मुंबईतील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे मुंब्रा कळवा मतदारसंघ. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या तिन टर्मपासून या मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड निवडून जात आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत काही लक्षवेधी लढती होत आहे. त्यापैकीच एक लढत म्हणजे जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वेगळे ट्रेंड पहायला मिळत आहे. त्यापैकी एक म्हणजे प्रस्थापित नेत्यांविरुद्ध तरुण पिढी निवडणुकीच्या रिंगणात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुस्लिम चेहरा म्हणून नजीब मुल्ला हे प्रमुख दावेदार आहेत.
मुंब्रा-कळवा विधानसभा
राज्यातील इतर मुस्लिम बहुल भागांप्रमाणे मुंब्रा कळवा मतदारसंघातदेखील मुस्लिम मतदारांचे प्राबल्य आहे. या मतदारसंघात ४२ % मतदार मुस्लिम समाजाचे आहेत. नागरी विकास आणि विस्तीर्ण झोपडपट्टी अशा अनोख्या मिश्रणासाठी हा मतदारसंघ ओळखला जातो. मतदारसंघाच्या ओळखीविषयी बोलताना मुंबई विद्यापीठचे पॉलिटिकल विषयाचे सिनियर रिसर्च स्कॉलर शेहबाज मनियार म्हणतात, “ १९९३ नंतर जे बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर मुंब्रा शहर वसले आहे. याठिकाणी सध्या उत्तर भारतीय मुस्लिमांची लोकसंख्या जास्त आहे. पूर्वी याठिकाणी कोकणी मुस्लिमांचे गाव होते. बदलत्या काळात उत्तर भारतीय मुस्लिम या मतदारसंघात येऊन राहिले.”
कोण आहेत नजीब मुल्ला?
नजीब मुल्ला यांनी शिक्षण घेत असताना विद्यार्थी चळवळीमध्ये सहभाग घेतला. राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी २००० ते २००५ मध्ये ठाणे जिल्हाचे राष्ट्रवादीचे विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केले. तसेक २००२ मध्ये ते ठाणे महानगरपालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. तेव्हापासून २०२२ पर्यंत सलग चार वेळा महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले.
नजीब मुल्ला यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव, ठाणे महानगरपालिका विरोधी पक्षनेता, गटनेता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ठाणे जिल्हाध्यक्ष अशी अनेक पदे भूषवली आहेत.
जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला
विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला आहे. पुढील दोन दिवसात महाराष्ट्रातील मतदान पार पडणार आहे. मुंब्रा विधानसभेत अनेक नवीन राजकीय समीकरणे तयार होत आहे. नजीब मुल्ला हे जितेंद्र आव्हाड यांचे एकेककाळचे अत्यंत जवळचे सहकारी होते. नजीब मुल्ला हे जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक मानले जायचे. परंतु राष्ट्रवादीमध्ये उभी फुट पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले. तर नजीब मुल्ला यांनी अजित पवारांची साथ घेतली. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या प्रचारा दरम्यान एकमेकांवर टीका केली.
जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यपद्धतीवर बोलताना नजीब मुल्ला म्हणतात, “ जितेंद्र आव्हाड हे गेली १५ वर्ष आमदार आहेत. बऱ्याचवेळा ते मंत्री देखील राहिले आहेत. त्यावेळी त्यांनी एकही योजना मतदारसंघात आणली नाही. शरद पवारांना सांगायचे एक आणि मागून करायचे दुसरे असे ते करतात.”
मुस्लिम तरुणाई आणि त्यांचे प्रश्न
मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्नांवर आवाज मराठीने आवाज उठवला आहे. राज्यातील इतर भागांप्रमाणे या मतदारसंघात देखील मुस्लिम समाजाचे प्रश्न दुर्लक्षित आहेत. याविषयी बोलताना सामाजिक कार्यकर्ते असद मोमीन म्हणतात, “ मुंब्रा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मुस्लिम तरुणाई बेरोजगार आहे. याठिकाणी शाळा आणि विद्यालयांचा प्रश्न प्रलंबित आहेत. आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याठिकानच्या वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे. तसेच येथील मुस्लिम समाजाचे सामाजिक प्रश्न आहेत. ज्यांना वाचा फोडणे आवश्यक आहे. मुस्लिम समाजाच्या प्रश्नावर बोलणे आवश्यक आहे.”
मुंब्राचा मुस्लिम यंदा कोणाला कौल देणार ?
पक्षातील फूटीनंतर लोकसभा निवडणुकीत अजित पवारांवर अल्पसंख्यांक विशेषतः मुस्लिम समाज नाराज असल्याची चर्चा झाली. विधानसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवत अजित पवार सातत्याने मुस्लिम समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसले. मुस्लिम मतांची गोळाबेरीज करण्यासाठी अजित पवार यांनी इद्रीस नायकवडी यांना विधानपरिषदेवर संधी दिली. आताही मुंब्र्यासारख्या मुस्लिम बहुल भागाचा मुस्लिम मतांचा विचार करून अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर नजीब मुल्ला यांचे आव्हान उभे केले आहे.
तर दुसरीकडे मुस्लिम समाज आणि जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी बोलताना स्थानिक कार्यकर्ते अस्लम खान म्हणतात, “ जितेंद्र आव्हाड यांनी नेहमी मुस्लिमांच्या बाजूने, पुरोगामी भूमिका घेतलेली नाही. तसेच त्यांनी मतदारसंघात अनेक कामे केली आहेत. आमच्यासाठी ते कायम तत्पर असतात. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम समाज जितेंद्र आव्हाडांना साथ देत आला आहे.”
मुस्लिमांप्रति भूमिका आव्हाडांना फायदेशीर ठरणार ?
राजकारण करत असताना सर्व पक्ष, नेते त्यांच्या विशिष्ट विचारधारेने काम करतात. स्वतःची आणि पक्षाची भूमिका मांडतात. बहुतांशी समाज हा त्यांच्याभूमिकांचा केंद्रबिंदु असतो. जितेंद्र आव्हाड यांच्या मुस्लिमांप्रति असणाऱ्या भूमिकेविषयीबोलताना रिसर्च स्कॉलर शेहबाज मनियार म्हणतात, “ मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर जितेंद्र आव्हाड स्पष्टपणे स्वतःची भूमिका मांडत आले आहेत. फुले, शाहू, आंबेडकरांचा पुरोगामी वारसा ते सांगता आणि प्रखरपणे भाजप ला विरोध करतात. तसेच मुस्लिम समाजाला ते विविध अडचणींमध्ये मदत करतात. मुस्लिमांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात.”
पुढे ते म्हणतात, “ गेल्या काही दिवसात एका ट्रेनमध्ये मुस्लिम वृद्ध व्यक्तीला काही तरूणांकडून मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपींना बेल मिळाली होती. परंतु जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची बेल रद्द करत मुस्लिम समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.”
राजकीय घडामोडींचे अभ्यासक स्वप्नील बनसोडे म्हणतात, “ जितेंद्र आव्हाड हे संविधानिक मार्गाने त्यांची भूमिका मांडतात. पुरोगामी विचारातून ते सर्वसमावेशक भूमिका मांडतात. मुस्लिम समाजाला त्याची सर्वसमावेशक भूमिका पटते. त्यामुळे ते गेल्या तिन टर्म निवडून येत आहेत.”
पुढे ते म्हणतात, “मुस्लिम समाजाचे सध्याची सामाजिक स्थिति ही चिंताजनक आहे. मुस्लिमांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा झाला आहे. भाजप सारख्या काही विशिष्ट संघटना खुलेआम मुस्लिमांना टार्गेट करताना दिसत आहेत. मुस्लिम समाज सध्या ‘भाजप हटावो’ या भूमिकेवर दिसतो. नजीब मुल्ला युतीमध्ये असल्यामुळे मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होणार नाही. तसेच मुस्लिम समाज यंदाच्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात महत्वाची भूमिका बजावणार हे नक्की आहे.”
मुस्लिम उमेदवार आव्हाडांचा फायदा करणार?
आगामी विधानसभेत मुस्लिम मते निर्णायक ठरणार आहेत हे वारंवार सांगितल जात आहे. परंतु तितक्याच प्रमाणात मुस्लिम मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. मुंब्रा मतदारसंघाचा विचार केला तर राष्ट्रवादीने नजीब मुल्ला आणि एमआयएमने मुस्लिम उमेदवार दिला आहे. जितके जास्त मुस्लिम उमेदवार तितके जास्त मुस्लिम मतांचे विभाजन होऊ शकते.
याविषयी बोलताना शेहबाज मनियार म्हणतात, “या मतदारसंघात काही पक्षांनी पूर्वीदेखील मुस्लिम उमेदवार दिले आहेत. यावेळी देखील दोन मुस्लिम उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मात्र याठिकानच्या मुस्लिम उमेदवारांमध्ये वाद निर्माण होतात. मुस्लिम हा कोणत्याही एका व्यक्तीला मतदान करत नाही. यामुळे मुस्लिम मतांचे विभाजन होते. मुस्लिम मतांच्या विभाजनामुळे जितेंद्र आव्हाड यांचे मताधिक्य कमी होऊ शकते.”
मुंब्रा कळवा मतदारसंघात यंदा राजकीय समीकरणे वेगळी आहेत. मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग नजीब मुल्ला यांच्याकडे वळत आहे. भाजपसह शिंदेंची शिवसेना नजीब मुल्ला यांचा प्रचार करत आहे. महाविकास आघाडी जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी उभी आहे. परंतु एकेकाळचा खंदा समर्थक नजीब मुल्ला जितेंद्र आव्हाडांना कडवी झुंज देणार का? मुंब्र्याची जनता यंदा कोणाला कौल देणार याकडे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
- फजल पठाण
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter