आरिफ मोहम्मद खान यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 14 h ago
आरिफ मोहम्मद खान आणि नरेंद्र मोदी
आरिफ मोहम्मद खान आणि नरेंद्र मोदी

 

प्रख्यात विद्वान आणि राजीव गांधी सरकारमध्ये सर्वांत कमी वयात कॅबिनेट मंत्री होण्याचा विक्रम करणारे  आरिफ मोहम्मद खान यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर त्यांच्या या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली. राज्यपाल म्हणून ते आपल्या पदाचा कार्यभार लवकरच स्वीकारतील.

आरिफ मोहम्मद खान भारतातील अनुभवी आणि तत्त्वनिष्ठ राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांनी विविध महत्त्वाच्या राजकीय पदांवर काम करताना आपल्या ज्ञानाचा आणि नेतृत्वाचा परिचय दिला आहे. खासदार आणि केंद्रीय मंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये आपली भूमिका बजावली आहे. बराच काळ राजकीय सन्यास घेतल्यानंतर २०१९- २०२४ या काळात त्यांनी केरळचे राज्यपाल म्हणून काम पाहिले. 

मुस्लिम समाजातील सुधारणांचे पुरस्कर्ते म्हणून आरिफ मोहम्मद खान प्रसिद्ध आहेत. त्यांनी तिहेरी तलाक आणि मुस्लिम वैयक्तिक कायद्यांवरील आपल्या उदारमतवादी भूमिकांसाठी त्यांनी राजकीय जीवनही पणाला लावले. त्यांचे विचार आणि योगदान देशातील सामाजिक सलोखा राखण्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जातात.

लक्षणीय मुस्लीम लोकसंख्या असणाऱ्या बिहारमध्ये नवे राज्यपाल म्हणून त्यांची निवड होणे हे त्या राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरणासाठी आशादायक पाऊल मानले जात आहे. येत्या काळात बिहार विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवड झाल्याने याकडे राजकीय दृष्टीकोनातून बघितले जात आहे. 

कोण आहेत आरिफ मुहम्मद खान?
आरिफ मुहम्मद खान उदारमतवादी नेते आणि मुस्लिम समाजातील सुधारणांचे प्रवर्तक म्हणून ओळखले जातात. उत्तर भारतातील राजकारणातील ते एक महत्त्वाचे नाव आहे. त्यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९५१ रोजी उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे झाला. त्यांनी अलिगढ मुस्लीम विद्यापीठ आणि जामिया मिलिया इस्लामिया यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिक्षण घेतले.

राजकीय कारकीर्द
आरिफ मोहम्मद खान यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात १९७० च्या दशकात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून केली. १९७७ मध्ये वयाच्या २६व्या वर्षी ते आमदार झाले.पुढे १९८० च्या दशकात खासदार म्हणून निवडून येत केंद्र सरकारमध्ये मंत्रीपद भूषवले. सामाजिक न्याय, शिक्षण आणि गृहनिर्माण यांसारख्या क्षेत्रांत त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. पुढे, त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून जनता दल आणि भाजप यांसारख्या पक्षांशीही संधान बांधले. 

सुधारणावादी दृष्टिकोन
आरिफ मोहम्मद खान हे मुस्लिम समाजातील सुधारणांचे एक महत्त्वाचे प्रतीक मानले जातात. १९८६ साली शाह बानो प्रकरणाच्या वेळी त्यांनी तिहेरी तलाक विरोधात भूमिका घेतली आणि मुस्लिम वैयक्तिक कायद्यांमध्ये बदलांची मागणी केली. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना तत्कालीन राजकीय गटांमध्ये मतभेदांना सामोरे जावे लागले, मात्र ते आपल्या विचारांवर ठाम राहिले.

लेखन आणि विचारवंत म्हणून योगदान
आरिफ मोहम्मद खान यांनी धर्म, समाज आणि राजकारण यावर आधारित अनेक लेख आणि पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या लिखाणात कुराणातील मूलभूत शिकवणींवर भर दिला असून ते धर्माची आधुनिक मांडणी करण्यावर भर देतात.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter