराम येचुरी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचं पार्थीव शरीर मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि संशोधनाच्या उद्देशानं दिल्लीच्या एम्सला दान करण्यात आली आहे.