नीतिमूल्यांचा ताज रतन टाटा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 2 Months ago
 रतन टाटा
रतन टाटा

 

‘‘... be it known that God has created the world for work, by diligence the work of the creator is continued...’’

झोरास्ट्रियन नीतिशास्त्रातील हे वचन सांगते, की देवाने हे विश्व निर्माण केले आहे ते काम करण्यासाठी. तुम्ही अथक परिश्रम करता तेव्हा त्या ‘निर्मिका’चे कामच पुढे नेत असता. रतन टाटा यांचे सारे आयुष्य पाहिले तर या शिकवणीचा संस्कार नक्कीच त्यांच्यात मुरलेला दिसतो. उद्योजकता, कर्तव्यनिष्ठा, आशावाद आणि भविष्यवेधी विचार यांची कास त्यांनी अखेरपर्यंत कधीही सोडली नाही.

अनेक आव्हाने उभी ठाकली, चढउतार आले, कधी अपयशाचीही ठेच लागली तरी प्रयत्नवाद न सोडण्याची ऊर्जा त्यांना जशी सभोवतालच्या वातावरणातून मिळाली असेल, तशीच ती अशा शिकवणीतूनही मिळाली असणार. काही व्यक्ती अशा असतात, की त्या अनेक उपाध्या मिरवतात; पण त्यांना पूर्ण न्याय देत नाहीत. याउलट काही व्यक्ती अशा असतात, की त्यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या उपाधीमध्येही पूर्ण मावत नाही. ‘उद्योगपती’ रतन टाटा हे असेच उपाधीत न मावणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी टाटा समूहाची उज्ज्वल परंपरा पुढे नेली.

देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या वेळी अगदी कोवळ्या वयात असलेले रतन टाटा यांनी पुढच्या काळात उद्योग चालवले, समूहाचा पसारा वाढवला आणि आपला नावलौकिक सातासमुद्रापारही नेला. देशउभारणीच्या ध्येयाशी ते पूर्णपणे समरस झाले होते. आधुनिक आणि विकासोन्मुख भारताची वाटचाल आणि त्यांची कारकीर्द यांना वेगळे करताच येणार नाही. खरे तर ते टाटा घराण्याचेच वैशिष्ट्य होते; अगदी जमशेटजी टाटा यांच्यापासून. जेआरडी टाटांनी उद्योग आणि संस्थाउभारणीत बजावलेली कामगिरी ऐतिहासिकच होती. स्वातंत्र्यानंतर देशाची गरज होती, ती पायाभूत उद्योगांसाठी मोठ्या भांडवली गुंतवणुकीची. टाटांचा पोलादाचा कारखाना, हे त्याचे ठळक उदाहरण.

पुढे १९९१मध्ये उदारीकरणाचा टप्पा हे एक मोठे स्थित्यंतर घडले. अर्थव्यवस्थेवरील नियंत्रणाकडून खुलीकरणाकडे, मक्तेदारीकडून स्पर्धेकडे जाणारे हे परिवर्तन होते. रतन टाटा यांचा उद्योग क्षेत्रातील बहराचा काळ उदारीकरणाच्या या टप्प्यावर सुरू होणे हा एक विलक्षण योग म्हटला पाहिजे. परकी कंपन्यांना आपली दारे सताड उघडी करून देणे म्हणजेच केवळ जागतिकीकरण नव्हे. आपल्यालाही आता आकाश मोकळे झाले आहे, हे जाणून रतन टाटा यांनी जॅग्वार, लॅंडरोव्हर हे वाहन उद्योगातील ब्रँड, तर ‘टेटली’ ही चहाच्या क्षेत्रातील कंपनी विकत घेतली. जगभरात टाटा हे नाव दुमदुमते ठेवले. काळाची पावले ओळखून त्यांनी आपल्या उद्योगांत अनेक बदल केले. सिमेंट, कापड, सौदर्यप्रसाधने, औषधे याऐवजी सॉफ्टवेअर, दूरसंचार, प्रवासी वाहने, वित्तसेवा, विमा, हवाई वाहतूक अशा उत्पादन-सेवांवर लक्ष केंद्रित केले.

