महापरिनिर्वाणचा खरा अर्थ काय?

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

आज ६ डिसेंबर असून आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन आहे. देशभरात आजच्या दिवशी महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. हा दिवस देशभरात भीम अनुयायींसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. १९५६ मध्ये याच दिवशी दिल्ली येथील राहत्या घरी डॉ. आंबेडकर यांचे निधन झाले. त्यामुळे, या दिवसाला 'महापरिनिर्वाण दिन' म्हटले जाते. 

हा दिवस कोलंबिया आणि कॅनडा या देशात 'आंबेडकर समानता दिवस' म्हणूनही साजरा केला जातो. सध्याची तरूण मंडळी लहानपणापासून महापरिनिर्वाण शब्द ऐकत असले तरी, त्यांनाही त्याचा खरा अर्थ माहिती नसेल. त्यामुळेच आधी महापरिनिर्वाण म्हणजे काय ते जाणून घेऊयात.

बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वाचे तत्त्व आणि ध्येय म्हणजे परिनिर्वाण. परिनिर्वाण या शब्दाची फोड केल्यास त्यामागील अर्थ समजण्यास मदत होते. परिनिर्वाण या शब्दाचा अर्थ मृत्यू नंतर निर्वाण म्हणजेच मुक्ती असा होतो. बौद्ध धर्मानुसार महापरिनिर्वाण हे आयुष्याचे प्रमुख तत्व आणि ध्येय देखील आहे. संस्कृतमध्ये महापरिनिर्वाण या शब्दाचा अर्थ ‘परिणीबाना’ असा सांगितला आहे, याचाच अर्थ ‘मोक्ष’ असा होतो.

बौद्ध धर्मानुसार, जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासना आणि जीवनातील वेदनांपासून आणि जीवन चक्रातून मुक्त होतो, म्हणजेच तो आता पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही. बौद्ध धर्मातील लोक बाबासाहेबांना ‘बोधिसत्व’ मानतात. त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी ‘महापरिनिर्वाण’ हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर गेले तो दिवस
दिल्लीत अलिपूर रोड येथील निवासस्थानी निद्रावस्थेतच बाबासाहेबांचे निधन झाले. दिल्लीहून त्यांचे पाथिर्व विमानातून रात्री सव्वा तीन वाजता मुंबईत आणण्यात आले. रात्री सांताक्रूझ विमानतळावर सुमारे पंचवीस हजारांचा जमाव जमला होता. त्यानंतर अ‍ॅंम्ब्युलन्समधे त्यांचे पाथिर्व ठेवण्यात आले.

सांताक्रूझ ते दादर हे पाच मैलाचे अंतर पार करण्यासाठी तीन तास लागले होते. पाच वाजून पाच मिनिटांनी अ‍ॅंम्ब्युलन्स राजगृहापाशी आली. तेथे रात्रभर साडेतीन लाख लोक वाट पाहात होते. धीरगंभीर वातावरणात ‘बुद्धं शरणं गच्छामी’चा घोष होत होता. सव्वापाच वाजता बाबासाहेबांचे पाथिर्व अ‍ॅंम्ब्युलन्समधून उतरवण्यात आले.

अर्ध्या तासानंतर लोकांना दर्शनाची मुभा देण्यात आली. सात डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता राजगृहापासून अंत्ययात्रा निघाली. सुमारे बारा लाख लोक त्यात सामील झाले होते. सायंकाळी सात वाजता दादर चौपाटीवर बाबासाहेबांवर अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर भदन्त आनंद कौसल्यायन यांच्या हस्ते बौद्ध धम्म दीक्षा विधी झाला.आज याच चैत्यभूमीवर लाखो लोकांची मांदियाळी आहे. ते डॉ.बाबासाहेबांच्या समाधीचे दर्शन घेतात.