दुर्मिळ पुस्तकांचा खजिना : कोल्हापूरचे चांद बुक स्टॉल

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 1 Months ago
इकबाल लाड आणि त्यांचे चांद बुक स्टॉल
इकबाल लाड आणि त्यांचे चांद बुक स्टॉल

 

फजल पठाण 
 
कोल्हापूरची लाल माती जेवढी प्रसिद्ध आहे तेवढीच या मातीतल्या मराठी साहित्याची ख्याती आहे. अगदी वि.स. खांडेकरांपासून तर साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त नवनाथ गोरे यांच्यापर्यंत सर्वांनीच मराठी साहित्याची सेवा केली. ना.सी. फडके, मृत्युंजयकार शिवाजी सावंत, कादंबरीकार रणजित देसाई, कथाकार शंकर पाटील, ग्रामीण साहित्याच्या कक्षा रुंदावणारे आनंद यादव, मराठी कादंबरीविश्व समृद्ध करणारे विश्वास पाटील यांच्यासह अनेक मातब्बर लेखक या मातीने दिले. या सर्वांनीच आपल्या लेखणीने मराठी साहित्य समृद्ध केले.

आजच्या इंटरनेटच्या युगात बुकस्टोअरमध्ये जाऊन पुस्तके खरेदी करण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. यामुळे पुणे, मुंबई यांसारख्या शहरांमधील बुकस्टोअर बंद पडली आहेत किंवा तेथील ग्राहकांची संख्या कमी झाली आहे कारण सहज मिळणारी पुस्तक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतात. तर दुसरीकडे दुर्मिळ पुस्तकांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, कारण ती सहजासहजी मिळत नाहीत, आणि त्यामुळे ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरसुद्धा ती उपलब्ध नसतात. 

अशावेळी अभ्यासक आणि वाचक शोधात असतात ते दुर्मिळ पुस्तकांची जाण असणाऱ्या, हा खजिना जमा करण्याचे कसब असणाऱ्या व्यक्तींच्या. अशा अभ्यासकांचे आणि वाचकांचे पुस्तक मिळवण्यासाठीचे हक्काचे आणि आशेचे ठिकाण म्हणजे कोल्हापुरातील इकबाल लाड यांचे ‘चांद बुक स्टोअर’. लाड हे तीन पिढ्यांपासून  महाराष्ट्रभरातील अभ्यासकांची, वाचकांची दुर्मिळ पुस्तकांची भूक भागवत, नव्हे लाड पुरवत आले आहेत.  

‘चांद बुक स्टोअर’चे इकबाल लाड
गरजू व्यक्तिला इकबाल लाड दुर्मिळ पुस्तके अल्प दरात आणि कमी वेळात उपलब्ध करून देतात. दुर्मिळ पुस्तके जमा करण्याची आणि ती वाचकांपर्यंत, अभ्यासकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची धडपड वाखाणण्याजोगी आहे. या कामाकडे ते केवळ व्यवसायिक नजरेने पाहत नाही. त्यामुळेच योग्य पुस्तक योग्य व्यक्तीच्या हातात कसे पडेल याची ते आवर्जून दक्षता घेतात. ही दुर्मिळ पुस्तके पाहून अभ्यासकांच्या आणि वाचकांच्या चेहऱ्यावरचा आनंद समाधान देतो असे इकबाल लाड सांगतात.  
या व्यवसायाची सुरुवात कशी झाली याविषयी ते सांगतात, "कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी रोड येथील फुटपाथवर बसून माझे वडील चांदबाबा लाड यांनी पुस्तक खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यावेळी त्यांच्याकडे ग.दि. माडगूळकर, रा.चिं. ढेरे, रणजीत देसाई यांसारख्या लेखकांची उठबैस असायची. १९७७मध्ये ताराबाई रोड येथील दिलेल्या गाळ्यात त्यांनी ‘चांद बुक स्टोअर’ची सुरुवात केली. आज हे ठिकाणी दुर्मिळ पुस्तके आणि नियतकालीकांसाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले आहे.”

दुर्मिळ पुस्तके मिळवण्याच्या धडपडीविषयी ते सांगतात,“ पुस्तकांच्या मागणीनुसार आम्ही ती पुस्तके विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर शोधतो. काही वेळा बंद पडलेली ग्रंथालये, काहींची व्यक्तिगत ग्रंथालये आणि रद्दी डेपो अशा ठिकाणांहून आम्ही दुर्मिळ पुस्तके मिळवण्याचा प्रयत्न करतो."
 
लाड कुटुंबियांची तिसरी पिढीदेखील आता या व्यवसायात आहे. अभ्यासकांना आणि वाचकांना दुर्मिळ पुस्तके शोधून देण्यात इकबाल लाड यांचा मुलगा आकिब याचाही हातखंडा आहे. आकिब सध्या १८ वर्षांचा आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून तो वडिलांसोबत दुकानात येऊ लागला. त्यानंतर त्यालाही वाचनाची आणि पुस्तकांची गोडी लागली. 

आता इंटरनेटद्वारे आकिब ‘चांद बुक स्टोअर’ला जागतिक पटलावर घेऊन गेलाय. इंटरनेटवरील हजारहून अधिक पुस्तकप्रेमींच्या दुर्मिळ पुस्तकांच्या मागण्यांची तो नोंद घेतो आणि ती पुस्तके त्यांच्यापर्यंत माफक दरात लवकरात लवकर कशी पोहोचतील याची काळजी घेतो. सोशल मिडियाचा योग्य वापर करून तो बुक स्टोअरचा ऑनलाइन बिजनेस पूर्णपणे सांभाळतो. आठवड्यातून सोमवार आणि गुरूवार या दोन दिवशी ‘चांद बुक स्टोअर’ या व्हाट्सॲप ग्रुपवर दुर्मिळ पुस्तकांचा 'डिजिटल लिलाव'ही होतो. सोबतच Iqbal Lad या फेसबुक पेजवरून दुर्मिळ पुस्तकांची माहिती आणि विक्री चालते.  

याविषयी आकिबला विचारले असता तो सांगतो, "हा गेल्या तीन पिढ्यांपासूनचा आमचा हा व्यवसाय आहे.  ऑनलाइनही व्यवसाय सुरू करून आता चार वर्षे झालीत. कोरोनाच्या काळात व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही पुस्तक खरेदी विक्री सुरू केली. सुरुवातीला तीन ते चारच वाचक जोडले गेले होते. आज फेसबुक आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून शेकडो अभ्यासक आणि वाचक आमच्याकडे या दुर्मिळ पुस्तकांविषयी विचारणा करत असतात. पुस्तकांच्या मागणीनुसार ऑनलाइन पद्धतीने ही पुस्तके वाचकापर्यंत पोहचवण्याचा माझा प्रयत्न असतो. ऑनलाइन व्यवसायाच्यातून अनेक लेखक, अभ्यासक आणि विचारवंत आमच्याशी जोडले गेले आहेत.” 
 

इतिहासाचे आणि संस्कृतीचे अभ्यासक चिन्मय दामले दुर्मिळ पुस्तकांच्या व्यवसायाबद्दल महत्त्वाचे निरीक्षण नोंदवतात. ते  म्हणतात,"गेल्या काही वर्षांमध्ये जुनी आणि दुर्मिळ पुस्तक विकणाऱ्या विक्रेत्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. विशेषतः फेसबुक आणि व्हाट्सअप यांच्या उदयानंतर विक्रेत्यांसोबतच ग्राहकही वाढले. मात्र कोणते पुस्तक जुने आहे आणि कोणते पुस्तक दुर्मिळ आहे याचे काही निकष आहेत. केवळ पुस्तक जुने आहे म्हणून ते महत्त्वाचे असेलच असे नाही. विक्रेते बऱ्याचदा जुन्या पुस्तकांवर दुर्मिळ शिक्का मारून ती विकतात." 

इकबाल लाड यांच्या वैशिष्ट्यांविषयी बोलताना ते म्हणतात," मात्र इकबाल लाड यांसारखे पुस्तक विक्रेते दुर्मिळ आहेत. इकबाल हे पुस्तकांच्या बाबतीत अतिशय विचक्षण आहेत.  पुस्तक दुर्मिळ आहे म्हणजे नेमके काय याचा त्यांना पुरेपूर अंदाज आहे. त्यामुळे कोणतेही जुने पुस्तक दुर्मिळ म्हणत ते ग्राहकाच्या गळ्यात बांधण्याचा प्रकार त्यांच्याकडून कधीही घडत नाही. एकंदरीत विक्री कौशल्यावरून त्यांचा  महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक इतिहासाचा अभ्यास आहे हे जाणवते. त्यामुळे त्यांच्या हाती आलेल्या पुस्तकाचे महत्त्व त्यांना पुरेपूर माहित आहे. हे मला त्यांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य वाटते. " 

लाड यांच्याकडून दुर्मिळ पुस्तक खरेदीचा एक प्रसंग आठवताना ते म्हणतात,"मला एक जुने पाककृतींचे पुस्तक हवे होते. त्या पुस्तकाची पाणी झिरझिरीत होती. ते पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध नव्हते. पण तरी त्याची फोटोकॉपी काढून इकबाल लाड यांनी ते पुस्तक माझ्या अभ्यासासाठी उपलब्ध करून दिले."

इकबाल लाड यांच्या प्रामाणिकपणाबद्दल दामले सांगतात,"मला त्यांचा सर्वात महत्त्वाचा गुण वाटतं तो हाच की एखाद्या पुस्तकाचे महत्व, त्याचे स्थान याची त्यांना पुरेपूर कल्पना असते. मात्र तरीही त्या पुस्तकाची किंमत अव्वाच्या सव्वा   करून ते विकत नाहीत. अनेक विक्रेते अशी पुस्तके प्रचंड किमतीला विकतात. त्यामुळे अनेक अभ्यासकांना अशी पुस्तके परवडत नाहीत. पण  इकबाल लाड यांनी असे केल्याचे मी आजपर्यंत पाहिले  नाही. त्यांच्यासारखा प्रामाणिक  आणि विचक्षण विक्रेता दुर्मिळ म्हणावा असा आहे."
 
एरवी दुर्मिळ पुस्तकं म्हटली की विक्रीची अवास्तव रक्कम ठरलेली. मात्र लाड पितापुत्र अभ्यासकांना ग्राहकांची कोणत्याही प्रकारची अवडणुक न करता हे पिता-पुत्र अगदी योग्य दरात सर्व पुस्तके उपलब्ध करून देतात. त्यांच्या दुकानासोबतच त्यांचं घरदेखील दुर्मिळ पुस्तकांनी भरलेले आहे. अतिशय निस्पृहपणे आणि चिकाटीने मराठीची सेवा करणाऱ्या आणि वाचक, अभ्यासकांसाठी दुर्मिळ पुस्तकांचा खजिना रिता करणाऱ्या या इक्बाल आणि आकीब लाड यांना आवाज मराठीचा सलाम!
 
- फजल पठाण 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter