मुस्लीमबहुल अणुशक्तीनगरची पसंती कुणाला?

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 3 d ago
 प्रमुख दावेदार सना मलिक (डावीकडे) आणि फाहद अहमद
प्रमुख दावेदार सना मलिक (डावीकडे) आणि फाहद अहमद

 

सध्या निवडणूक अंतिम टप्यात आहे. महाराष्ट्रातील पंचवीसहून अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम मते निर्णायक ठरणार आहेत. मात्र काही ठिकाणी एकाहून अधिक पसंतीचे उमेदवार असल्यामुळे  मुस्लिम मतांचे विभाजनदेखील होण्याची शक्यता आहे. राज्यात या मुस्लिमबहुल मतदारसंघांपैकी काही लढतींकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे. हे मतदारसंघ त्यांच्या लोकप्रतिनिधींवरुन ओळखले जातात. त्यापैकीच चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे मुंबईतील अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ. 

मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघात मुस्लीम लोकसंख्या ३०% टक्के आहे. गेल्या अनेक दशकांपासून या मतदार संघावर मलिक घराण्याचा वरचष्मा राहिला आहे. २००४ पासून राष्ट्रवादीचे नवाब मलिक या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. २०२२ मध्ये शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये उभी फुट पडली. अजित पवार आणि शरद पवार यांचे स्वतंत्र गट तयार झाले. यानंतर नवाब मलिक कोणाकडे जाणार याची जोरदार चर्चा झाली. शेवटी नवाब मलिक यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि पुन्हा घड्याळ हाती घेतले. 

विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून अणुशक्तीनगर विधानसभेतून नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अजित पवार यांनी राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना उमेदवारी दिली आहे. तर शरद पवार यांच्या पक्षाने फाहद अहमद या नव्या चेहऱ्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. दोन प्रबळ पक्षांच्या मुस्लीम उमेदवारांमुळे यंदाची अणुशक्तीनगर विधानसभेची निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे. 

कोण आहेत सना मालिक? 
सना मलिक या नवाब मलिक यांच्या कन्या आहे. कोरोना काळात सामाजिक कामांमुळे त्या प्रकाशझोतात आल्या होत्या. नवाब मलिक जेलमध्ये गेल्यानंतर सना मलिक यांनी वडिलांच्या मतदारसंघाचे काम पाहिले. नवाब मलिकांच्या अनुपस्थितीत नागरिकांचे प्रश्न खोळंबू नये यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतल्याचे बोलले जाते. शिवाय सना मलिक यांच्या रहबर फाऊंडेशन ट्रस्टद्वारे गरीब-गरजूंना विविध मदत केली जाते.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून अणुशक्तीनगरची उमेदवारी मिळाल्यानंतर सना मलिक म्हणतात,  “ मी वडिलांसोबत मिळून मतदारसंघात विकासकामे केली आहेत. वडिलांच्या अनुपस्थितीत मतदारसंघ सांभाळला आहे. त्यावेळी मतदारसंघातील जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला. उमेदवारी मिळाली याचा आनंद आहे. यासोबतच माझ्या नागरिकांची माझ्यावर जबाबदारी आहे. आम्ही सर्वजण मिळून ताकदीने लढणार आहोत आणि जिंकणार आहोत.”   

कोण आहेत फाहद अहमद? 
मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अर्थात TISS मधून फहाद अहमद यांनी MPhil चे शिक्षण घेतलं आहे. फाहद अहमद यांना राजकीय वारसा घरातूनच मिळाला आहे. त्यांचे वडील जिरार अहमद अलिगडमधील समाजवादी पार्टीचे स्थानिक नेते आहेत. TISS मध्ये असतानाच फहाद यांनी विद्यार्थी आंदोलनात सहभाग घेण्यास सुरुवात केली. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना फी माफीच्या मुद्द्यासाठी त्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर CAA NRC च्या आंदोलनातही ते आघाडीवर होते. 

त्यांनी २०२२ मध्ये आमदार अबू आझमी आणि आमदार रईस शेख यांच्या उपस्थित समाजवादी पार्टीत प्रवेश केला होता. मात्र या निवडणूकीत त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आणि  अणुशक्तीनगरचे तिकीट मिळवले. फाहद यांची पत्नी आणि सिनेअभिनेत्री स्वरा भास्कर विविध सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर मत मांडण्यासाठी प्रसिद्ध आहे. ती सुद्धा फाहदसाठी जोमाने प्रचार करत आहे.

