- पूजा नायक
'द केरला स्टोरी' हा चित्रपटाने केरळची एक प्रतिमा तयार करून ठेवली आहे. मात्र या केरळची दुसरी स्टोरीही आहे, जी धार्मिक सौहार्द आणि सहकार्य यांचे दर्शन घडवणारी आहे. खरे तर हीच रियल केरला स्टोरी आहे. नुकतेच याचे एक उदाहरण समोर आले आहे. सौदी अरेबियामध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या केरळच्या एका व्यक्तीला वाचवण्यासाठी राज्यातील नागरिकांनी ३४ कोटी रुपयांची देणगी गोळा केली आहे. क्राउडफंडिंगच्या माध्यमातून एवढी मोठी रक्कम जमा करण्याची इतिहासातील ही पहिली घटना आहे. परदेशात अडकलेल्या एका व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी केरळच्या नागरिकांनी परत एकदा एकजूट दाखवली आहे. यातूनच केरळातील नागरिकांचे माणुसकीचे दर्शन घडते.
सौदीमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या गृहस्थाचे नाव अब्दुल रहीम नाव असून तो केरळमधील कोझिकोड येथील रहिवासी आहे. या केरळ स्टोरीची सुरुवात होते २००६ मध्ये. केरळमधील एका सामान्य कुटुंबातील हा मुलगा रोजगाराच्या शोधात सौदी अरेबियात गेला आणि देशाच्या राजधानीत नोकरीला लागला. अल शाहिरी नावाच्या व्यक्तीकडे तो ड्रायव्हर म्हणून काम करू लागला. या व्यक्तीला एक दिव्यांग मुलगा होता. या मुलाच्या देखभालीचीही जबाबदारी रहीमवरच सोपवण्यात आली होती. तो मुलाची व्यवस्थित काळजी घ्यायचा. सर्व काही सुरळीत चालू होते. रहीम यांना सौदी अरेबियात स्थायिक होऊन अजून एक महिनाही उलटला नव्हता तेवढ्यातच अब्दुल यांच्या गाडीला अपघात झाला आणि दिव्यांग मुलाच्या गळ्यावर श्वास घेण्यासाठी लावण्यात आलेल्या पाईप निखळला. रहीम यांनी प्रयत्न करूनही त्यांना तो परत लावता आला नाही. यातच तो मुलगा बेशुद्ध पडला आणि त्याचा मृत्यू झाला.
या सर्व घटनेला रहीम जबाबदार असल्याचा आरोप पिडीत कुटुंबीयांनी केला आणि रहीम यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. हे आरोप सिद्ध होऊन न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आणि तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पुढे २०१८ मध्ये रहीम यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या विरोधात रहीम यांनी वरच्या कोर्टात याचिका दाखल केली होती मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावत, त्यांची शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर रहीम यांची शिक्षा माफ व्हावी यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक मार्गांनी प्रयत्न केले. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शेवटी रहीमच्या कुटुंबीयांनी सौदीतील त्याच्या मालकाला विनवणी केली. त्याची ही गयावया पाहून त्यांनी रहिमला ब्लड मनीच्या अटीवर माफ केले. रहीम यांच्या सुटकेसाठी १६ एप्रिलपर्यंत तब्बल १५ दशलक्ष सौदी रियाल (३४ कोटी) देण्याचा निर्णय घेण्यात आला.
ब्लड मनी म्हणजे एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात येते. या शिक्षेपासून सुटका करून घ्यायची असल्यास ब्लड मनीचा पर्याय आरोपीसमोर असतो. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्याच्या कुटुंबियांनी ब्लड मनीची रक्कम स्वीकारल्यास आरोपीला दोषमुक्त करण्यात येते. आरोपीला क्षमा करण्याच्या बदल्यात ही ब्लड मनीची रक्कम देण्यात येते. ही संकल्पना सौदी अरेबियात प्रचलित आहे.