टाटा समूहातील वेगवेगळ्या कंपन्यांकडून नाममुद्रेचे स्वामित्वशुल्क घेण्याची कल्पना त्यांचीच. त्या सगळ्यांना नाममुद्रेच्या एका छत्राखाली आणताना ‘ब्रॅंड’चे माहात्म्य त्यांनी अधोरेखित केले. ते नुसते शब्दांपुरते नव्हते, त्यामागे कार्यसंस्कृती होती. व्यवस्थापनातील नीतिमूल्ये होती. ‘उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व’ ही कल्पना येण्याआधीपासून टाटांच्या कार्यप्रणालीत ती स्वाभाविकपणे भिनलेली होती. रतन टाटा यांनी त्याबाबतीतही आपला ठसा उमटवला.

एक लाखात मोटार निर्माण करण्याची कल्पना साकारत अनेक मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांचे रतन टाटा आनंदाने भागीदार बनले. आपल्या उद्योगसमूहाची उलाढाल त्यांच्या काळात चार अब्ज डॉलरवरून शंभर अब्ज डॉलरपर्यंत पोचली. या सगळ्याची जंत्री मोठी आहे, पण त्या पलीकडे होते ते त्यांचे माणूस म्हणून मोठेपण. एवढी यशस्वी आणि संपन्न कारकीर्द असलेल्या या उद्योगपतीने स्वतःचे प्रस्थ निर्माण होऊ दिले नाही.

पिंपरी-चिंचवडमधील ‘टाटा मोटर्स’ येथे आले असताना जेवणासाठी कॅंटिनमध्ये कामगारांबरोबर ते रांगेत राहिले आणि कामगारांबरोबरच त्यांनी जेवण केले. ती आठवण आजही त्या कामगारांच्या मनात घर करून आहे. टाटांचा यातला सहजपणा जास्त महत्त्वाचा. २६/११ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात उद्‍ध्वस्त झालेले ‘ताज’ हॉटेल त्यांनी उभे केलेच; पण या भीषण घटनेत सापडलेल्यांना मदत करताना ‘गेटवे ऑफ इंडिया’जवळ चणे-फुटाणे विकणाऱ्या गरीब मुलांनाही मदत करायला ते विसरले नाहीत. रतन टाटांसारखी माणसे पुन्हा पुन्हा आठवायची याचे कारण यश मिळविण्यासाठी नीतिमूल्ये सोडण्याची गरज नसते, हे त्यांच्याकडून शिकायला मिळते.

श्रेयाचा वाटा सहकाऱ्यांना दिल्याने तुमचे महत्त्व कमी होत नाही, उलट वाढते, याचे उदाहरण ते घालून देतात. उद्योगधंद्यांना परवानग्या मिळवण्यासाठी राजकारण्यांची खुशामत करण्याची गरज नसते, याची ग्वाही त्यांच्याकडून मिळते. संपत्तीनिर्माण हेही कर्तृत्व गाजवण्याचे एक चांगले, उदात्त आणि महत्त्वाचे कार्यक्षेत्र आहे, हे तर ते मनावर बिंबवतातच; पण मिळालेल्या संपत्तीचा विनियोग करण्यातही तेवढीच कल्पकता आणि सर्जनशीलता असावी लागते, याचाही वस्तुपाठ देतात. श्रीमंती आपल्यावर स्वार होऊ न देता आपण तिच्यावर स्वार होत आपले माणूसपण समृद्ध करू शकतो, हा विचारही आपल्या कृतीतून रतन टाटांसारख्या व्यक्ती देत असतात. या ‘समृद्ध महामार्गा’ने वाटचाल करणे, निदान तसा प्रयत्न करणे हेच त्यांचे सर्वांत सार्थ स्मरण ठरेल.