प्रज्ञा शिंदे
सर्व पक्षांनी आपली कंबर कसली आहे. प्रचाराला जोरदार सुरुवातही झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणे त्याचबरोबर उमेदवारी अर्ज रद्द होणे या प्रक्रियांना आता पूर्णविराम लागला आहे आणि विधानसभा निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता आपल्याला कोणत्या उमेदवाराला मत द्यायचं याच्याविषयी मतदारांमध्ये विश्लेषण सुरू आहे. विविध पक्ष आपला जाहीरनामा सादर करत आहेत तर त्याचबरोबर काही मतदारही त्यांच्या प्रश्नांचा आणि अपेक्षांचा जाहीरनामा उमेदवारांसमोर सादर करत आहेत. त्यापैकीच एका जाहीरनाम्याने सगळ्यांच लक्ष वेधलंय.हा जाहीरनामा सादर केलाय तरुण मुस्लीम सामाजिक कार्यकर्त्यांनी.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काम करणाऱ्या मुनीर शिकलगार आणि हजरत अली या तरुणांनी ३०० हून अधिक गावांमध्ये फिरून सर्वे केलाय. अल्पसंख्याक समाजातील ४५०० नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. या सर्वेच्या माध्यमातून त्यांनी मुस्लीम समाजाचे मुलभूत प्रश्न उमेदवारांपुढे मांडले आहेत.
या उपक्रमाच्या माध्यमातून सामान्य मुस्लीम मतदाराच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या. या अभिनव उपक्रमाबद्दल आवाज मराठीच्या टीमला माहिती देताना, मुनीर भाई म्हणाले, “अल्पसंख्यांक समुदायातील जनतेमध्ये शिक्षणाचे प्रमाण हे अत्यंत कमी आहे. या सगळ्यांचा विचार करून आम्ही या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली, सातारा, कोल्हापूरमधल्या जनतेशी संवाद साधला. युती आणि महाविकास आघाडीमधील उमेदवारांना अल्पसंख्यांकांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडता यावेत यासाठी आम्ही आमचा जाहीरनामा उमेदवारांना देत आहोत.”
या जाहीरनाम्यामध्ये मुस्लिम तसेच अल्पसंख्यांक समाजाच्या शिक्षणाचा, उपजीविकेचा, रोजगाराचा तसेच त्यांचे विविध हक्क आणि अधिकारासंबंधीतील विविध प्रश्न आणि त्यांच्या संरक्षणाचा मुद्दा देखील नमूद केला आहे.
या जाहीरनाम्याची गरज का भासली
मुनीर भाई म्हणतात, “गेल्या तीन निवडणुका मी बघतोय पण कुठल्याही पक्षाच्या जाहीरनाम्यात अल्पसंख्यांकांचा विचार केला जात नाही आणि त्यावर पाच वर्षाच्या अधिवेशनात कधीही बोललं जात नाही. त्याचबरोबर मुस्लिम समाजसुद्धा याबाबतीत जागृत नाही.” पुढे ते सांगतात, “ आम्हाला वाटले की आपण आता अल्पसंख्यांकांच्या प्रगतीच्या धोरणावर विचार केला पाहिजे. सरकारशी संवाद साधून यावर काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे, म्हणून आम्ही स्वतःहून 300 गावांमध्ये फिरलो.”
या तरुणांनी सर्वे केला आणि मुस्लिम समाजातील नागरिकांशी संवाद साधला. तेव्हा त्यांना शिक्षण, संरक्षण, रोजगार, वेगवेगळ्या स्कॉलरशिप अशा मुद्द्यांच्या संदर्भातील समस्यांची माहिती मिळाली. ही माहिती पक्षांतील प्रत्येक उमेदवारा पर्यंत पोहोचावी म्हणून त्यांनी या सगळ्या समस्या जाहिरनाम्याच्या स्वरुपात मांडल्या.
जाहीरनाम्यातील या सगळ्या समस्या उमेदवारांनी लक्षात घ्याव्यात. विधानसभेमध्ये त्या मांडाव्यात आणि या सगळ्या समस्यांची योग्य ती दखल घेतली जावी. अशी इच्छा जाहीरनामा उमेदवारांना देताना तरुण कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
जाहीरनाम्यातील काही महत्वाच्या मागण्या
१) अल्पसंख्याक समाजासाठी जीवीत, मालमत्ता व जातीय तणाव संदर्भात संरक्षण कायदा असावा.
२) अल्पसंख्याक समाजातील शैक्षणिक, आर्थिक व प्रशासकीय सेवेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी मौलाना आझाद प्रशिक्षण व संशोधन संस्था स्थापन करावी.
३) उद्योगांना आर्थिक सहकार्य करण्यासाठी मौलाना आझाद महामंडळास वाढीव निधी व सक्षमीकरण करणे.
४) अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना स्वतंत्र वस्तीगृह सुविधा
५) शिक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था निर्माण करणे.
उमेदवारांच्या प्रतिक्रिया
प्रत्येक पक्षातील उमेदवारांनी तरुण सामाजिक कार्यकर्त्यांच्या या कामगिरीचे कौतुक केले. तसेच त्यांनी जाहीरनाम्यातील प्रत्येक समस्या निवारण करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासनही दिले. सगळ्याच पक्षातील उमेदवारांकडून या जाहीरनाम्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अशी माहिती मुनीर भाईंनी आवाज मराठीला दिली.
मुनीर भाई म्हणाले, “मुस्लिम समाज अशा विकासाच्या मागण्या मांडतोय याचे प्रत्येक उमेदवाराने कौतुक केले.”
पुढे ते सांगतात, “महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांनी तर आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला. जो विषय आजपर्यंत कोणीही समोर आणला नव्हता तो विषय आमच्या माध्यमातून पक्षाच्या समोर उमेदवारांसमोर मांडला गेला. त्यामुळे त्यांनी आमचं कौतुक केलं.”
अनेक उमेदवारांनी या कार्यकर्त्यांना आश्वासने दिली आहेत. “आम्ही या प्रश्नांवर शंभर टक्के उपाययोजना करू. आम्ही निवडून येऊ अथवा न येऊ पण या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू.” असा सकारात्मक प्रतिसाद उमेदवारांकडून मिळाला आहे.
जाहीरनाम्यातील ठळक बाबी
तरुण सामाजिक कार्यकर्ते सांगतात, या जाहीरनाम्यात मुख्य फोकस शिक्षणावर केला आहे. आजपर्यंत मुस्लिम समाज धार्मिक गोष्टींवर बोलत होता यावेळी आम्ही शिक्षणाचा-शिष्यवृत्तांचा प्रश्न, वस्तीगृहांचा प्रश्न, मार्टीसारखी स्वायत्त संस्था संबंधीतील प्रश्न मांडले आहेत. यांसारख्या प्रश्नांवर आजपर्यंत कोणीच बोलत नव्हतं. हा प्रश्न खरंतर पंधरा-वीस वर्षांपूर्वीच विचारला गेला पाहिजे होता किंवा तो प्रकाश झोतात आला पाहिजे होता. आता आम्ही आमच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून अनेक उमेदवारांसमोर हे प्रश्न मांडले आहेत.
मुस्लिम मतदारांचा ट्रेंड
लोकसभेनंतर हे सामाजिक कार्यकर्ते ३०० गावांमध्ये फिरले. सांगली, सातारा आणि कोल्हापूरच्या आसपासच्या परिसरातील ही गावे होती. लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला भरभरून मते मिळाली. मात्र विधानसभेत हा ट्रेंड दिसत नसल्याची माहिती या कार्याक्रत्यांनी दिली.
कार्यकर्ते सांगतात, “तीनशे गावात आम्ही फिरलो, त्यातील आम्ही काही शहरी भागातही गेलो आणि खेडेगावातही गेलो. महानगरपालिकेच्या भागातही गेलो. त्यामुळे आम्हाला एक गोष्ट जाणवली की मोठमोठ्या पक्षांनी यावेळी मुस्लिम उमेदवारांकडे लक्ष दिलेले नाही. मुस्लिम उमेदवारांना तिकीट ही दिलेल नाही. त्यामुळे मुस्लीम समाजात नाराजी आहे.”
पुढे ते म्हणतात, “ आम्हाला एक गोष्ट जाणवली की मुस्लिम समाज यावेळी जो उमेदवार त्यांना मदत करेल, जो उमेदवार त्यांचे प्रश्न सोडवील, जो उमेदवार त्यांना रोजगार उपलब्ध करून देईल, अशाच उमेदवारांना मत देण्याकडे त्यांचा कल आहे.”
महाविकास आघाडीने लोकसभेत भरघोस मते मिळाल्यामुळे विधानसभेमध्ये मुस्लिम मतांना ग्राह्य धरल आहे आणि त्यामुळे थोडसं महाविकास आघाडीकडून मुस्लिम समाजाकडे दुर्लक्ष ही झालेले आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीचा आणि मुस्लिम समाजाचा संपर्कही कमी झालेला आहे. असे चित्र या कार्यकर्त्यांना संबंधित परिसरात आढळून आले.
कसा असावा आदर्श उमेदवार
मुस्लिम मतदारांचा मतदान करण्याचा पहिला निकष आहे उमेदवार हा मध्यम मार्गी असला पाहिजे. मध्यम मार्गी म्हणजे कुठल्याही प्रकारची जहाल भूमिका न घेता सद्विवेकाने निर्णय घेणारा आणि मुस्लिमांना समजून घेणारा असेल त्याच उमेदवाराला मुस्लिमांची मते जातील.
मुस्लिम समाजाच्या शिक्षणाचा, रोजगाराचा, आरोग्याचा आणि संरक्षणाचा प्रश्न जो उमेदवार सोडवेल त्याच उमेदवाराला यावेळी मुस्लिम समाज आपलं मत देणार आहे. ईदगा, सामाजिक सभागृह, शादी खाना असे जे सामाजिक कार्यक्रमासाठींचे स्थळ आहेत त्या स्थळांसाठी जो भरभरून मदत करेल असा उमेदवार त्यांना हवा आहे.
जाहीरनाम्याच्या अमंलबजावणीमुळे मुस्लिम समाजामध्ये कोणते सकारात्मक बदल घडतील
-
साक्षरतेचे प्रमाण वाढेल
-
रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील
-
उपजीविकेचे प्रश्न सुटतील
-
मुलांना योग्य शैक्षणिक संधी मिळतील
-
आरोग्य सुधारेल
-
मुलभूत गरजांच्या पुर्ततेमुळे राहणीमानाचा दर्जा सुधारेल
-
राजकीय, सामाजिक आणि आर्थिक, शैक्षणिक विकास होईल
एकंदरीत मुस्लिम समाजाला गृहीत धरणे हे प्रत्येक पक्षाच्या उमेदवारासाठी सध्या आव्हान बनलेले आहे. मुस्लिम समाज पक्ष पाहून नाही तर उमेदवाराचे काम पाहून त्याला मतदान करणार आहे.
सांगली, सातारा आणि कोल्हापूर या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मतदाराचा जाहीरनामा सादर करून पारंपारिक मतदान करण्याच्या प्रथेला पूर्णविराम दिलेला आहे. त्यामुळे यंदा वैचारिक पद्धतीने मतदान होईल याची सुरुवात झालेली दिसत आहे.