ISISची दहा वर्षे : भूमी गमावली पण प्रभाव कायम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 6 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

इसिस या दहशतवादी संघटनेने इराक आणि सीरियामध्ये हिंसाचाराचे थैमान घालत ‘खिलाफत’ घोषित केल्याच्या घटनेला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, दरम्यानच्या काळात या संघटनेने त्यांच्याकडील बहुतांश भूमी गमावली आहे. तरीही, इसिसची दहशत अद्याप कायम असून या संघटनेने आफ्रिका खंडात आपला प्रभाव वाढविण्यास सुरवात केली असल्याचे विविध सर्वेक्षणांमधून दिसून आले आहे.

या संघटनेच्या मागील दहा वर्षांतील घडामोडींचा हा थोडक्यात आढावा :
इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी याने २०१४ मध्ये स्वत:ला खलिफा घोषित केले होते. थेट संघर्ष करण्याचे धोरण त्याने स्वीकारत बराच मोठा भूभाग संघटनेच्या टाचेखाली आणला. तो स्वत:ला जगातील सर्व मुस्लिमांचा नेता म्हणवून घेऊ लागला. त्याच्या या घोषणेमुळे इसिसमध्ये कट्टरतावादी मुस्लिम युवकांची भरती होण्याचे प्रमाण वाढले.
 
हे युवक केवळ आखाती आणि मुस्लिमबहुल देशांमधूनच नाही तर, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेमधूनही आले होते. ‘इसिस’ची ताकद वाढल्याने विरोधही तीव्र झाला आणि ऑक्टोबर २०१९ मध्ये बगदादी मारला गेला. यानंतर संघटनेने पुन्हा एकदा आपले धोरण बदलले असून विचारसरणीचा प्रसार करणे आणि छोट्या गटांद्वारे हल्ले करणे, यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या या धोरणाला आफ्रिकेतील युवक बळी पडत असल्याचे सध्याचे चित्र आहे.
 
इराक आणि सीरियामध्ये इसिसचा पराभव झाल्यानंतर आफ्रिकेतच कारवाईचे केंद्र हलविण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्याचा परिणाम म्हणून सप्टेंबर २०२१ पर्यंत इसिसने लीबिया, अल्जीरिया, सिनाई, पश्‍चिम आफ्रिका, सोमालिया आणि मध्य आफ्रिकेमध्ये आपले बस्तान बसविले. त्यामुळेच, मागील नऊ वर्षांपासून इसिस ही आफ्रिकेतील सर्वांत धोकादायक दहशतवादी संघटना आहे.

काय बदल झाला?
आफ्रिकेत २०१७ पर्यंत दहशतवादाविरोधात कारवाई करताना बोको हराम आणि इतर छोट्या संघटनांवर कारवाई केली जात असे. इसिसचा प्रभाव वाढल्यामुळे कारवाईचे क्षेत्र वाढून ती एका देशापुरती मर्यादित न राहता ती प्रादेशिक पातळीवर करावी लागत आहे. इसिसने इतर अनेक संघटनांना हाताशी धरल्याने दहशतवादी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. असंतोष, समर्थकांचे जाळे, दिशाभूल करण्याची क्षमता असलेली विचारसरणी आणि राजकीय वातावरण या चार बाबी दहशतवाद फोफावण्यासाठी पोषक ठरतात. हे वातावरण आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये मिळत असल्याने प्रत्यक्ष जमिनीवर ताबा न मिळवताही इसिसचा प्रभाव वाढला आहे.

भविष्यातील धोका
इसिसचा सामना करण्यासाठी आफ्रिकेतील देशांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त होत आहे. अमेरिकेसह पाश्‍चिमात्य देशांवर आफ्रिकेतील देशांचा फारसा विश्‍वास नसणे, ही अडचणीची बाब ठरू शकते. तसेच, या देशांनी कारवाई करण्यास सुरुवात केली तर इसिसकडून हल्ल्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे, जनजागृती करून शाश्‍वत धोरण राबविण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.