अहमद अली : नऊ शाळा सुरु करणारा रिक्षाचालक

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 23 h ago
अहमद अली आणि त्यांनी सुरु केलेली एक शाळा
अहमद अली आणि त्यांनी सुरु केलेली एक शाळा

 

सतनंद भट्टाचार्य, हैलाकांदी

आज भारत ७६वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. देशातील मुख्य प्रजासत्ताक दिन सोहळा नवी दिल्ली येथे पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक निमंत्रित पाहुणे, तसेच देश-विदेशातील मान्यवर या केंद्रीय सोहळ्याला उपस्थित आहेत. मात्र, दिल्लीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्यात दक्षिण असममधील एका अशिक्षित रिक्षाचालक अहमद अली खास निमंत्रित आहेत. त्यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामागचे कारण हि विशेष आहे. शिक्षणाची संधी न मिळालेल्या अहमद अली यांना त्यांनी शिक्षणक्षेत्रात केलेल्या असामान्य कार्याबद्दल भारत सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी आमंत्रित केले. 

मार्च २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमात दक्षिण असममधील श्रीभूमी जिल्ह्यातील अहमद अली यांचा उल्लेख केला होता. अहमद अली यांनी रिक्षा चालवून मिळवलेल्या पैशातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. आणि तुटपुंज्या बचतीतून चक्क शाळा सुरू केल्या. गरीबीमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागलेल्या अहमद अली यांनी आपल्या समाजाला अशिक्षितपणाच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे वाटले. आणि त्यांनी या अशक्यप्राय वाटणाऱ्या शिक्षणसेवेला सुरुवात केली. 

अहमद अली यांना दिल्लीतील ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास सन्माननीय पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. आकाशवाणीचे अतिरिक्त महासंचालक मुकेश कुमार यांनी त्यांना पत्र पाठवून या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचे आमंत्रण दिले होते. अहमद अली यांनी या महान सोहळ्याचा भाग होण्यात गर्व वाटत असल्याचे सांगितले. ‘आवाज द व्हॉईस’शी बोलताना अहमद अली म्हणाले की, पंतप्रधानांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात त्यांचे नाव घेतल्याने आत्मविश्वास वाढला आहे. महिला शिक्षण सुधारण्यासाठी अजून खूप काम करायचे आहे.

८८ वर्षीय अहमद अली हे दक्षिण असममधील करीमगंज जिल्ह्यातील पाथरकांडी तालुक्यातील खीलरबंद-मधुरबंद गावात राहतात. त्यांनी आपल्या रिक्षा चालवून मिळवलेल्या उत्पन्नातून आणि ३२ बिघा वडिलोपार्जित जमिनीतून तब्बल नऊ शाळा उभारल्या आहेत. त्यांच्या या शाळांमधून ५०० विद्यार्थिनी आणि १०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

अहमद अली यांनी १९७८मध्ये  गावातील जमीन विकून आणि ग्रामस्थांकडून मिळालेल्या थोड्या आर्थिक मदतीने प्राथमिक शाळा सुरू केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. खीलरबंद-मधुरबंद आणि आसपासच्या परिसरात त्यांनी नऊ शाळा सुरू केल्या. त्यामध्ये तीन प्राथमिक शाळा, पाच माध्यमिक शाळा आणि एक उच्च माध्यमिक शाळा आहेत. यापैकी पाच शाळांना अनुदान मिळू लागले असून असून उर्वरित शाळांमध्ये स्वयंसेवी शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत.

८८ व्या वर्षीही अहमद अली आपल्या गावाजवळ एक कनिष्ठ महाविद्यालय स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत, जेणेकरून त्यांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळू शकेल. ‘आवाज द व्हॉईस’शी बोलताना त्यांनी सांगितले, “सर्वशक्तिमान अल्लाहच्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने मी नवीन पिढीचे जीवन बदलण्याच्या प्रयत्नात आहे. आपल्या गावातील मुलांसह माझ्या स्वत:च्या मुलांना शिक्षण देऊ शकलो याचा मला खूप आनंद आहे. आता हे विद्यार्थी स्थिरस्थावर झाले आहेत आणि चांगले कार्य करत आहेत, याचे मला समाधान आहे.”

प्रसिद्धीपासून दूर राहणार्‍या अहमद अली यांनी शाळांना स्वतःचे नाव देण्याचा कधी विचारही केला नाही. मात्र, ग्रामस्थांच्या आग्रहामुळे उच्च माध्यमिक शाळेचे नाव ‘अहमद अली हायस्कूल’ असे ठेवण्यात आले आहे. 

अहमद अली यांना त्यांच्या या निस्वार्थ सेवेसाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, त्यांना अजूनही त्यांची ‘रिक्षाचालक’ हीच ओळख भावते. कारण ते मानतात की कोणतेच काम कमी दर्जाचे नसते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कामाविषयी  स्वाभिमानी असायला हवे. मार्च २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमात अहमद अली यांचा उल्लेख केला होता. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले होते. आणि सर्वांनी त्यांच्या दानशूरतेचे कौतुक सर्वांनी करायला हवे, असे सांगितले होते. त्याविषयी अहमद अली म्हणतात,  “जेव्हा मी रेडिओवर पंतप्रधानांच्या आवाजात माझे नाव ऐकले, तेव्हा मी निशब्द झालो.”  

काही वर्षांपूर्वी पाथरकांडीचे माजी आमदार आणि सध्या मंत्री असलेले कृष्णेंदु पाल यांच्यामुळे अहमद अली यांची दानशूरता जगासमोर आली होती. पाल यांनी अहमद अली यांना ‘दुर्लभ व्यक्तिमत्व’ असे संबोधत त्यांच्या शाळेच्या विकासासाठी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या निधीतून ११ लाख रुपयांचे योगदान दिले होते.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter