छत्रपती संभाजीनगरचा चालता बोलता इतिहास कालवश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 3 Months ago
रफत सईद
रफत सईद

 

गेल्या चार दशकांहून अधिक काळ छत्रपती संभाजीनगर शहरातील ऐतिहासिक वारसा आणि वास्तूंच्या जतन व संवर्धनासाठी आग्रही भूमिका घेणारे इतिहास अभ्यासक रफत कुरेशी ( वय ७८) यांचे शुक्रवारी ( १२ जुलै) रोजी कॅनडामध्ये निधन झाले. 

 

या शहराचा प्रगल्भ इतिहास आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे असून हेरिटेज वॉकद्वारे त्यांनी शहरावासियांना या शहराची ओळख करून दिली. शहराच्या इतिहासाचे जतन व्हावे अशी त्यांची ठाम भूमिका असल्याने त्यांनी वेळोवेळी प्रशासनालाही प्रश्न विचारण्याची हिंंमत दाखवली. त्यांच्या जाण्याने इतिहासप्रेमीमी, अभ्यासक, संशोधकांनी शोक व्यक्त केला आहे.

 
रफत कुरेशी हिमरूच्या पारंपारिक हस्तकला कुटुंबातून येतात. रफत सईद कुरेशी हे शहराचा 'इनसाइक्लोपीडिया' होते. त्यांचे इंग्रजी आणि उर्दू भाषेवर प्रभुत्व होते. ते प्रसिद्ध उर्दू लेखकही होते. अतिशय लहान वयात त्यांनी लेखनाची सुरुवात केली. कला व संस्कृतीवरही त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी १०० हून अधिक लेख तसेच इंग्रजीतून उर्दूमध्ये अनुवादित कथा लिहिल्या आहेत. मुख्यतः संस्कृती, पर्यटन, इतिहास आणि स्मारकांवर त्यांनी अमूल्य योगदान दिले. पत्रकार म्हणून देखील त्यांनी 'आर्ट अँड ग्लॅमर' नावाचे नियतकालिक चार वर्षे यशस्वीरीत्या चालवले. त्यांचे लेख नावाजलेल्या वृत्तपत्रांसह सकाळमध्येही प्रकाशित झाले आहेत. रफत कुरेशी यांनी विविध मासिके आणि पुस्तकांची समीक्षाही लिहिली आहे.
 
 

कुरेशी यांच्या आकाशवाणीवरील भाषणांनी शहराला राष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन मिळाले. ते आकाशवाणीचे नियमित वक्ते होते. रफत कुरेशी हिमरूच्या पारंपारिक हस्तकला कुटुंबातून येतात. त्यांचे वडील अब्दुल हमीद कुरेशी यांच्याकडे हिमरू शोरूम आणि कारखाना होता. १९०० ते १०९० च्या दशकाच्या उत्तरार्धात हा कारखाना सुद्धा पर्यटकांसाठी आकर्षण होता. अब्दुल हमीद कुरेशी यांनी हिमरू फॅब्रिकच्या उत्पादनाच्या अधिक नाविन्यपूर्ण पद्धती राबवून वस्त्रोद्योगात क्रांती घडवून आणली. तर रफत कुरेशी यांनी सुरुवातीला टुरिस्ट गाइड म्हणून करिअरला सुरुवात केली. नंतर त्यांचा विवाह छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध इतिहासकार डॉ. दुलारी कुरेशी यांच्याशी झाला. इतिहासाची आवड या समान धाग्यामुळे दोघे आकर्षित झाले आणि प्रेमात पडले. हा आंतरधर्मीय विवाह होता. त्यांनाशाकेर कुरेशी आणि साबिर कुरेशी ही मुल आहेत. त्यांच्या पुस्तक संपदेमध्ये महत्त्वाची पुस्तके आहेत.

दिल्लीहून प्रकाशित झालेले त्यांचे पहिले पुस्तक 'मुल्क-ए-खुदा तंगनीस्त' हे प्रवासवर्णन आहे. या पुस्तकात औरंगाबाद, अजिंठा, एलोरा येथील जागतिक वारसा स्थळे तसेच औरंगजेबाने बांधलेल्या किले-ए-आर्क सारख्या स्थानिक ऐतिहासिक स्थळांचा समावेश आहे आणि राजवाड्यातील मनोरंजक घटनांचे वर्णन केले आहे. २०१५ मध्ये त्यांचे 'औरंगाबादनामा' हे उर्दू पुस्तक प्रकाशित झाले'. हे पुस्तक आजही नवोदितांना शहराची ओळख करून देते. कुरेशी यांचे 'तजकिरे उजालो के' नावाच पुस्तकही प्रसिद्ध आहे. अमेरिकेमधील शिकागो उर्दू टाइम्समध्ये त्यांचा अजिंठावरचा लेख प्रकाशित झाला. जेस रस्सव व रोनाल्ड कोहन नावाच्या प्रसिद्ध लेखकांनीही रफत कुरेशी यांच्या कामावर एक पुस्तक प्रकाशित केले आहे.
 
पत्नी आणि प्रसिद्ध इतिहासकार डॉ. दुलारी कुरेशी यांच्यासमवेत एका हेरीटेजवॉकमध्ये माहिती देताना डॉ. रफत कुरेशी
 
 
फक्त लेख किंवा पुस्तकं लिहून इतिहास तरुण पिढीपर्यंत पोचू शकणार नाही याची जाणीव असल्याने दुलारी दांम्पत्यांनी 'औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी'च्या माध्यमातून निरनिराळी ऐतिहासिक स्थळे, वास्तू आणि शहराच्या जुन्या भागात हेरिटेज वॉकची कल्पना प्रत्यक्षात आणली. त्याच्या ओघवत्या भाषेमुळे शहरातील जुन्या वास्तू साक्षात बोलत असल्याची भावना निर्माण व्हायला लागली. त्यांच्या कँनडला स्थायिक झाले होते. यामुळे इतिहासप्रेमींची एक पिढी तयार झाली. हेरिटेज वॉकनंतर 'औरंगाबाद फुड वॉक'ची कल्पना त्यांनी राबवली.
 
यात जुन्या शहरातील म्हणजे बुढीलेन मधल्या ' नान खलिया 'या पदार्थाची ओळख सर्वसामान्यांना करून दिली. शहरातील अनेक वास्तू , पैठणची मंदिर, पैठणीचा व्यवसाय , वेरूळच कैलास लेण, जैन वास्तू , बुद्ध लेणी ,खाम नदी , चारठाण्याची हेमाडपंथी मंदिर ही अशी सगळी माहिती या पिढीला मिळावी या करता निरपेक्ष भावनेने हे कुरेशी दांम्पत्य धडपडत होते. छत्रपती संभाजीनगरहून कँनडाला स्थायिक होईपर्यंतही त्यांची ही धडपड सुरू होती. २०२२ मध्ये इतिहासप्रेमींच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी कुरेशी दांम्पत्यांच्या ' द ग्लोरियस औरंगाबाद' या पुस्तकाचे अनावरण झाले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार दयानंद माने उपस्थित होते.

शहर संवर्धनाची रोखठोक भूमिका
प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूंच्या इतकेच महत्त्वाचे अनेक अवशेष शहराच्या वेगवेगळ्या भागात विखुरलेले आहेत. पण आपल्या प्रशासनाला त्याची किंमत नसल्यामुळे या वास्तू धडाधड पाडून टाकण्यात आल्या. यावेळी डॉ. दुलारी आणि रफत कुरेशी यांनी त्याला कायम विरोध केला. मनपाच्या हेरिटेज कमिटीला अनेक वास्तू प्रत्यक्ष दाखवून त्या संरक्षित वास्तूंच्या यादीत समाविष्ट करण्यास भाग पाडले. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय, हिमायतबाग, बीबी का मकबरा अशा अनेक ठिकाणी झालेल्या अतिक्रमणांमुळे त्यांचा संताप होई. कित्येक ठिकाणी गैरप्रकार रोखण्यासाठी ते एकटेच धावून जात. अनेक मुद्द्यांवर कडवट विचारसरणीच्या लोकांनी त्यांना विरोध केला. पण त्यांना न जुमानता आपल्या तत्वांशी ठाम राहायचे.
 
१८ एप्रिल २०२२ रोजी जागतिक वारसास्थळ दिन होता. त्यानिमित्त स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या लोखंडी पूल येथे इको पार्क या ठिकाणी हेरीटेज वॉक आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. दुलारी कुरेशी आणि रफत कुरेशी यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पातील मंडळींना अगदी स्पष्टपणे विचारले, ' फक्त इको पार्क पर्यंतच खाम नदी नाहीये. मेहमुद दरवाजा जवळ पाहा, नदीत किती घाणीचा खच पडला आहे.,' .

खाम नदी पुनरज्जीवन करताना शहराचे सौंदर्य वाढेल असे वाटले होते. पण मेहमुद दरवाजाच जमीनदोस्त झालाय, या शब्दांमध्ये त्यांनी खंत व्यक्त केली. एकदा रफत कुरेशी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन परतत होते. त्यावेळी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाजवळची निजामकालीन भिंत जमीनदोस्त होताना दिसली. त्यांनी लगेच दखल घेत लागलीच जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि ही बाब जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून दिली.
 
पृथा वीर

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter