निखिल श्रावगे
दोन वर्षांहून अधिक काळ चाललेले रशिया-युक्रेन युद्ध आणि दीड वर्ष सुरू असलेल्या इसाईल-गाझा संघर्षात इराण आणि रशिया पूर्णपणे गुंतले गेले आहेत. स्वतःचे घर जळत असताना त्यांनी असद यांच्या संरक्षणाला तितके प्राधान्य दिले नाही. हीच वेळ साधून हयात तहरीर अल्-शमने असद यांच्या नियंत्रणाखाली असलेला प्रदेश केवळ १५ दिवसांत आपल्या ताब्यात घेतला.
सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांच्या राजवटीचा विरोध करणाऱ्या दहशतवादी गटांनी तेथील अलेप्पो, हमा आणि होम्स शहरांचा ताबा घेतला असून असद यांच्या लष्कराला पळवून लावले आहे. ही तीन शहरे आपल्या ताब्यात घेतल्यानंतर या दहशतवादी गटांनी आपला रोख राजधानी दमास्कसकडे वळवत असद यांना परागंदा व्हायला भाग पाडले आहे. एक दशकाहून अधिक काळ चाललेल्या या गृहयुद्धात महा प्रयत्न करून असद यांनी आपली खुचीं राखली होती. दमास्कस विरोधकांच्या हातात पडल्यामुळे आता त्यांना खुर्ची सोडावी लागली आहे. असद यांचे रक्षण करणारे रशिया आणि इराण हे दोन्ही देश वेगवेगळ्या युद्धात गुंतलेले असताना असद स्वतःचा बचाव करू शकले नाहीत. आता सीरियात निर्नायकी माजल्यास, सोरिया आणि आसपासचे देश नव्याने अस्थिरतेच्या वाटेला लागतील. या शक्यतेचे विवेचन करणे म्हणूनच गरजेचे आहे.
अरब देशांमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्याच्या इराद्याने २००९-१० पासून जनआंदोलन सुरू झाले. ट्युनिशिया, लिबिया, इजिप्तचे राष्ट्रप्रमुख विखारी होत चाललेल्या जनभावनेला घाबरून सत्ता सोडून पळून गेले होते. मार्च २०११ मध्ये सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांच्या विरोधात निदर्शन सुरू झाली. ती चिरडून टाकायच्या विचाराने असद यांनी लष्कराला पाचारण करीत हिंसेचा मार्ग स्वीकारला. शिया पंथाच्या अलवाईत उपपंथाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या असद यांना सुन्त्री गटाकडून मोठा विरोध झाला. या गृहयुद्धाच्या बहरात सीरियात छोट्या-मोठ्या दहशतवादी टोळ्यांची संख्या जवळपास ७० होती. या सगळ्या गुंत्यात 'आयसिस' सारख्या अतिजहाल गटाने दहशतीचा भस्मासुर निर्माण केला. बेधुंद हिंसक बेबंदशाहीपुढे संपूर्ण देश बेचिराख झाला. अर्थव्यवस्था, व्यापार, पर्यटन, रोजगार आणि शांततेने चारच वर्षांत मान टाकली. विरोधकांचा रेटा इतका होता, की २०१५ च्या सुमारास राजधानी दमास्कस आणि भोवतीचा निवडक प्रदेश सोडल्यास असद यांचा एकूण कारभार आटोपल्यात जमा होता. त्याचवेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी या युद्धात उडी घेत त्यांना वाचवले. या मदतीमुळे असद यांनी २०१५ नंतर विरोधकांची थेट कत्तल सुरू करत आपली गादी शाबूत ठेवली. वेळप्रसंगी त्यांनी वयस्कर, महिला, लहान मुले यांचा विचार न करता, कधी विषारी वायूची मदत घेत, आपला सत्तामार्ग सुकर केला. हा सगळा प्रकार अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामांच्या कार्यकाळात झाला.
२०१६ मध्ये सत्तेत आल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'आयसिस' विरोधी आघाडी उघडत या टोळीचा बंदोबस्त करायला सुरुवात केली.सीरियातील रक्का आणि इराकमधील मोसुल शहरातून 'आयसिस'ला पळवून लावण्यात आल्यानंतर २०१९ मध्ये अमेरिकी आघाडी फौजांनी तिचा म्होरक्या अबू बकर अल बगदादीला मारले. २०२० नंतर बाकी देशांचा सीरियातील रस संपला. रशिया, इराणने असद लष्कराला प्रशिक्षण देऊन, स्वतःची थोडी कुमक ठेवत सीरियातून बाहेर पडणे पसंत केले.
युक्रेन रशिया युद्धामुळे सीरियाची परिस्थिती मुख्य बातम्यांमधून गायब झाली. मात्र, याच सुमारास असदविरोधी गटाची हालचाल वाढू लागली. त्यांच्या राजवटीला विरोध करणारा हयात तहरीर अल-शम हा दहशतवादी गट शांततेत तयारी करून योग्य वेळेची प्रतीक्षा करू लागला. दोन वर्षांहून अधिक काळ चाललेले रशिया युक्रेन युद्ध आणि दीड वर्ष सुरू असलेल्या इस्राईल गाझा संघर्षात इराण आणि रशिया पूर्णपणे गुंतले गेले आहेत. स्वतःचे घर जळत असताना त्यांनी असद यांच्या संरक्षणाला तितके प्राधान्य दिले नाही. हीच वेळ साधून हयात तहरीर अल-शमने असद यांच्या नियंत्रणाखाली असलेला प्रदेश केवळ १५ दिवसांत आपल्या ताब्यात घेतला. रशिया आणि इराणची अडचणीची परिस्थिती हेरून अमेरिकेने या गटाला बळ दिल्याचे बोलले जात आहे. त्याच्या झंझावातापुढे असद लष्कराने नांगी टाकली. ताज्या बातमीनुसार असद यांनी देश सोडला असून ते रशियात राजकीय आश्रय घेत आहेत. असद यांच्या रूपाने पश्चिम आशियात शिरकाव मिळालेल्या पुतीनना हे परवडण्यासारखे नाही. तसेच, यामुळे सीरिया, लेबेनॉनमधील हेजबोल्लाह, इराकमधील इराण पुरस्कृत सरकार आणि अंतिमतः इराण या शिया गटाच्या चौकोनाला तडा गेला आहे. आधीच पिछाडीवर गेलेल्या इराणला सीरियातील ही घडामोड आणखी प्रभावहीन करेल.
आपले सिंहासन वाचवण्यासाठी असद कोणत्या थराला जाऊ शकतात हे त्यांनी गृहयुद्धात अमानुषपणे दाखवून दिले होते. १९६३ पासून सीरियातील सत्तेच्या गाभाऱ्यात राहिलेले हाफिज अल-असद आणि वर्ष दोन हजार मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर आजपर्यंत अध्यक्ष म्हणून वावरणारा त्यांचा मुलगा बशर यांनी सीरियात आपल्या कुटुंबाची हुकमत कायम ठेवली होती. हे करत असताना त्यांनी विरोधकांना व्यवस्थेत जागा दिली नाही. समाजातून टोकाचा विरोध होऊनही ते पायउतार व्हायला तयार नव्हते. वर्चस्वाची भूक हा असद घराण्याचा स्थायिभाव राहिला होता. असद यांच्या पाडावाचा आनंद मावळल्यानंतर, इतकी वर्षे कोपऱ्यात पडलेले इतर समाजघटक आता सीरियातील शासनावर आपला हक्क सांगतील.
हुकूमशाहीने उभे न राहू दिलेले नवे नेतृत्त्व आणि अन्याय झाल्याची प्रत्येक समाजाची भावना आता सत्तेसाठी मारामारी करेल. हा सगळा प्रकार कसे वळण घेतो हे जगाने पश्चिम आशियात मागील दोन दशकांमध्ये पाहिले आहे. त्यामुळे, सीरियाचा 'इराक' होईल हे स्पष्टपणे दिसते. २०११ नंतर आजतागायत सीरियात सुमारे पाच लाख लोकांचा मृत्यू झाला असून, सुमारे सात लाख लोक जखमी झाले आहेत. युद्धपरिस्थितीला कंटाळून अंदाजे ८० लाख लोकांनी देश सोडला आहे. तुर्कस्तान, इजिप्त, युरोपमध्ये जाऊनही विस्थापितांचे फाटके आयुष्य त्यांच्या नशिबी आले आहे. सीरियात मागे राहिलेल्यांनी युद्धाचा धुराळा खाली बसल्यानंतर आपले आयुष्य सुरू केले होते. ताज्या प्रकरणामुळे तेथील जनता युद्धचक्रात पुन्हा एकदा अडकेल असा कयास आहे. भरपूर पैसे घेऊन देश सोडलेल्या असद कुटुंबाला त्यांच्या वागणुकीची शिक्षा कितपत मिळेल याची शंका आहे. जगात कुठेतरी ते आपले विलासी आयुष्य सुरू ठेवतीलच. सीरियात मृत्यूला सामोरे जाणारी जनता आणि घर सोडून इतर देशात निर्वासित म्हणून राहणारे नागरिक मात्र असद यांच्या सत्तालालसेचे बळी ठरले आहेत.