मात्र एवढी मोठी रक्कम उभाराची कशी हा एक यक्ष प्रश्न रहीम कुटुंबियांपुढे उभा होता. मुलाला वाचवण्यासाठी ३४ कोटी रुपये उभे करणे हे केवळ अशक्य आहे, असे रहीम यांच्या आईला वाटत होते. मात्र केरळच्या नागरिकांनी वेगवेगळे उपाय योजिले आणि एकजुटीने ते कामाला लागले. जात, धर्म, पंत, वर्ग यापलीकडे जाऊन नागरिकांनी रहीमच्या सुटकेसाठी पैशांच्या रुपात मदत केली आहे. लोकनिधीतून ३४ कोटी रुपये जमा केले आहेत. हा निधी जमा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने 'SAVETHEABDULRAHIM' हे ॲप तयार केले होते. त्याद्वारे ३० कोटींहून अधिक रक्कम जमा झाली. या ॲपच्या माध्यमातून देणगिदारांना त्यांनी दिलेले पैसे रहीम यांच्या आईपर्यंत पोहोचले की नाही, हे समजत होते.
तसेच रियाधमधील संस्था, केरळमधील व्यापारी, अनेक राजकीय संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येऊन पैसे उभारणीसाठी मदत केली. १००० सदस्य असलेले पाच व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आले होते. समाजमाध्यमावरही निधी उभारणीसाठी विशेष मोहिम राबवण्यात आली होती. अशाप्रकारे कायदेशीर कृती समितीने उभारलेली ही रक्कम परराष्ट्र मंत्रालयामार्फत रियाधमधील भारतीय दूतावासात पाठवून रहीमच्या सुटकेचा प्रबंध केला.
१२ एप्रिल रोजी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली. त्या पोस्टमध्ये, मुख्यमंत्री विजयन यांनी क्राउडफंडिंगच्या प्रयत्नांचे कौतुक केले. सौदी अरेबियामध्ये फाशीची शिक्षा भोगत असलेल्या अब्दुल रहीमच्या सुटकेसाठी जगभरातील केरळवासीयांनी एकत्र येऊन ३४ कोटी रुपये जमा केले आहेत. एक जीव वाचवण्यासाठी, एका कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी केरळने प्रेमाचे एक उदात्त उदाहरण निर्माण केले आहे. केरळ हा बंधुभावाचा बालेकिल्ला आहे आणि कुठल्याही प्रकारचा जातीयवाद ते नष्ट करू शकत नाही, असेही त्यांनी लिहिले आहे.
रहीम यांच्या सुटकेची बातमी एकूण त्यांच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. त्या म्हणाल्या, "माझा मुलगा आता घरी येणार. गेल्या १८ वर्षांपासून मी ना त्यांचा चेहरा पाहू शकले ना त्याला फोन वर बोलू शकले. त्याने फोन केला तरी मला भरून येत होते त्यामुळे त्याच्याशी कधीच नीट बोलता आले नाही. माझ्या मुलाचा जीव वाचवून त्याला घरी आणण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्या सर्वांचे मी आभार मानते."
याव्यतिरिक रहीमचे मित्रमंडळी अगदी आतुरतेने त्याची वाट पाहत आहेत. त्यातील एकाने सांगितले, "आम्ही सर्व मित्रमंडळी ऑटो चालवत असू, असेच ऐके दिवशी रहीमला सौदी अरेबियातील नोकरी मिळाली. आम्ही खूप खुश होतो. आधल्या दिवशी पार्टी करून दुसर्यादिवशी त्याला विमानतळावर सोडवायला गेलो आणि एक दिवस अचानक ही बातमी कळली. काय करावे सुचत नव्हते. त्याची आई सतत दुख सागरात बुडून असे, तर वडील व्हरांड्यात बसून असत. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला ते रहीम बद्दल विचारायाचे. आता मात्र रहीम परत येणार या विचाराने मन आनंदित होतेय." फक्त आज रहीमचे वडील जिवंत पाहिजे होते अशी खंतही त्याने व्यक्त केली.
रहीमसाठी क्राउडफंडिंग करणाऱ्या संस्थेने सांगितले की, रियाधमधील ७५ हून अधिक संस्थेने मदत केली. केरळचे व्यापारी बॉबी चेम्मनूर, राज्यातील विविध राजकीय संघटना आणि सामान्य नागरिक या सर्वांनी निधी उभारणीच्या या कामात सढळ हस्ते मदत केली. रहीमची आई फातिमा यांनी ३४ कोटी रुपये जमा झाल्यावर सर्वांचे आभार मानले. तसेच अब्दुल रहीम यांनीही लोकांचे आणि कायदेशीर समितीचे आभार मानले आणि हीच 'खरी केरळ कथा' असल्याचे म्हणले आहे.
- पूजा नायक