मुत्सद्देगिरीच्या यशामागे राष्ट्राचे सर्वांगीण सामर्थ्य

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

 

आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत सातत्याने आग्रही आणि ठोस भूमिका घेत आहे, याचे प्रत्यंतर अलीकडे वारंवार येते. विशेषतः परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर वेगवेगळ्या मुलाखती, भाषणे यामधून जी मांडणी करतात, तीत हा आत्मविश्वास प्रकट होतो. त्यांच्या ताज्या वक्तव्याचे उदाहरण नोंद घ्यावी असे आहे. ‘‘अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शविल्यामुळे काश्मीरचा प्रश्न कधी सुटणार’’ अशा प्रश्नाचा यॉर्कर लंडनमधील ‘चॅथम हाऊस’ या थिंक टँकने आयोजित केलेल्या चर्चेत पाकिस्तानच्या एका पत्रकाराने विचारला. त्यावर अजिबात विचलित न होता डॉ. जयशंकर म्हणाले, ‘‘ पाकिस्तानच्या ताब्यात असलेला काश्मीरचा चोरलेला भाग परत मिळाला की काश्मीरची समस्या पूर्णपणे सुटेल’’.

एखादी अशक्य वाटणारी घटना प्रत्यक्षात घडण्यापूर्वी ती घडणार, घडणार असे वारंवार म्हणत राहिले की ऐकणाऱ्याचाही मनावर त्याचा प्रभाव पडतोच. याच मनोवैज्ञानिक खच्चीकरणाच्या डावपेचांचा हा भाग आहे. पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानाप्रमाणेच कूटनीतीच्या पटावरही पराभूत मानसिकतेने वावरत असल्यास नवल नाही. मोदी सरकारने काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर तिथे विकास, आर्थिक प्रगती आणि सामाजिक न्यायाला चालना मिळून मतदारांच्या मोठ्या सहभागासह विधानसभेची निवडणूक यशस्वीपणे पार पडल्याचे जयशंकर यांनी नमूद केले आणि सर्वस्वी अनपेक्षित उत्तराचा षटकार लगावत त्यांनी प्रश्नकर्त्या पाकिस्तानी पत्रकारावरच डाव उलटवला. एवढेच नव्हे तर पाकिस्तान ‘चोर’ असल्याचे जगाच्या निदर्शनास आणून दिले. सध्याचे अमेरिका, चीनचे राजकारण आणि भारताचा आग्रही पवित्रा पाहता जगात सुरू असलेल्या दबावयुद्धाचा प्रत्यय येतो.

त्यात पाकिस्तान हे एक प्यादे आहे, हेही लक्षात येते. पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानचा अपमान करुन खजील करण्याची एकही संधी भारताने सोडलेली नाही. त्यामुळे काश्मीरच्या प्रश्नावर पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या अन्य देशांचीही कोंडी झाली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये गुंतवणूक करू पाहणाऱ्या चीनलाही या मुद्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रतिवाद करणे शक्य झालेले नाही. ‘चोरलेल्या’ पाकव्याप्त काश्मीरवरून भारताने पाकिस्तानला अनेक आघाड्यांवर बेजार करण्याची आक्रमक कूटनीती अवलंबिली आहे. ३१ वर्षांपूर्वी, संसदेच्या दोन्ही सभागृहांनी २२ फेब्रुवारी १९९४ रोजी ‘पाकव्याप्त काश्मीर’ हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचा प्रस्ताव एकमुखाने संमत केला होता. नागरी सुविधांच्या अभावापोटी नागरिकांचे जगणे दुरापास्त करणाऱ्या पाकिस्तानची ‘चोरी केलेला’ काश्मीरचा भूभाग सांभाळण्याची लायकी नसल्याची जाणीव भारत जगाला आवर्जून करून देत आहे.

ग्रीनलँड आणि कॅनडा अमेरिकेत सामील झाल्यास त्यांच्या नागरिकांची अमेरिका पूर्ण काळजी घेईल, असे आमीष डोनाल्ड ट्रम्प दाखवत आहेत. विकासापासून वंचित राहिलेल्या पाकव्याप्त काश्मिरातील ४५ लाख नागरिकांसाठी भारतही ‘विकासाचे कार्ड’ वापरत आहे. पाकिस्तानी राजवटीविरुद्ध उठाव करण्यास चिथावणी देताना देणाऱ्या भारताने जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेत पाकव्याप्त काश्मीरसाठी २४ जागा सोडून आपले नेक इरादे स्पष्ट केले आहेतच. अशा अनेक आघाड्यांवर कूटनीतीच्या शस्त्राने शत्रूराष्ट्र विद्ध झाले असताना जयशंकर यांनी काश्मीर प्रश्नाचा तोडगा शेवटच्या टप्प्यात आला असल्याचे जाहीर करून पाकिस्तानला घायकुतीला आणले आहे. अनेकदा जे प्रत्यक्ष युद्ध वा आक्रमणाने साध्य होऊ शकत नाही ते मुत्सद्देगिरीने साधले जाऊ शकते. तरीही प्रत्यक्ष संघर्षाशिवाय पाकव्याप्त काश्मीरचा ताबा घेणे भारताला सहजासहज शक्य होणार नाही, याचे भान ठेवावे लागेल.

जयशंकर यांनी जेवढ्या उपरोधिकपणाने पाकिस्तानी पत्रकाराच्या काश्मीरवरील प्रश्नाला उत्तर दिले, तेवढ्याच खोचकपणे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी जयशंकर यांना चीनकडेही काश्मीरचा काही भाग असल्याची जाणीव करून दिली. ‘‘पाकिस्तानच्या ताब्यात असलेला काश्मीरचा भाग परत मिळविण्यासाठी तुम्हाला कोणी रोखले आहे’’, असा प्रश्नही त्यांनी विचारला. या भागात चीनची आर्थिक महत्त्वाकांक्षा गुंतली आहे. पाकिस्तानला एकाकी पाडण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमधील ‘वन बेल्ट, वन रोड’ प्रकल्पातून चीनला माघार घेण्यास उद्युक्त करावे लागेल; किंवा भारताच्या सहकार्याने हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी राजी करावे लागेल आणि त्याचवेळी अधूनमधून पाकिस्तानविषयी पुळका दाखविणाऱ्या अमेरिकेला या मुद्यावर तटस्थ भूमिका घेण्यास भाग पाडावे लागेल.

हे सगळे झाले आपल्या यशस्वी कूटनीतीबद्दल. परंतु या मुत्सद्देगिरीच्या यशामागे असते ते राष्ट्राचे सर्वांगीण सामर्थ्य. शौर्य, शस्त्रास्त्रे, निर्धार यांतून ते तयार होतेच, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक प्रगतीतून येते. ती वेगाने साधता आली, तर जगात एक महत्त्वाचे राष्ट्र म्हणून तुमच्या आवाजाला किंमत येते. आज भारत ज्या आत्मविश्वासाने आपली बाजू मांडू शकतो आहे, त्यामागे गेल्या काही दशकांतील प्रयत्नांचा पाया आहे. त्याचे भान न विसरता आर्थिक सामर्थ्य वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. अनिश्चित आर्थिक वातावरणात पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे भारताचे उद्दिष्ट पुढे ढकलले गेले आहे. तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न साकार केले तर भारताला शत्रू मानणाऱ्यांना नामोहरम करणे सोपे होईल.