मतांच्या विभाजनामुळे मुस्लिम प्रतिनिधित्व धोक्यात येणार? 
अणुशक्तीनगर हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. या मतदारसंघात मुस्लिम आणि वंचित मतदारांचा प्राबल्य आहे. त्यामुळे या मतदारसंघातून गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम उमेदवार निवडून येत आहे. सना मलिक आणि  फाहद अहमद यांच्यात प्रमुख लढत होत आहे. त्यामुळे यावेळी या मतदारसंघात मुस्लिम मतांचे विभाजन होऊ शकते. 

सना मलिक महायुतीच्या उमेदवार आहेत. नवाब मलिकांवर आरोप झाल्यानंतर भाजप त्यांना सातत्याने विरोध करत आहेत. भाजप त्यांचा प्रचार करणार नसल्याचे पक्षातील प्रमुख नेत्यांनी जाहीरही केले आहे.  त्यामुळे भाजप आणि शिवसेना पक्षाची मते सना मलिक यांना मिळतील यांची शाश्वती नाही. याशिवाय तिसऱ्या प्रमुख पक्षाकडे पहायचे झाल्यास मनसेकडून आचार्य विद्याधर हे निवडणूक लढवत आहेत. सना मलिक आणि फाहद अहमद यांच्यात मुस्लिम मतांचे विभाजन झाल्यास याठिकाणी तिसऱ्या पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो.    

अणुशक्तीनगरचा मुस्लिम विकासापासून वंचित 
अणुशक्तीनगर विधानसभेत एकीकडे झोपडपट्टीत राहणारा वर्ग आहे. तर दुसरीकडे या मतदारसंघात BPCL, IPCL, HPCL यांसारख्या मोठ्या कंपन्या आहेत. याविषयी बोलताना सामाजिक कार्यकर्ते आमीर काझी म्हणतात,  “अणुशक्तीनगर मतदारसंघात मोठमोठ्या कंपन्या आहेत. तरीही स्थानिक तरुणांना इथे नोकऱ्या मिळत नाहीत. प्रस्थापितांकडे आम्ही नोकरी मिळवण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर बांधून मिळावे अशी मागणी केली होती. परंतु ती मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही.” 

मतदारसंघातील परिस्थिती सांगताना ते म्हणतात,  “भौगोलिकदृष्ट्या अणुशक्तीनगर हा मोठा मतदारसंघ आहे. मात्र याठिकाणी चांगल्या शाळा, कॉलेज नाहीत. देशाचे भविष्य असलेली पिढी नशेच्या विळख्यात अडकली आहे. रस्त्याची, गटाराची कामे प्रलंबित आहेत. याठिकाणी कचरा व्यवस्थापन होत नाही. त्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण होतो. याठिकाणचे मुस्लिम आजही विकासापासून वंचित आहेत.”   

अणुशक्तीनगरचा मुस्लिम करतोय ‘हा’ विचार   
यंदाच्या निवडणुकीत ‘वोट जिहाद’चे थोतांड मतदारांच्या गळी उतरवण्याचे काम काही नेते करत आहेत. मुस्लिम हा धर्मावर आधारित मतदान करतो असा अपप्रचारही शिगेला पोहोचला आहे. याविषयी अणुशक्तीनगरचेस्थानिक मतदार रेहान पटेल म्हणतात,  “ मुस्लिम हा कायम विकासाला आणि सामाजिक एकतेला मत देत आला आहे. आम्ही उमेदवाराचा धर्म पाहून मतदान करत नाही. जो आमच्या सुरक्षेसाठी, आमच्या विकासासाठी कामे करेल आम्ही त्यांना मतदान करू.” 

पुढे ते म्हणतात,  “आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. याठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाणे राहतात. मात्र मुस्लिम हा कॉँग्रेसची वोट बँक आहे हे म्हणून झाल्यानंतर अलीकडे वोट जिहाद च्या नावाने काही प्रस्थापित नेत्यांनी मुस्लिम मतदारांना बदनाम करण्याचे काम केले. परंतु त्यांनी हे समजून घेतले पाहिजे आम्ही शिवसेना-भाजपसह सर्वच पक्षातील उमेदवारांनादेखील मतदान केले आहे आणि त्यांना निवडून आणले आहे. ” 

अणुशक्तीनगर मतदारसंघातील रखडलेली विकासकामे, बेरोजगारी, मुस्लिम समाजाची सुरक्षितता, मतदारसंघातील शिक्षणाचा दर वाढवण्यासाठी जो उमेदवार काम करेल तो निवडणूक जिंकेल. मुस्लिम बहुल मतदारसंघ असल्यामुळे मुस्लिम समाज ज्या उमेदवारच्या पारड्यात मत टाकले तो निवडणूक जिंकतो असा आजवरचा इतिहास या मतदारसंघाचा आहे. परंतु मुस्लिम मतांचे विभाजन झाले तर राजकीय समीकरणे कोणच्या पथ्यावर पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहेत.

- फजल पठाण 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter