इस्राईल आणि हमासमधील दमलेल्या युद्धाची गोष्ट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 7 d ago
अखेर युद्धविराम, १५ महिन्यांनंतर गाझामध्ये शांतता नांदणार
अखेर युद्धविराम, १५ महिन्यांनंतर गाझामध्ये शांतता नांदणार

 

इसाईल-पॅलेस्टाईन युद्धात झालेली 'शस्त्रसंधी' स्वागतार्हच. पण सव्वादोन वर्षांच्या विध्वंसानंतर सुचलेला शहाणपणा आधीच का सुचला नाही?

इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील सोळा महिने सुरू असलेला सशस्त्र संघर्ष थांबण्याची शक्यता हा केवळ पश्चिम आशिया क्षेत्रालाच नाही, तर जगासाठीच दिलासा आहे. या युद्धात झालेल्या भयंकर विनाशाची काळपट छाया क्षितिजावरून लगेच दूर होणे केवळ अशक्य आहे; परंतु उशिरा का होईना दोन्ही बाजूंना थांबण्याचे शहाणपण सुचले हो काही कमी महत्वाची गोष्ट नाही. हा उशीर होण्याचे एक कारण म्हणजे युद्ध हे देशांतर्गत राजकारणाचे हत्यार बनवले गेले. इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या इस्राईलमधील राजवटीविषयी तेथील सर्वसामान्य लोकांत नाराजी होती. न्यायालयासह सर्व घटनात्मक संस्था त्यांनी स्वतःच्या दावणीला बांधण्याचा खटाटोप चालविला होता. परंतु देशाच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला की अंतर्गत बाद पांघरुणाखाली ढकलले जातात, हे हेरून त्यांनी युद्धाची व्याप्ती वाढवली. 

सात ऑक्टोबर २०२३ ला 'हमास ने अचानक केलेल्या दहशतवादी हल्ल्यात इस्राईलचे सैनिक आणि नागरिक मिळून बाराशे व्यक्ती मृत्युमुखी पडल्या, तर त्यानंतर गाझा भागात इस्राईलने सव्वा वर्ष चालविलेल्या भयंकर होरपळीत मरण पावलेल्यांची संख्या पंचेचाळीस हजारांहून अधिक असल्याचे सांगण्यात येते. उत्तर गाझा प्रांतात पडक्या अवस्थेतील एक रुग्णालय कसेबसे सुरू आहे. तो अपवाद सोडला तर तिथल्या बहुतेक रुग्णालयांचा विध्वंस झाला आहे. चोवीस लाख लोक घरेदारे सोडून गेले. जीव मुठीत धरून छावण्यांमध्ये आश्रय घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. गाझापट्टीतील पडझड एवढी भीषण आहे की तेथे तयार झालेल्या राडारोड्याचा ढोग हलवणे हे अत्यंत कठीण काम मदतपथकांना करावे लागणार आहे. पुनर्बाधणीसाठी किमान पाच वर्षे लागू शकतात. 

शस्त्रसंधी कराराला अखेर इस्त्रायली मंत्रिमंडळानेही मंजुरी दिल्याने इस्राईलच्या 'हमास'ने ओलीस ठेवलेल्या नागरिकांची आणि इस्राईलच्या ताब्यातील पॅलेस्टिनी कैद्यांची मुक्तता होत असून जर सर्व काही नीट पार पडले, तर शस्त्रसंधीच्या पलीकडे जाऊन इथल्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी वाटाघाटी होऊ शकतात आणि अधिक काळासाठी शांततेचा मार्ग मोकळा होऊ शकतो. पण इतक्या दीर्घकाळानंतर सुचलेले शहाणपण आधीच का सुचले नाही, हा प्रश्न उपस्थित होतो.

एकीकडे पारंपरिक युद्धे ही आता कालबाह्य झाली आहेत, असे वाटत असतानाच या धारणेच्या चिंध्या उडवल्या त्या आधी रशियाने युक्रेनवर हल्ले करून आणि हमास'च्या दहशवादी हल्ल्याला उत्तर देताना इस्राईलने पॅलेस्टाईनविरुद्ध सर्वंकष युद्ध सुरू करून, अखेर शस्त्रसंधीच्या प्रयत्नांना यश आले, याचे मुख्य कारण अर्थातच दोन्ही बाजूंना पोचलेली झळ हे तर आहेच; परंतु ठळक जाणवणारी बाब ही इसाईलची एका अर्थाने झालेलो दमणूक हे आहे. तेथील उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करता इतक्या दीर्घकाळ संघर्ष चालू ठेवणे इस्राईलला परवडणारे नव्हते. शिवाय एका आघाडीपुरते युद्ध मर्यादित न ठेवता इस्राईलने लेबेनॉन, इराण येथपर्यंत संघर्ष नेला. एकाचवेळी हे तेवढ्याच तीव्रतेने चालू ठेवणे सोपे नव्हतेच. तरीही त्या देशात शस्त्रसंधीच्या विरोधात मोर्चे वगैरे निघाले. 

काही कट्टर उजव्या गटांनी शस्त्रसंधी ही माघार असल्याचा सुर लावला. परंतु या विरोधाचा निर्णयावर काही परिणाम झालेला नाही. अमेरिकेचे मावळते अध्यक्ष ज्यो बायडेन आणि नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही शस्त्रसंधी व्हावी यासाठी प्रयत्न केला. कतारने हमासशी चर्चा केली तर अमेरिकी नेतृत्वाने इस्राईलकडे आपले वजन वापरले. त्यातून शस्त्रविराम साध्य केला. परंतु हा काही अंतिम तोडगा नव्हे. खदखदणारा ज्वालामुखीसारखा द्वेष हे तिथे सातत्याने चाललेल्या संघर्षाचे कारण आहे. प्रत्येक युद्धाला काही ना काही राजकीय उद्दिष्ट असते. ते साध्य झाल्यावर थांबायचे असते, पण पश्चिम आशियातील संघर्षात इस्राईलचे उद्दिष्ट आपल्या राष्ट्र म्हणून अस्तित्वाला खऱ्या अथनि अधिमान्यता (लेजिटिमसी) मिळणे हे आहे.

 'हमास 'सारखे दहशतवादी गटच नव्हे, तर इतर आखाती देशांतील बऱ्याच जणांना इस्राईल नकाशावरून नाहीसे झाले तरच या क्षेत्रात शांतता नदिल, असे वाटते. पाश्चात्य देशांनी आमच्या भूमीवर लादलेला हा यहुदींचा देश आहे, अशी त्यांची भावना आहे. हे नेहमीच नाकारले जाणे इस्राईलला सतत युद्धसज्ज राहायला भाग पाडते. जोवर ही खदखद कायम आहे, तोवर कायमस्वरूपी तोडगा निघणे कठीण आहे. पॅलेस्टाईनच्या राजकीय आकांक्षांना प्रतिसाद देणे, तो स्वतंत्र, सार्वभौम देश स्थापन होणे आणि इस्माईलचे देश म्हणून अस्तित्व पॅलेस्टाईन आणि इतरही आखाती देशांनी मान्य करणे, या दिशेने जेव्हा ठोस प्रयत्न होतील, तेव्हाच खऱ्या अथनि येथे शांतता आणि स्थिरता निर्माण होईल, त्यासाठी प्रयत्न कोण आणि कसे करणार, हा खरे तर मध्यवतीं प्रश्न आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter