“आजही हवा मज असाच शिवबा माझा,
तो समाजवादी महाराष्ट्राचा राजा…”
शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्याच्या या ओळी ऐकताच डोळ्यासमोर उभे राहतात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा शिवरायांनी रचला. आज तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. यानिमित्त महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची काही खास वैशिष्ट्ये जाणून घेऊ, ज्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने रयतेचा राजा म्हटले जाते.
शिवाजी महाराजांचे आजोबा साताऱ्याचे मालोजीराजे यांनी पुत्र प्राप्तीसाठी शके १५१६ला हमदनगरच्या शाहशरीफ दर्ग्यात नवस केला होता. नवसप्राप्ती झाली तर पुत्राला पीरबाबा शाहशरीफ यांचे नाव देण्याचे त्यांनी कबूल केले. त्याच वर्षी मालोजीराजेंना पहिला पुत्र प्राप्त झाला. तर पुढील वर्षी म्हणजे शके १५१७ मध्ये दुसरे पुत्ररत्न झाले. मालोजीराजांनी नवसाला जागत आपल्या पहिल्या पुत्राचे नाव शहाजी तर दुसऱ्या पुत्राचे नाव शरीफजी असे ठेवले.
पुढे शहाजीराजे-जिजाऊ यांना जे पुत्ररत्न झाले तेच मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी खऱ्या अर्थाने रयतेचे स्वराज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या या स्वराज्यात सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक न्यायाची भक्कम तटबंदी होती. त्यामध्ये जातीधर्माच्या भिंती कधीच नव्हत्या.
महाराजांनी अठरा पगड जातीतील आणि मुस्लिम समाजातील शूरवीरांना स्वराज्यात मानाची पदे दिली. यातून त्यांनी खऱ्या अर्थाने सामाजिक आणि धार्मिक एकतेचा संदेश दिला. शिवाजी महाराजांना समतेच्या विचारांचा वारसा हा त्यांच्या घराण्यातून आलेला आहे. याचे उदाहरण म्हणजे भोसले घराण्याची नगरच्या शाह शरीफ दर्ग्याशी पाचशे वर्षांची जोडलेली नाळ!
हाच वारसा छत्रपतींच्या भोसले आणि कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या घराण्यांनी या राज्याला आणि देशाला दिला आहे. शेकडो वर्षानंतर तोच वारसा आजही पाळला जात आहे. आजही दरवर्षी भोसले घराण्याचे प्रतिनिधी नगर जवळील फकिरवाडा येथील शाहशरीफ दर्ग्याला श्रद्धेने भेट देत बाबांना चादर अर्पण करतात. भोसले घराण्याची शाह शरीफ दर्ग्याशी असलेले नाते हे केवळ श्रद्धेचे नव्हे, तर विविधतेतून एकता जपणाऱ्या संस्कृतीचा अभिमानास्पद पुरावा आहे.
महिलांचा आदर
खरे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा कोणत्याही व्यक्तिगत लाभासाठी नव्हता, तर तो परिवर्तनासाठी होता. सर्व मानवी अधिकार नाकारलेल्या जनतेला सन्मानाने जगता यावे यासाठी त्यांनी स्वराज्य निर्माण केले. लोककल्याणकारी शासनव्यवस्था हेच त्यांचे अंतिम ध्येय होते.
स्वराज्यातील आणि परराज्यातील सर्वसामान्यांचा त्यांनी नेहमीच आदर-सन्मान केला आहे. आपल्या शत्रूची आई, बहीण, मुलगी, पत्नी किंवा सामान्य स्त्री असली तरी त्यांचा आदर, सन्मान आणि संरक्षण केले पाहिजे, हा त्यांचा शिरस्ता होत. ‘‘धर्मग्रंथ, धर्मस्थळ, स्त्रिया आणि लहान मुले आपल्या शत्रूंची जरी असली तरी त्यांचा आदर करावा’’, असा त्यांचा दंडक होता. तो नियम मोडणारांना त्यांनी कठोर शिक्षा केल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत.
याबाबत समकालीन मोगल इतिहासकार खाफीखान यांनी असे म्हटले आहे की, ‘‘आपण ज्याप्रमाणे आपल्या आईशी किंवा बहिणीशी बोलतो तसे शिवाजी महाराज स्त्रियांशी बोलत असत.’’ इतके ते नीतिमान होते... ‘परमुलुखातील पोर बायका न धरावी’ हा त्यांचा आदेश होता. स्वराज्याप्रमाणे परराज्यातील सर्वसामान्य स्त्रियांचे संरक्षण आणि आदर केला पाहिजे, ही त्यांची शिस्त होती.
सैन्यात भरती होण्यासाठी कुठलीही अट नाही
शिवाजी राज्यांच्या स्वराज्यात प्रजेच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या जीवनावश्यक गरजा सन्मानाने पूर्ण होत. त्यांच्या स्वराज्यात प्रजा सुखासमाधानाने नांदत असे. त्यामुळेच पन्हाळगडाच्या वेढ्यावेळी महाराजांसारखा वेश करून शिवरायांसाठी बलिदान देणारे शिवा न्हावी, घोडखिंडीत बलिदान देणारे बाजीप्रभू देशपांडे व शेकडो बांदल, मुरारबाजी, नेताजी पालकर, जीवाजी महाला, हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर, सिद्दी हिलाल, यांसारखे अनेक जण स्वराज्यासाठी बलिदान द्यायला तयार होते.
त्यांच्या सैन्यात भरती होण्यासाठी धर्म ही अट नव्हती, तर केवळ स्वराज्यनिष्ठा आवश्यक होती. शिवरायांचा धर्मनिरपेक्षतेचा विचार पटल्याने विजापूरच्या लष्करातील ७०० पठाण महाराजांच्याकडे सेवेसाठी आले. तर आरमार प्रमुख दर्यासारंग व दौलतखान, पहिले सरनोबत नूरखान बेग, अंगरक्षक सिद्दी इब्राहिम, तोफखाना प्रमुख इब्राहिम खान, वकील काजी हैदर तर सिद्दी वाहवाह घोडदळ सरदार होते.
शिवाजी महाराजांचा औरंगजेबासोबतचा पत्रव्यवहार
शिवाजी महाराजांच्या उदारमतवादाचे अजून एक मोठे उदाहरण म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सम्राट अकबरच्या सुलह-ए-कुल राजवटीचे कौतुक केले आहे. अकबरच्या राज्यव्यवस्थेचे कौतुक करताना महाराजांनी त्याला ‘जगतगुरु’ असे देखील संबोधले होते. आलमगीर औरंगजेबाला लिहिलेल्या एका पत्रात शिवाजी महाराजांनीलिहिले आहे की, “बादशाह सलामत! या साम्राज्य-रूपी भवनाचे निर्माते, सम्राट अकबराने ५२ वर्षे राज्य केले. त्यात त्यांनी ईसाई, यहूदी, मुसलमान, दादूपंथी, नक्षत्रवादी, परीपूजक, विषयवादी, नास्तिक, ब्राह्मण, श्वेताम्बर-दिगंबर अशा विविध धर्मसम्प्रदायांना समान सन्मान दिला. त्यांचे मुख्य उद्दिष्ट सर्वांगीण सुरक्षा आणि पोषण हे होते. त्यामुळेच ते जगद्गुरु म्हणून नावाजले गेले. अकबराची उदारता इतकी होती की, त्याच्या मार्गावर विजय आणि सफलता नेहमीच स्वागतासाठी सज्ज असायची.”
तसेच शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्या संवादात मुस्लिम धर्मग्रंथ कुराणवर आधारित एक महत्त्वपूर्ण विचार मांडला आहे. शिवाजी महाराज म्हणतात, “बादशाह सलामत! जर आपण कुरआन शरीफवर विश्वास ठेवत असाल, तर ते वाचा. तुम्हाला तेथे स्पष्टपणे लिहिलेले दिसेल की, ईश्वर संपूर्ण मानवतेचा प्रभू आहे, म्हणजेच रब्बुल आलमीन आहे. तो केवळ मुसलमानांचा प्रभू नाही. इस्लाम आणि हिंदू धर्म हे दोन भिन्न शब्द आहेत, जणू ते दोन भिन्न रंग आहेत ज्यांना रंग देऊन आकाशात बसलेल्या चित्रकाराने मानवजातीचे चित्र पूर्ण केले आहे. मस्जिदमध्ये ईश्वराचे स्मरण करण्यासाठी अज़ान दिली जाते आणि मंदीरात त्याच ईश्वरासाठी घंटा वाजवली जाते. म्हणून, कट्टरपणाची बाजू घेणे आणि धर्म आणि कर्मकांडांमध्ये फरक करणे हे म्हणजे फक्त ईश्वराच्या ग्रंथाच्या तत्त्वांना बदलण्यासारखे आहे. चित्रावर नवीन रेषा काढून आपण चित्रकाराच्या कार्यावर शंका घेण्यासमान समान आहे.”
धार्मिक स्थळांचा सन्मान
शिवरायांच्या स्वराज्यात सर्व धर्मांच्या पवित्र स्थळांचा हिंदवी स्वराज्यात सन्मान केला जात होता. हिंदू मंदिरे आणि मुस्लिम संतांचे दर्गे व मशिदींना महाराज देणग्या देत होते. महाराजांनी केळशीचे हजरत बाबा याकुत यांना दर्गा बांधण्यासाठी अनुदान दिले होते. शिवाय वर्षासन देऊन तेथील खर्चाची सोय देखील केली होती.
महाराजांनी सैनिकांना सक्त ताकीद दिली होती की, “लुटीला गेल्यावर कुराण ग्रंथाला, मशिदीला नुकसान पोहोचवू नये, कोणत्याही स्त्रीला छळू नये. जर एखादी कुराणाची प्रत हाती आली तर त्याबद्दल पूज्यभाव दाखवून आपल्या मुसलमान मावळ्याच्या स्वाधीन करावी.” आणि याचे औरंगजेबाच्या दरबारातील इतिहासकार यांनी पुरावे दिलेत.
एवढेच नव्हे तर जिझिया कराबाबत शिवरायांनी औरंगजेबासही पत्र लिहिले होते. त्यात शिवरायांनी म्हटले होते की, “अस्मानी किताब म्हणजे कुराण. ते ईश्वराची वाणी आहे. त्यात ईश्वरास 'जगाचा ईश्वर' म्हटले आहे, 'मुसलमानांचा ईश्वर' असे म्हटलेले नाही. कारण हिंदू आणि मुसलमान दोन्ही ईश्वरापाशी एकरंग आहेत. कुणी मसजीदीमध्ये त्याचे स्मरण करून बांग देतात, तर कुणी देवालयात घंटा वाजवितात. कोणाच्याही धर्मास विरोध करणे हे आपला धर्म न पाळणे व ईश्वराने लिहिलेले रद्द करणे वा त्यालाच दोष देणे आहे. शास्त्र व न्याय या दोन्हीही दृष्टीने विचार केला तरी जिझिया पट्टी ही गैर आहे.”
बीबीसी मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी शिवाजी महाराजांचा सर्व समाजाकडे पाहण्याचा उदार दृष्टिकोन होता असं सांगताना म्हटले आहे की, “शिवाजी महाराजांनी मुळातच इतर राज्यकर्त्यांच्या तुलनेत कमी धार्मिक वास्तू बांधल्या आहेत. त्यांनी बांधलेल्या मंदिरांचीच संख्या कमी आहे तेव्हा ते मशीद बांधण्याचा प्रश्न कुठून येतो. पण याचा अर्थ ते मुस्लीमविरोधी होते की मुस्लीमद्वेष्टे होते असा नाही.”
याचे उदाहरण देताना ते सांगतात, “शिवाजी महाराजांनी बाबा याकुत यांच्या दर्ग्याला अनेक देणग्या दिल्या आहेत. त्याचे समकालीन पुरावे आहेत. पन्हाळागडचा सादोबाचा दर्गा असो किंवा इतर कोणताही दर्गा असो शिवाजी महाराजांनी त्यांचा योग्य तोच आदर केला आहे.”
कुप्रथांचा विरोध
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी आणि नवे राष्ट्र उभारणारे राजे नव्हते, तर ते गौरवले जातात त्यांच्या राज्य करण्याच्या पद्धतीमुळे. त्यांचे राज्य जनतेच्या कल्याणाचे होते. ते जितके कल्याणकारी होते, तेवढेच ते कुप्रथांचा विरोध करणारे होते.
