फजल पठाण
१२ ऑक्टोबर, दसऱ्याच्या दिवशी रात्री सव्वा नऊ ते साडे नऊ दरम्यान मुंबईच्या वांद्रे भागात कॉँग्रेसचे पूर्व नेते, माजी आमदार, मंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळीबार करून हत्या करण्यात आली आणि एकच खळबळ माजली. दसऱ्याच्यानिमित्त याठिकाणी फटाक्यांची आतिशबाजी होत होती. यामुळे गोळीबाराचा आवाज झाला नाही. या हत्येची बातमी राज्यसह देशभर वाऱ्यासारखी पसरली. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने राजकारण आणि समाजकारणातील एक संवेदनशील आणि अजातशत्रु व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांचा जीवनप्रवास उलगडणारा हा विशेष लेख...
मुंबईशी बाबा सिद्दीकींचे नाते
बाबा सिद्दीकी यांचा जन्म १९५८ मध्ये बिहारच्या पाटण्यातील गोपालगंज येथे झाला. मात्र शिक्षणासाठी ते मुंबईमध्ये आले आणि इथेच वाढले. मुंबईतच त्यांनी आपले बी कॉमपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच वयाच्या १६-१७ व्या वर्षीच बाबांनी कॉँग्रेसचा हात धरला. नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया अर्थात NSUIतून त्यांनी राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले. विद्यार्थीदशेतच त्यांची ओळख काँग्रेस नेते आणि अभिनेते सुनील दत्त यांच्याशी झाली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते ‘बाबाज ऑर्गनायझेशन ऑफ सोशल सर्व्हीसेस’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून समाजसेवा करू लागले. राजकीय वजन प्राप्त झाल्यावर ते मुंबई प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सदस्य बनले आणि मुख्यप्रवाहातील राजकारणात सक्रिय झाले.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना बाबांनी अगदी अल्पकाळात वांद्रयात मोठा जनाधार मिळवला. बाबा सिद्दीकी यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवत कॉँग्रेसने त्यांना १९९२ मध्ये महापालिकेच्या निवडणूकीसाठी तिकीट दिले. बाबांनी ती निवडणूक जिंकून दाखवली. त्यांची ही पहिली निवडणूक होती. यानंतर ते सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले.
बाबा सिद्दीकी यांची लोकप्रियता वाढत होती. सोबतच त्यांच्या समाजसेवेचा आवाकादेखील वाढत होता. नगरसेवक म्हणून त्यांनी विविध समाज उपयोगी काम केले होते. त्यांची लोकप्रियता आणि काम पाहून पक्षाने त्यांना विधनसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे ठरवले. १९९९ च्या विधनसभा जवळ येत होत्या. बाबांसाठी वांद्रे पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ ठरवण्यात आला. बाबांनी ही निवडणूकही जिंकलीआणि पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. सलग १५ वर्ष बाबा सिद्दीकी यांनी वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे आमदार या नात्यानेपालकत्व स्वीकारले. त्यांना जनतेने भरभरून प्रेम दिले.
त्यांच्या राजकारणात येण्याने अल्पसंख्यांक विशेषतः मुस्लिम समाजाचे प्रश्न, त्यांची बाजू विधानसभेच्या पटलावर मांडली जाऊ लागली. समाजाला बाबांच्या रूपात एक संवेदनशील आणि कार्यक्षम नेता मिळाला होता.
बाबा सिद्दीकी यांना त्यांच्या दुसऱ्याच टर्मला म्हणजे २००४ मध्ये विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले. या काळात त्यांनी कामगार, अन्न नागरी पुरवठा आणि अन्न व औषध प्रशासनाचे राज्यमंत्री पद सांभाळले. मंत्रीपदाची वर्णी लगाण्यापूर्वी त्यांनी २००० ते २००४ दरम्यान महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) अध्यक्ष म्हणून काम केले. याशिवाय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संसदीय मंडळाचे सदस्य आणि मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत देशभर मोदी लाट निर्माण झाली होती. याच निवडणुकीत मोदी लाटेचा फटका माजी आमदर बाबा सिद्दीकी यांना पराभवाच्या रूपात बसला. २०१९च्या निवडणुकीसाठी वांद्रे पूर्वचा मतदारसंघ बाबा सिद्दिकी यांनी पुन्हा बांधला. पण त्यांनी निवडणूक न लढवता मुलगा झिशान सिद्दिकी याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. पहिल्याच प्रयत्नात झिशान सिद्दिकी याने मोठा विजय मिळवला. सध्या झिशान सिद्दिकी या भागाचा आमदार म्हणून काम करत आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर बाबा सिद्दिकी यांनी कॉँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. वडिलांच्या नंतर झिशान सिद्दिकी देखील राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात केल्या गेल्या.
बाबा सिद्दीकींचे सामाजिक कार्य
देशात कोविड-19 चा उद्रेक झाला होता. शेकडो, लाखो नागरिक जगण्यासाठी संघर्ष करत होते. त्यावेळी बाबा सिद्दीकी यांनी रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणावर आवश्यक असलेल्या औषधांची व्यवस्था केली होती. शिवाय अभिनेता सलमान खानसोबत मिळून त्यांनी रुग्णांसाठी मोफत ५०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले होते. मुंबईसारख्या ठिकाणी जागरूक लोकप्रतिनिधि म्हणून त्यांनी दिलेल्या सेवेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते.
राजकारण व्यस्त झाल्यानंतर देखील बाबा सिद्दीकी स्वतःच्या गावाला विसरले नाहीत. त्यांनी त्यांच्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मोठे योगदान दिले आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्तेनंतर गावाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाविषयी माध्यमांशी बोलताना गावकरी म्हणतात, “ बाबा सिद्दीकी महाराष्ट्रात राहिले असले तरी त्यांनी मूळ गावावर आणि आमच्यावर प्रेम केले आहे. त्यांच्या जाण्याने पूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सुमारे १५०० लोकसंख्या असलेल्या या गावाच्या विकासात बाबा सिद्दीकी यांनी मोठा हातभार लावला होता.”
पुढे ते म्हणतात, “ बाबा सिद्दीकी यांनी गावात मोफत संगणक केंद्र व स्पर्धा परीक्षा केंद्र उभारले आहे. गावात त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने ‘अब्दुल रहीम मेमोरियल सिद्दीकी’ ट्रस्ट देखील उभारले आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले जाते. याशिवाय त्यांनी बिहारमध्ये लहानमोठ्या तब्बल ४० शैक्षणिक संस्था सुरू केल्या आहेत. तिथे शिक्षणासोबतच गरीब मुलांना कॉम्प्युटर आणि स्पर्धा परीक्षा इत्यादींची मोफत तयारी करून दिली जाते.”
शेवटी बोलताना ते म्हणतात, “ बाबा सिद्दीकी यांनी अनेक नी गरीब मुलींच्या लग्नाची जबाबदारी घेतली होती. लग्नाच्या खर्चाचा बोजा कमी व्हावा म्हणून त्यांनी इथे विवाह हॉलदेखील बांधला आहे.”
२०११ मध्ये बाबा सिद्दीकी यांनी आपल्या संकल्पनेतून वांद्रे येथे इको-गार्डनची निर्मिती केली. या कार्यासाठी त्यांनी भरघोस निधी दिला होता. इको-गार्डनमध्ये कचऱ्याचा पुनर्वापर केला जातो. शिवाय या गार्डनमध्ये भाजीपाला आणि औषधी वनस्पती लावल्या जातात.
बाबा सिद्दीकी अजातशत्रु नेतृत्व
कॉँग्रेस विचार घेऊन राजकारणात आलेल्या बाबांची सर्वांशी मैत्री होती. त्यांनी तब्बल ४६ वर्ष कॉँग्रेस पक्षातून जनतेची सेवा केली. यातून त्यांची मोठी राजकीय कारकीर्द आहे हे अधोरेखित होते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अजातशत्रू व्यक्तिमत असणे म्हणजे एक कसोटिच. परंतु राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी इतर पक्षातील नेत्यांशी आपल्या संवेदनशील स्वभावाने मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. त्यापुढे जाऊन त्यांनी ते जोपासले देखील.
बॉलीवूड, इफ्तार पार्टी आणि बाबा सिद्दीकी
वांद्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाल्यानंतर बाबा सिद्दीकी आणि बॉलिवूड कलाकारांमध्ये मैत्रीपूर्व संबंध निर्माण झाले. अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्यांचे घरोब्याचे सम्बन्ध होते. संजय दत्त, सलमान खान आणि शाहरुख खान यांच्याशी तर त्यांची विशेष मैत्री होती. ते दरवर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन करायचे. यावेळी बडे बॉलिवूड सेलिब्रिटी या पार्टीला हजर असायचे. बाबा सिद्दीकी यांची लोकप्रियता वाढली ती बॉलिवूड कलाकारांशी असलेल्या ओळखीमुळे आणि इफ्तार पार्टीमुळे. २०१३ साली सिद्दीकी यांच्याच इफ्तार पार्टीत सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील वैर संपून त्यांच्यात पुन्हा मैत्री झाली होती.
बाबा सिद्दीकी यांना गेल्या काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. यामुळे त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. परंतु ही सुरक्षा भेदून गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी महत्वाच्या लोकप्रतिनिधींपैकी एक होते. सिद्दीकींच्या जाण्याने अल्पसंख्यांक विशेषतः मुस्लिम समाजाचे मोठे नुकसान झाले.
- फजल पठाण
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter