डोक्यावर टोपी आणि चेहऱ्यावर दाढी असलेले एक 'भैय्या' विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने गणित शिकवतात की तो त्यांच्या आवडता विषय होऊन जातो. लहानपणापासून मुलांच्या मनात बसलेली गणिताची भीती हे भैय्या दूर करतात आणि गणिताची गोडी निर्माण करतात. हे भैय्या म्हणजे पुण्यातील शिक्षक अनीस कुट्टी. ते मुलांना केवळ गणितातील समीकरण सोडण्यास मदत करतात असे नाही तर आयुष्यातील समीकरण सोडवण्यासही मदत करतात.
कोण आहेत गणिततज्ज्ञ अनीस कुट्टी?
अनीस कुट्टी हे मुळचे केरळचे. पण गेल्या अनेक वर्षांपासून ते पुण्यात राहतात. १९९८ पासून त्यांनी विद्यार्थ्यांना गणित शिकवायला सुरुवात केली. गणिताबद्दल ते लहानपणाची एक आठवण सांगतात. “मी इयत्ता दहावीत असताना शिक्षकदिनी पहिल्यांदा गणित शिकवले आणि त्या दिवसापासून लोक माझ्याकडे गणिताचे प्रश्न घेऊन यायला लागले.”
गणित हाच विषय का निवडला?
या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी गणिताचे महत्व सांगितले. “आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात गणिताचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे मुलांनी गणिताच्या फोबियातून बाहेर पडले पाहिजे. शाळेत गणित शिकवण्यामागचा मुख्य उद्देश हा ‘विद्यार्थ्यांची तर्कशक्ती विकसित करणे’ असला पाहिजे.” केवळ गोष्टी तोंडपाठ करणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.
गणित शिकवण्याची अनोखी पद्धत:
गणित हा विषय काहींसाठी अतिशय सोप्पा तर काहींसाठी अत्यंत अवघड असतो. बहुतांश विद्यार्थ्यांसाठी गणित हा सर्वात कठीण विषय असतो. परंतु चांगला शिक्षक मिळाला तर गणिताचे प्रश्न चुटकीसरशी सोडवता येतात. गेल्या ३५ वर्षांपासून गणित शिकवणारे अनीस कुट्टी म्हणतात, गणित हा समजून घेण्याचा आणि सरावाचा विषय आहे.
मुलांना गणिताची आवड निर्माण व्हावी म्हणून ते शिकवण्याचे नवनवीन सूत्र वापरतात. गणित सोडवताना वेगवेगळे शॉर्टकट आणि अमर-अकबर-अँथनी, चंगु-मंगू, मारा-मारी, जुगलबंदी, चांडाळ-चौकडी यांसारख्या सूत्रांमधून गणित सोडवण्याची ट्रिक ते मुलांना शिकवत असतात. विद्यार्थ्यांना त्यांची सट्टा पद्धत आवडते. सट्टा म्हणजे गणित सोडवण्यासाठी वापरला जाणारा शॉर्टकट.
अनिस कुट्टींची कार्यपद्धत:
अनीस कुट्टी यांना विद्यार्थी सर न म्हणता ‘भैया’ म्हणतात. आणि तेही त्यांना मोठ्या भावाप्रमाणे मार्गदर्शन करतात असतात.याशिवाय ते मुलांसोबत त्यांच्या पालकांनाही मार्गदर्शन करतात. नवोदय विद्यालय, सैनिकी शाळा, आणि आरएमसी स्कूल अशा विविध संस्था आणि शाळांबद्दल ते माहिती देतात. या संस्थांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर मुलांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते असे त्यांना वाटते. या शाळांमध्ये प्रवेश घेतल्याने मूल उच्च पदावर विराजमान होणार हे निश्चित होते, अशी खात्रीही ते व्यक्त करतात.
मात्र सामान्य लोकांना या संस्थांची माहिती नाही हीच खरी अडचण असल्याचे ते सांगतात. गणितज्ञ अनीस कुट्टी हे फक्त गणिताचे शिक्षण नसून, त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ते एक गुरू,वाटाड्या आणि करिअर समुपदेशकाची भूमिका बजावतात.
अनीस कुट्टींच्या मार्गदर्शनाखाली बरीच मुले एनडीएसारख्या अनेक महत्वाच्या संस्थामध्ये कार्यरत आहेत. आर्यन मोरे, गौरव जगताप आणि अदिती कुमार यांच्यासारखे १००० हून अधिक विद्यार्थी तरुण एनडीएमध्ये आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत.
विद्यार्थ्यांचे हे यश अनिस कुट्टी यांच्यातील शिक्षकाला समाधान देऊन जाते. आजच्या पिढीने भारताचे जबाबदार नागरिक व्हावे आणि देशाला प्रगतीपथावर न्यावे अशी इच्छा ते व्यक्त करतात. आणि यासाठी ते स्वतः प्रयत्नशील असतात. त्यामुळे केवळ परीक्षेसाठीच नाही तर इतर प्रकारची मदत करण्यासाठीही हे अनिस भैय्या कायम सज्ज असतात.