अमर शेख : गरिबांबद्दल पोटतिडीक असणारा मराठी बाण्याचा शाहीर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
शाहीर अमर शेख
शाहीर अमर शेख

 

२० ऑक्टोबर १९१६ ते २९ ऑगस्ट १९६९ असे ५३ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या शाहीर अमर शेख यांची आज १०७वी जयंती. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासात अमर शेख यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. शाहिरी या अस्सल मराठी सांस्कृतिक परंपरेचे ते महत्त्वाचे शिलेदार होते. आपल्या या कलेचा उपयोग त्यांनी सामाजिक जागृती, धार्मिक सौहार्द आणि मानव कल्याणासाठी केला होता. छत्रपती शिवरायांवरील त्यांचा पोवाडा एकमेवाद्वितीय म्हणावा असा आहे. शोषित वंचितांचा आवाज त्यांच्या शाहिरीतून प्रकट होतो. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले योगदान त्यांच्या मराठी संस्कृतीशी एकरूपतेची साक्षच देतो. आज अमर शेख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचा आणि जीवननिष्ठांचा वेध घेणारा विशेष लेख 'आवाज मराठी'च्या वाचकांसाठी...
- संपादक           

भारतीय स्वातंत्र्याच्या उदयकाली जी चैतन्यशाली गीते लिहिली गेली त्यांतील सर्वोत्तम गीत शाहीर अमर शेख यांनी लिहिले होते असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये.. 
हिंदी संघराज्याच्या विजयी
नेत्या घेई प्रणाम
पराधीन जगताच्या विजयी
नेत्या घेई प्रणाम। 

असा मानाचा मुजरा त्यांनी संघराज्याच्या नेत्याला केला होता; आणि गीताच्या अखेरीस फार मोठा आशावाद प्रकट केला होता-
आणि शेवटी अणु-परमाणू 
जनतेच्या सेवेला आणू 
संघसंस्कृती नवीन आणू 
संघराज्य शक्तीला वानू 
फुलवू जीवनबाग 
लावू जुन्याला आग 
नव्याजगापुढती 
नवा आळवू राग

असे भव्य स्वप्न त्यांनी रंगवले होते. जुन्याला आग लावायची, नवे फुलवायची तळमळ त्यांना लागली होती; आणि जनसेवेसाठी अणुपरमाणूची शक्ती जुंपायला ते उतावीळ झाले होते. अमर शेख यांचे रचना कौशल्य, क्रांतदर्शित्व आणि जनतेच्या अंत:शक्तीला साद घालण्याचे सामर्थ्य त्यांच्या या गीतात ओसंडून वाहताना दिसते. या गीताची मतांधांनी कधीच कदर केली नाही! अमर शेख यांच्या ललाटी ‘कम्युनिस्ट' अशी मुद्रा ठोकलेली असल्याने इतरांनी त्यांची कदर केली नाही आणि संघराज्याच्या नेत्याला त्यांनी केलेला मुजरा कम्युनिस्टांना खपला नाही! ज्या काळात हे स्फूर्तिदायक गीत रचले गेले त्याकाळात कम्युनिस्ट भारताला खरोखरीच स्वातंत्र्य मिळाले याबद्दल साशंक होते. अमर शेख यांच्या जीवनातील दोन प्रभावी दिशा या गीतात यथार्थपणे व्यक्त झाल्या आहेत. एका बाजूला ते राष्ट्रवादी होते आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांचा गहिरा उमाळा त्यांना होता. त्यामुळे कोणत्याही मतपंथाशी ते पूर्णतः कधीच समरस झाले नाहीत. लोकांचे शाहीर म्हणूनच ते राहू शकले.

संगीताच्या प्रबोधन शक्तीची जाण
बार्शीतला एक सामान्य शिक्षित गिरणी कामगार म्हणून अमर शेख यांनी जीवनातली पहिली पावले टाकली. संगीताची मुळातच त्यांना आवड. उपजीविकेव्यतिरिक्त उरणारा बराच वेळ संगीताच्या साधनेत जाई. परंतु या संगीत उपासनेला सामाजिक दिशा नव्हती. मनोरंजनाव्यतिरिक्त संगीताचा प्रबोधनासाठी उपयोग होतो या कल्पनेचा उदय त्यांच्या मनात झालेला नव्हता. परंतु श्रमिकांच्या स्थितीचा विचार करू लागल्यावर अमर शेख यांना एक नवे दर्शन घडले. संघटित श्रमिकांची शक्ती क्रांतिकारी असते याची त्यांना जाणीव झाली. 

तरुणांची मने त्या काळात राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या कल्पनेने भारून गेली होती. आम गरीब जनतेला स्वराज्य म्हणजे दोन वेळच्या भाकरीची शाश्वतीच होय, असे गांधीजी सांगत होते. भारताच्या स्वातंत्र्याचा संबंध त्यांनी सामान्य जनतेच्या जीविकेशी लावला होता. श्रमणाराची गिरणी आणि कसणाराची जमीन अशा कल्पना इंग्रजी राज्याच्या उच्चाटनाशी निगडित झालेल्या होत्या. त्या काळात अमर शेख यांच्या मनावर या विचारांचा प्रभाव होता. राष्ट्र सेवा दलात काही काळ ते होते. राष्ट्रवादी चळवळीबद्दल त्यांना आस्था होती, प्रेम होते. जागतिक युद्धातील दलितांचा वाली मानल्या जाणाऱ्या देशासाठी आपल्या स्वातंत्र्याचा हक्क खुंटीवर टांगायला ते तयार नव्हते. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीला कोणत्याही कारणाने होणारा विरोध त्यांना मानवण्याजोगा नव्हता. त्यामुळे ते त्या वेळी राष्ट्रवादी शक्तीच्या अंगाने खडे दिसले. भारतीय स्वातंत्र्याचे त्यांनी निःशंक मनाने स्वागत केले.

जळजळीत अनुभव अधिक संवेद्य
स्वातंत्र्य मिळाले, पण समाजवादाच्या दिशेने वाटचाल जोमाने सुरू झाली नाही. व्यापारी व उद्योगपती गबर बनले, सधन शेतकऱ्यांचे ऐश्वर्य वाढत गेले. अमर शेख मग त्याविरुद्ध डंका वाजवू लागले. त्यांचा पहाडी आवाज, त्यांचा आवेश, गरिबांविषयीची पोटतिडीक यांनी महाराष्ट्र दुमदुमू लागला. भाषेचा फुलोरा हे साधन आहे. जळजळीत अनुभव हाच अधिक संवेद्य असतो. त्यामुळे अमर शेख यांचे धगधगते अंतःकरण शब्दरूप येऊ लागले तेव्हा त्यातला रगदारपणा रागदारीपेक्षा अधिक लोकमताची पकड घेतो असे आढळू लागले. ढंगाहून ही पोटतिडीक हे त्यांच्या शाहिरीचे वैशिष्टय होते. समाजजीवनावरचे त्यांचे भाष्य जळजळीत असे. वर्गसंघर्षाचा त्याला पाया होता. लोकांच्या लढयाच्या वेळी शाहिरीलाही बहर यावा यात आश्चर्य नाही. संयुक्त महाराष्ट्र व गोवामुक्ती या दोन्ही आंदोलनांत अमर शेख यांनी लोकशिक्षणाची फार मोठी कामगिरी बजावली.

