ब्रिटनमध्ये आजपासून एका नव्या युगाची सुरुवात होत आहे. आज राजा चार्ल्सचा राज्याभिषेक होणार आहे. ब्रिटनमध्ये गेल्या ७० वर्षांतील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाबाबत नागरिकांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. राजे चार्ल्स तिसरे हे आज (ता.६) राज्याभिषेकानंतर ब्रिटनचे अधिकृत राजे जगभरात ओळखले जाणार आहेत. चार्ल्स यांचा राज्याभिषेक स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी साडेचार) होणार आहे.
राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे ८ सप्टेंबरला २०२२ रोजी निधन झाले. त्यानंतर ब्रिटिश उत्तराधिकार कायद्यांनुसार कोणत्याही समारंभानुसार राजघराण्याचे सिंहासन त्यांचे पुत्र चार्ल्स यांच्याकडे आले आहे. ब्रिटिश कायद्यानुसार आधीचा राजा किंवा राणीच्या मृत्यूनंतर त्यांचा उत्तराधिकारी लगेचच राजा किंवा राणी बनतात. देशाला राजा किंवा राणी नाही, असे कधीही होत नाही. त्यामुळे राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूच्या दोन दिवसांनंतर राज्याभिषेकाची अधिकृत प्रक्रिया १० सप्टेंबरपासून सुरू झाली होती. त्यावेळी राजे चार्ल्स तिसरे यांची राजा म्हणून घोषणा करण्यासाठी सेंट जेम्स पॅलेसमध्ये राज्यारोहण परिषद बैठक झाली होती. ‘प्रिव्ही कौन्सिल’ नावाचा हा समारंभ नव्या राजाच्या पहिला अधिकृत समारंभ होता. चार्ल्स यांनी त्यावेळी स्कॉटलंडचे चर्च सुरक्षित ठेवण्याची शपथ घेतली होती. यानंतर त्यांनी उत्तर आयर्लंड आणि वेल्सच्या भेट देत राजा बनण्याच्या त्यांच्या विविध टप्प्यांना सुरुवात केली. ब्रिटिश क्राउनच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर शोकाचा कालावधी संपल्यानंतर नव्या राजाचा अधिकृत राज्याभिषेक होतो.
जगातील पाच श्रीमंत राजघराण्यांमध्ये ब्रिटनच्या राजघराण्याचा समावेश:
जगातील पाच श्रीमंत राजघराण्यांपैकी चार अरब देशांतील आहेत. या यादीत स्थान मिळवणारे एकमेव बिगर अरबी कुटुंब म्हणजे ब्रिटिश राजघराणे आहे.
सौदी अरेबियाचे राजघराणे (संपत्ती १.४ ट्रिलियन डॉलर)
सौदी अरेबियाचे राजघराणे १७४४ पासून सौदी अरेबियावर राज्य करत आहे. त्यांच्याकडे खूप पैसा आहे. एका अंदाजानुसार, कुटुंबाची एकूण वैयक्तिक संपत्ती सुमारे १.४ ट्रिलियन डॉलर म्हणजे सुमारे १११लाख कोटी रुपये आहे.
हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अर्नॉल्टपेक्षा सुमारे सात पट जास्त आहे. अर्नॉल्टची एकूण संपत्ती सध्या २०६ अब्ज डॉलर आहे. या राजघराण्यात अनेक सदस्य असले तरी किंग सलमान अल सौद यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती आहे.
कुवेतचे राजघराणे (३६० अब्ज डॉलर)
आखाती देश कुवेतचे राजघराणे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत राजघराणे आहे. त्याचे प्रमुख कुवेतचे वर्तमान अमीर शेख सबाह अहमद अल जाबेर अल सबाह आहेत. अल सबाह राजवंश १७५२ पासून कुवेतवर राज्य करत आहे.
या राजघराण्याने अमेरिकेतील सर्व मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून अमाप संपत्ती कमावली आहे. या कुटुंबाची एकूण संपत्ती ३६० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अर्नॉल्टच्या संपत्तीपेक्षा ही १५४ अब्ज डॉलर अधिक आहे.
कतारचे राजघराणे (३३५ अब्ज डॉलर)
कतारचे राजघराणे जगातील सर्वात श्रीमंत राजघराण्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. कतारवर १९ व्या शतकाच्या मध्यापासून थानी घराण्याचे राज्य आहे. शेख तमीम बिन हमाद अल थानी, २०१३ मध्ये सिंहासनावर आरूढ झाले. या कुटुंबाची संपत्ती ३३५ अब्ज डॉलर आहे.
त्यांनी अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये लंडनमधील ऑलिम्पिक व्हिलेज आणि हॅरॉडचे लंडनमधील डिपार्टमेंटल स्टोअर यांचा समावेश आहे. न्यूयॉर्कच्या एम्पायर स्टेट बिल्डिंग, बार्कलेज, ब्रिटिश एअरवेज आणि फोक्सवॅगनमध्येही या कुटुंबाची गुंतवणूक आहे.
अबू धाबीचे राजघराणे (१५० अब्ज डॉलर)
अबुधाबीवर अल नाह्यान घराण्याची सत्ता आहे. या राजघराण्याचे प्रमुख शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान हे अबू धाबीचे २००४ पासून UAE चे अध्यक्ष आहेत.
अबू धाबीच्या राजघराण्याची एकूण संपत्ती १५० अब्ज डॉलर आहे. ते बहुतेक तेलातून येते. त्यांच्याकडे लंडनमध्ये ७.१ अब्ज डॉलर्सची स्थावर मालमत्ता आहे. जगातील सर्वात श्रीमंत राजघराण्यांच्या यादीत हे कुटुंब चौथ्या क्रमांकावर आहे.
ब्रिटनचे राजघराणे (८८ अब्ज डॉलर)
ब्रिटिश राजघराण्याची कमान आता राजा चार्ल्सच्या हाती आहे. हे कुटुंब जगातील सर्वात श्रीमंत राजघराण्यांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर असले तरी जगातील सर्वात प्रभावशाली राजघराणे आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, ब्रिटिश राजघराण्याकडे सुमारे ८८ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. याशिवाय, राजघराण्याने अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांमध्येही गुंतवणूक केली आहे.
शाही सोहळ्यातील पाहुणे : २२०० पाहुणे उपस्थित राहणार
राणी एलिझाबेथ यांच्या राज्याभिषेक सुमारे आठ हजार पाहुण्यांच्या उपस्थित झाला होता. चार्ल्स यांचे पुत्र प्रिन्स हॅरी यांच्यासह राजघराण्यातील कुटुंब सोहळ्यात सहभागी होणार आहे.
अन्य देशांचे राजे, अध्यक्ष, मंत्र्यांनाही निमंत्रण
राजे चार्ल्स तिसरे यांच्या राज्यारोहणाबाबत ब्रिटनमधील भारतीयांमध्येही उत्सुकता व्यक्त होत असून पंतप्रधानपदावर भारतीय वंशाचेच ऋषी सूनक विराजमान असल्याने या भव्य समारोहामध्ये भारतीय वंशियांचा सहभाग दिसणार आहे.
भारताकडून उपराष्ट्रपती जगदीप धनकड हे प्रतिनिधित्व करणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या पत्नी जिल बायडेन, चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग हेही सहभागी होण्याची शक्यता आहे.
अभिनेत्री सोनम कपूर, हॉलिवूड कलाकार टॉम क्रूझ, गायक टॉम जोन्स, रॉबी विल्यम्स यांच्यासह एल्टन जॉन, बेअर ग्रिल आदी निमंत्रित आहेत.
ब्रिटनमध्ये राज्याभिषेक कसा होतो?
राज्याभिषेकात सम्राटाच्या डोक्यावर औपचारिक पद्धतीने राजमुकुट ठेवला जातो.
परंपरागत पद्धतीनुसार राज्याभिषेक हा एक संस्कार आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा विधी आहे.
वेस्टमिनिस्टर ॲबे येथे गेल्या ९०० वर्षांपासून राज्याभिषेकाची प्रथा पाळली जाते.
परंपरेनुसार ब्रिटनचे राजे आणि राण्यांना १०६६ मध्ये विल्यम द कॉन्करनंतर वेस्ट मिनिस्टर ॲबेमध्ये मुकुट परिधान केला जातो.
राज्याभिषेकाचा खर्च
सोहळ्याचा सर्व खर्च ब्रिटिश सरकार करणार
राजे चार्ल्स तिसरे यांच्या राज्याभिषेक सोहळ्यावर १०२१.५ कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज.
चार्ल्स यांच्या राज्याभिषेकावरील अंदाजे खर्च हा राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या १९५३ मधील राज्याभिषेकापेक्षा दुप्पट.
तत्कालीन ब्रिटिश सरकारने सोहळ्यावर १५ लाख पाउंड खर्च केला होता. ही रक्कम आज ५२८.७ कोटी रुपये एवढी आहे.