मध्ययुगात गुलामगिरी हा अर्थव्यवस्थेचा पाया होता. ती सामाजिक-आर्थिक व्यवस्थेची निगडित असल्याने ही कलंकित प्रथा नष्ट करायला जगाला खूप झगडावे लागले. या प्रथेला शिवाजी महाराजांनी कडाडून विरोध केला होता.
दक्षिण दिग्विजयाप्रसंगी शिवाजी महाराज तमिळनाडूतील तिरुमलवाडी येथे असताना डच व्यापारी करार करण्यासाठी त्यांच्याकडे आले. त्याप्रसंगी शिवाजी महाराज डच व्यापाऱ्यांना म्हणाले होते की, ‘यापूर्वी येथे तुम्हाला स्त्री-पुरुषांना गुलाम म्हणून खरेदी-विक्री करण्याची अनिर्बंध परवानगी होती, परंतु माझ्या राज्यात तुम्हाला ती परवानगी आत्ता मिळणार नाही. तसे करण्याचा प्रयत्न कराल तर माझी माणसे तुम्हाला प्रतिबंध करतील. या कलमाचे काटेकोर पालन झाले पाहिजे,’ असा करार त्यावेळी शिवरायांनी केला होता. हे कलम शिवाजी महाराजांनी २४ ऑगस्ट १६७७च्या कौलनाम्यात घातले आहे.
शिवाजी महाराज कोणत्या जातीधर्माचे नाही तर ते रयतेचे राजे होते. त्यांना आपल्या धार्मिक परंपरांचा अभिमान होताच, परंतु त्यांनी परधर्मियांचा कधी छळ केला नाही. ज्याचा त्याचा अधिकार त्याला मिळायला हवा हीच त्यांची भूमिका होती.
महाराजांच्या या भुमिकेविषयी समकालीन कृष्णाजी अनंत सभासद सांगतात की, “धार्मिक मुद्द्यावर ध्रुवीकरण करणाऱ्या, बिगर मुस्लिमांवर जिझिया कर लादणाऱ्या औरंगजेबाला खरमरीत पत्र लिहून त्याला मानवी मूल्यांचे महत्त्व महाराजांनी सांगितले. अफजलखानाला ठार मारल्यानंतर त्याच्या मुलाला पोटाशी धरून महाराजांनी अभय दिले.”
कृषी क्षेत्रात योगदान
छत्रपती शिवाजी महाराज यांनी कृषी क्षेत्राला खूप मोलाचं योगदान दिलं आहे. ‘रयत सुखी तर राजा सुखी, शेतकरी सुखी तर राजा सुखी’ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे प्रधान सूत्र होते. शेती हे रयतेचे मुख्य बलस्थान असून संपूर्ण प्रजेचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे, याची महाराजांना जाणीव होती.
शिवकालात प्रत्यक्ष शेतात राबणारा शेतकरी हाच खरा शिवकालीन शेतीचा आधार होता. शेतकऱ्यांना सोईसवलती देणे, कर्जमाफी देणे ही सेवा आहे पण शेतकरी कर्जबाजारी होऊच नये यासाठी खबरदारी घेणे हे परिवर्तन त्यांच्या स्वराज्य कारभाराचे वेगळेपण आहे. एवढेच नाही तर सैन्यातील कर्त्या शेतकऱ्याला शेतीसाठी विशेष रजा देणारे शिवराय हे एकमेव राजे होते.
राजा व त्यांचे मंत्रिमंडळ हे रयतेचे सेवक आहेत, हे त्यावेळी शिवरायांनी मांडले व अंमलात देखील आणले. त्यामुळेच रयतेच्या भाजीच्या देठाला वा गवताच्या काडीलाही इजा पोहोचता कामा नये, असे आदेश त्यांनी आपल्या मावळ्यांना दिले होते. शिवरायांनी केलेला राज्यकारभार आजच्या लोकशाही काळातही आदर्शवत म्हणावा असा आहे. त्यामुळेच शिवइतिहासातून सर्वसामान्यांनापासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वांनीच प्रेरणा घेतली पाहिजे.