कम्युनिस्ट पक्षाबरोबर असूनही ते त्या पक्षाशी परिपूर्ण रीतीने समरस होऊ शकले नाहीत. त्याची कारणे दोन. एक तर बऱ्याच कम्युनिस्ट नेत्यांचा क्रांतिवाद हा कोळपलेल्या मशालीसारखा बनलेला होता. आपसातील व्यवहारांतही वर्ग-वर्ण-भेदाचा आढळ होत होता. जिलासने म्हटलेला 'नवा वर्ग' सत्ता हाती नसूनही अस्तित्वात येत असल्याची चिन्हे दिसू लागली होती. त्याचप्रमाणे चिनी आक्रमणाच्या वेळी कम्युनिस्टांना स्वतःच्या बुद्धीने निर्णय करता येईल! आक्रमण की अतिक्रमण, हा घोळ त्यांचा संपता संपेना!! हा परभृतपणा स्वतंत्र वृत्तीच्या या शाहिराला मानवला नाही आणि ते कम्युनिस्टांच्या वेटोळयातून निर्धाराने बाहेर पडले. गरिबांबद्दल पोटतिडीक आणि राष्ट्रवादी बाणा ह्या दोन पंखांवर ते भराऱ्या मारत राहिले. त्यामुळे राजकीय पक्षांनी उपेक्षा दाखवली तरी जनतेने अमर शेख यांच्यावर प्रेम केले, त्यांना सतत दाद दिली. 

अमर शेख यांना जाति-धर्म-पंथाचा तिटकारा होता. रुढींविरुद्ध त्यांच्या मनात बंडखोरी होती. विविध निधर्मी राजकीय प्रणालीचा स्वीकार करणारे मुसलमान आपल्या समाजाशी फारकत होऊ नये यासाठी समाजाच्या मूढ रीतरिवाजांना आणि प्रथांना साथ देताना दिसतात! खासगीत ह्या मूढतेबद्दल ते बोलत असले तरी समाजाचा रोष पत्करून छातीठोक भूमिका घ्यायला ते तयार नसतात. अमर शेख यांनी असा दुटप्पी धोरणीपणा कधी केला नाही. निधर्मी मानवतावादाची पताका त्यांनी अखेरपर्यंत खांद्यावर मिरवली. आपल्या पत्नीला किंवा मुलीला त्यांनी कोणत्याही धर्माची सक्ती केली नाही किंवा नाव बदलण्याचा सस्ता मार्गही कधी चोखाळला नाही. मराठमोळा जीवनाशी ते सर्वार्थी समरस झाले. मृत्यूनंतरही निधर्मी स्मशानभूमीत त्यांचे प्रेत दफन करण्यात आले. मानवता हाच धर्म ते मानीत, हे त्यांच्या मृत्यूनेही दाखवून दिले.

त्यांचे स्वतःचे औपचारिक शिक्षण फारसे झालेले नव्हते, पण नव्या पिढयांना शिक्षणाची दारे मोकळी व्हावी यासाठी आपल्या कार्यक्रमातून त्यांनी लाखो रुपये शिक्षण संस्थांना मिळवून दिले. शाहिरी हा अस्सल मराठी बाणा टिकून रहावा यासाठी नगर जिल्ह्यात शाहिरी विद्यापीठ काढण्याचा त्यांचा संकल्प होता. बोधेगावला त्यांनी त्यासाठी काही जमीनही खरेदी करून ठेवली होती. जन्मभर आपल्या नसांतील रक्तरसाला उधाण आणणाऱ्या शाहिरांना वृद्धापकाळ, आधी-व्याधी चिंता यांत घालवावा लागू नये यासाठी काही तरतूद त्यांना करायची होती. 

मनाशी अनंत स्वप्ने घेऊन ते पुन्हा भरारी घेण्यासाठी निघाले होते. अवघे त्रेपन्न तर त्यांचे वय होते. पण अचानक त्यांच्या मोटरीला पुणे जिल्ह्यात इंदापूरजवळ अपघात झाला आणि अमर शेख यांचा त्यात दुःखद अंत झाला! त्यांच्यावर महाराष्ट्राचे किती अलोट प्रेम होते ते त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी दिसून आले. अमर शेख हे नाव महाराष्ट्रात बहुत काळ दुमदुमत राहील.

(साभार- साधना साप्ताहिक, ०६ सप्टेंबर १९६९)