वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेचा (NEETचा) नुकताच निकाल लागला. यावर्षी २४ लाखांहून अधिक मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. महाराष्ट्रातून अनेक अभ्यासक्रमाला प्रवेश वैद्यकीय विद्यार्थी या परीक्षेत चमकले. दरवर्षीप्रमाणेच यंदाही 'नीट'मध्ये मुलींनी बाजी मारली. मुंबईतील अमिना आरिफ हिने 'नीट'मध्ये पैकीच्यापैकी अर्थात ७२० गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला आहे. या सगळ्या यशवंतांमध्ये एक नाव मोठ्या चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे. ते नाव आहे - अल्फिया मुस्तफा पठाण.
सोलापूरमधील संजीव गांधी झोपडपट्टीचा परिसर. झोपडपट्टी म्हणजे नेहमीचा गोंधळ, पायाभूत सुविधांचा अभाव, छोटीशी खोली आणि त्यात माणसांची गर्दी! इथे आपल्या कुटुंबासह, भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या अल्फियाने पहिल्याच प्रयत्नात ‘नीट’मध्ये ७२० पैकी ६१७ गुण मिळवत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. तिच्या या यशाने संपूर्ण परिसर आनंदून गेला आहे.
आपल्या यशाबद्दलअल्फिया म्हणते, "या परीक्षेत ६०० पेक्षा जास्त मार्क्स मिळवण्याचे माझे ध्येय होते. माझं ठरवलेलं टार्गेट मी पूर्ण केलं, याच समाधानही वाटतं आहे. निकाल लागल्यानंतर माझ्याहून अधिक आनंद माझ्या कुटुंबियांना, शिक्षकांना, नातेवाईकांना व शेजारपाजाऱ्यांनाही झाला."
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवल्यामुळे अल्फियाचे विशेष कौतुक होत आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. मात्र लहानपणापासून उराशी बाळगलेले डॉक्टरकीच्या स्वप्नाच्या दिशेने तिने एक पाऊल टाकले आहे. या स्वप्नाबद्दल ती म्हणते, "झोपडपट्टीतील अस्वच्छता, असुविधा, यामुळे समाजासाठी काहीतरी करावं, असं अगदी लहान असल्यापासून वाटायचं. आठवीत असताना मी डॉक्टर व्हायचं ठरवलं."
ती पुढे म्हणते, "डॉक्टर होण्यासाठी काय कराव लागत, याची काहीच कल्पना नव्हती. मी नववीत असताना मला शाळेतल्या शिक्षकांकडून 'नीट' परीक्षेची माहिती मिळाली, पण मनात थोडी भीती होती, माझी एकंदरीत परिस्थिती पाहता, अस स्वप्न पाहण आणि एवढी अवघड परीक्षा पास होण हे दिवास्वप्नच होतं. पण आई वडील आणि भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. सोबतच शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे धीर मिळाला आणि मी ‘नीट’च्या अभ्यासाला लागले."
आपल्या शैक्षणिक प्रवासाविषयी ती म्हणते, “आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे, मी लहान असतानाच आई कामाला जायची म्हणून वयाच्या दुसऱ्यावर्षीच आईने माझे एल. केजी.ला ऍडमिशन केले होते. लवकर शाळेत दाखल झाल्यामुळे मी बारावी वयाच्या सोळाव्या वर्षीच पूर्ण केली. मात्र ‘नीट’ची परीक्षा देण्यासाठी १७ वर्षे पूर्ण असावे लागतात. त्यामुळे मला अभ्यासासाठी वर्षभर वेळ हाताशी मिळाला. मी बारावी महाराष्ट्र बोर्डातून पूर्ण केली होती. मात्र नीटची परीक्षा आयसीएससी, सीबीएससी बोर्डच्या धर्तीवर असते. त्यामुळे मिळालेल्या वर्षभरात ‘नीट’चा अभ्यास करण्याचा सल्ला मला शिक्षकांनी दिला. क्लास लावण्याइतके पैसे माझ्याकडे नव्हते. मग माझ्या कॉलेजने मला स्कॉलरशिप दिली. त्यामुळे मी कोचिंग लावू शकले. मग वर्षभर मी ‘नीट’चा अभ्यास केला."
अभ्यासाविषयी बोलताना ती म्हणते, "मी अभ्यासाशिवाय दुसरं काहीच केलं नाही, गोंधळात अभ्यासाची सवय मी स्वतःला लावून घेतली होती. मी स्टेप बाय स्टेप अभ्यास करायचे. तीन विषय असतात. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. दोन तास मी एका विषयाचा अभ्यास करायचे आणि मग अर्धा तास ब्रेक घ्यायचे. मग दोन तास दुसरा विषय या पद्धतीने तिन्ही विषयांचा अभ्यास दिवसभरात करायचे. बायो आणि केमिस्ट्री हे माझे आवडते विषय होते. या काळात मी स्वतःला सोशल मीडियापासून दूर ठेवलं आणि फक्त अभ्यासच केला."
अल्फियाच हे यश तिच्या अभ्यासातील सातत्याचं, इच्छाशक्तीचं, कठोर परिश्रमाचं फळ आहे. मात्र आपल्या या यशाचे श्रेय ती शिक्षकांसोबतच आपल्या कुटुंबियांना म्हणजे आई वडिलांना आणि भावाला देते. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना ती म्हणते, " माझं डॉक्टर होण्याचं स्वप्न आईवडिलांनी जिवंत ठेवलं. माझी आई साडीच्या दुकानातमध्ये महिना चार हजार रुपये पगारावर काम करते. ती नववी पास. माझे वडील सकाळी दहा वाजेपर्यंत भाजी विकतात, त्यानंतर ते बिगारी काम करतात. माझे आईवडील कमी शिकलेले असले तरी शिक्षणाचे महत्त्व त्यांनी ओळखले होते. त्यांनी प्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा काढला पण माझ्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. "
नुकताच दहावी पास झालेल्या अब्रार या छोट्याभावाबद्दल अल्फिया म्हणते, " मला अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून माझ्या वाट्याची बरीच कामे अब्रार विनातक्रार करायचा. तरीही त्याने दहावीत ८६ टक्के गुण मिळवले आहे. एक बहिण म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो."
अल्फियाची आई समीना यांच्या डोळ्यातले आनंदाश्रू त्यांच्या भावना सांगत होत्या. त्या म्हणाल्या, "मी तिला नेहमी म्हणायचे, माझी परिस्थिती कशी का असेना तू शिक. पुढचं पुढे बघू, तू मन लावून शिक. आता माझं स्वप्न माझ्या मुलीने पूर्ण केलं."
वडील मुस्तफा मुलीच्या यशाबद्दल म्हणाले, "मी मदरसामधून शिकलो. पण आज आधुनिक शिक्षणाला महत्त्व आहे. अधिक कष्टाचं काम केलं म्हणजे अधिक कमाई मिळते, हा भ्रम बाळगून आता उपयोग नाही, त्यामुळे मी माझ्या मुलीला तिला जे करायचे ते करू द्यायचे ठरवले. ती आमच्या सर्वांचे स्वप्न पूर्ण करेल अशी मला खात्री आहे."
जिद्द, चिकाटी आणि सातत्यासोबतच अल्फिया उत्कृष्ट प्लॅनरही आहे, हे तिच्या एका उदाहरणावरून दिसून येते. केवळ सरकारी परीक्षा कशी असते, हे अनुभवण्यासाठी तिने 'सीइटी'ची परीक्षा दिली होती आणि त्यात तिने ९६.३३ पर्सेनटाईल मिळवले होते. मात्र डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असल्यामुळे, तिने लक्ष मात्र ‘नीट’वरच केंद्रित केले होते.
अल्फियाच्या यशाचा तिच्या नातेवाईकांना ही अभिमान आहे. खानदानातील पहिली डॉक्टर बनण्याच्या दिशेने तिची सुरु असलेली घोडदौड इतर मुलामुलींसाठीही प्रेरणादायी आहे. ती राहत असलेल्या झोपडपट्टीतील मुलंमुलीही तिच्यापासून प्रेरणा घेत आहेत.
अल्फिया आता वैद्यकीय महाविद्यालात प्रवेश घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. 'एमबीएस'साठी कुठेही नंबर लागला, तरी तिथे जायला ती तयार आहे. घरच्यांचाही बाहेरगावी पाठवायला पाठिंबा असल्याचे ती सांगते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपलं स्वप्नं पूर्ण करणारी अल्फिया आणि मुलीच्या स्वप्नपूर्तीसाठी झटणारे पठाण कुटुंब सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरणारे आहे.. अल्फियाला तिच्या डॉक्टरकीसाठी 'आवाज मराठी'कडून शुभेच्छा.
- प्रज्ञा शिंदे