‘रामायण’ हे भारतीय संस्कृतीतील सर्वांत लोकप्रिय महाग्रंथांपैकी एक. त्यावर आधारित लोककला हजारो वर्षांपासून देशभरात सादर होत आल्या आहेत. माध्यमे बदलली तसे रामायणाची सादरीकरणही बदलले. मात्र आत्मा तोच राहिला. रामकथा,रामलिला,गीतरामायण,टीवी मालिका,चित्रपट अशा विविध माध्यमांतून आजवर रामायण सादर करण्यात आले. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’या रामायणावर आधारित सिनेमाच्या दर्जावर बरीच टीका करण्यात आली. यावेळी अनेकांनी रामायणाचे आदर्श रुपांतरण म्हणून रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या टीवी मालिकेची आठवण आली. या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेले रामानंद सागर हे निर्माते दिग्दर्शक असण्याबरोबरच उर्दू साहित्यातील आघाडीचे लेखक आणि विचारवंतही होते. त्यांच्या या अज्ञात पैलूची ओळख करून देणारा हा लेख...
टेलिव्हिजनवरील महान कलाकृती म्हणून लोकप्रिय ठरलेल्या ‘रामायण’साठी रामानंद सागर प्रसिद्ध होते. या मालिकेचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन त्यांनीच केले. ही मालिका तुफान गाजली. रामायणासोबतचत्यांनी आरजू, घुंगट, जिंदगी आणि आँखे यांसारख्या उत्तम चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन केले. त्यामुळे बहुतांश भारती त्यांनायांसाठी त्यांची ओळख निर्माता-दिग्दर्शक इथवरच मर्यादित राहिली. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा पैलू तसा अंधारातच राहिला. बऱ्याच जणांना कल्पनाही नसेल की रामानंद सागर त्या काळातील एक प्रख्यात उर्दू लेखक होते.
सागर हे फारसी आणि उर्दू भाषेचे अभ्यासक होते. त्यांचा मुलगाप्रेम सागर लिहितो,“१९४२ मध्येपंजाब विद्यापीठाने मुन्शी फझल (पर्शियनमध्ये पीएचडी) ही प्रतिष्ठित पदवी रामानंद यांना प्रदान केली गेली. त्यांनी दोन सुवर्णपदकेही पटकावली. इतकेच नव्हे तर उर्दू आणि फारसी या विषयांच्या पदवी परीक्षांमध्ये त्यांनी अव्वल स्थानही पटकावले. पुढे त्यांनात्यांना 'अदीब-ए-आलम' ही पदवी देण्यात आली.
पत्रकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. लाहोर येथून प्रकाशित होणाऱ्या ‘मिलाप’ या उर्दू दैनिकासाठी त्यांनी पत्रकार म्हणून काम सुरु केले. पुढे ते त्या दैनिकाचे संपादकही झाले. १९४१ मध्ये त्यांना क्षयरोग (टीबी) झाला. त्यामुळे त्यांना काश्मीरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या काळात टीबी हा जीवघेणा आजार मानला जायचा त्यामुळे डॉक्टर म्हणाले,‘सागर जास्त काळ जगणार नाहीत.’पण मरणाची भीती एखाद्या व्यक्तीला पराभूत करू शकत नाही.
सागर यांनी सेनिटोरियममध्ये आलेले आपले अनुभव लिहायला सुरुवात केली.“‘मौत के बिस्तर से’ किंवा ‘डायरी ऑफ अ टीबी पेशंट’ अशी लेखमाला लिहली आणि लाहोरच्या ‘अदब-ए-मशरिक’ या प्रसिद्ध उर्दू मासिकाला पाठवली. रुग्णशय्येवर पडलेल्या मात्र इतरांना जगण्याचा मार्ग दाखवणाऱ्या व्यक्तीची रामकहाणी ऐकून मासिकाचा संपादक थरारून गेला. ही लेखमालिका खूप लोकप्रिय झाली. पुढे सागर यांना हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली. मात्र तोवर ते प्रसिद्ध उर्दू लेखक म्हणून नावारूपाला आले होते.
संकटे, वेदना आणि दु:ख यांतूनच महान साहित्यकृतींचा जन्म होतो. सागर यांच्या बाबतही हेच घडले. भारताच्या फाळणीमुळे अनेकांप्रमाणेच सागर यांचे विश्वही उध्वस्त झाल्यासारखे झाले. लाहोरमधील घर सोडून त्यांना श्रीनगरमध्ये आश्रय घेण्यास भाग पडले. या काळात त्यांनी माणसांची दुसरी बाजू फार जवळून पाहिली. त्यातूनच ‘और इंसान मर गया' या त्यांच्या कादंबरीने जन्म घेतला.शोकांतिकेवर लिहिली गेलेली ही उर्दू कादंबरी प्रचंड गाजली.
सागर हे आपल्या कुटुंबासह श्रीनगरमध्ये निर्वासित म्हणून राहत होते. २७ ऑक्टोबर १९४७ रोजी पाकव्याप्त काश्मीरवर आक्रमण झाले आणि ते पुन्हा एकदा निर्वासित झाले.
युद्धात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी डकोटा DC-३ हे विमान भारताकडून तैनात करण्यात आले होते. विमानात अधिक लोकांना बसवता यावे म्हणून लोकांनी सोबत सामान आणू नये असा आदेश देण्यात आला होता. बिजू पटनायक हे विमानाचे पायलट होते. डोक्यावर पेटी घेतलेला एक माणूस पाहून पटनाईक संतापले. “तू लोभी माणूस आहेस! एका व्यक्तीच्या जीवाची किंमत तू तुझ्या संपत्ती सोबत करतोस?” असे म्हणत त्यांनी त्या पेटीला लाथ मारून ती उघडली. ती पेटी हस्तलिखितांनी भरलेली होती.
ती पेटी वाहणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून रामानंद सागर होते. सागर भावनावश झाले आणि म्हणाले, “या माझ्या ‘और इंसान मार गया’ या कादंबरीच्या नोट्स आहेत,यात माझ्या चिरडलेल्या भावनाआहेत. यात मीयुद्धाच्या निरर्थकतेबद्दल आणि शांततेच्या गरजेबद्दल लिहिले आहे. ही संपत्ती मी माझ्यासोबत घेऊन जात आहे!” हे सर्व पाहून पटनाईक यांना सागरांमध्ये एका मोठ्या लेखकाची छबी दिसली. त्यांनी सागर यांना नमस्कार केलाव कुटुंब आणि हस्तलिखितासह त्यांना सुखरूप दिल्लीत पोहोचवले.
सागर हे तोंडाची वाफ करणाऱ्या विचारवंतांसारखे नव्हते. तळागाळात जाऊन लोकांच्या वेदना, दुःख दूर करण्यासाठी त्यांना काहीतरी करायचे होते. त्यांच्या अनुभवांना शब्दरूप द्यायचे होते. काश्मीरवर सतत आक्रमण सुरु होते. लोक मारले जात होते. महिलांवर अत्याचार होत होता. दिल्लीत स्वस्थपणे बसून धगधगत्या विषयावर ते कसे लिहू शकणार, हा मोठ प्रश्नच होता. त्यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबाला दिल्लीतील मुस्लिम परिसरात राहणाऱ्या मुस्लिम मित्राकडे सोडले आणि ते स्वतः काश्मीरला परत गेले. जातीय हिंसाचाराने होरपळून गेलेला एक माणूस कुटुंबाची सुरक्षिततेची जबाबदारी त्याच्या मुस्लिम मित्रावर सोपवतो ही कल्पनाही किती शहारे आणणारी आहे.
या संकटकाळी लोकांमध्ये जाणारे सागर काही एकटेच नव्हते. इतर अनेक साहित्यिकही त्यांना काश्मीरमध्ये भेटले. ख्वाजा अहमद अब्बास, राजिंदर सिंग बेदी, चंद्रकिरण सोनरेक्स, नवतेज सिंग, शेर सिंग, राजबंस खन्ना यांसारखे प्रमुख साहित्यिक युद्ध आघाडीवर पोहोचले होते. यावेळच्या आठवणी सांगताना प्रसिद्ध पत्रकार,पटकथाकार,दिग्दर्शक ख्वाजा अहमद अब्बास अब्बास म्हणतात, " काश्मीरमधील वातावरणाने मला स्पेन आणि आंतरराष्ट्रीय ब्रिगेडची आठवण करून दिली, जिथे असे म्हटले जाते की लेखक त्यांच्या पुस्तकांसाठी जगतात आणि कवी त्यांच्या कवितांसाठी मरतात."
यादरम्यानच 'और इंसान मर गया' लिहून पूर्ण झाले. अब्बास लिहितात, “मी खोलीत प्रवेश केला तेव्हा एक व्यक्ती वाचत बसली होती.ती व्यक्ती म्हणजेच रामानंद सागर. एक अद्भुत आणि जगावेगळा माणूस. जो काही दिवसांपूर्वीच आपल्या कुटुंबासह निर्वासित म्हणून दिल्लीत आला आणि ताबडतोब आपल्या पत्नी आणि मुलांना सोडून युद्ध आघाडीवर परतला. ते त्यांच्या कादंबरीचा पहिला धडा वाचत होते आणि विचार करत होते. आशेचा आणि मानवतेचा मार्ग दाखवणारे मूर्त रूपच होते हे. अंधारात रस्ता दाखवणारी ती प्रकाशाचा छोटासा किरण होता. आता माझ्यासमोर अंधार उरला नव्हता.कारण मला एक प्रकाशमान मोती सापडला होता.”
अब्बास यांनी रामानंद सागर 'और इंसान मर गया' ची प्रस्तावना लिहिली होती. त्यात ते लिहितात, "सुदैवाने किंवा दुर्दैवाने, रामानंद सागर हे कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य नाहीत. माणुसकी हाच त्यांचा पक्ष आहे. मानवतेचा झेंडा उंच धरणाऱ्या महान कलाकारांमध्ये रामानंद अढळस्थानी आहेत”.
‘और इंसान मर गया’ चे वर्णन करताना सागर म्हणतात, “प्रेम द्वेषाइतके मजबूत नाही. त्यामुळे या कादंबरीतून मला तुमच्यामध्ये एक प्रकारचा द्वेष निर्माण करायचा आहे. तुमच्या भावना मजबूत आणि दृढ व्हाव्यात यासाठी. हे वाचू खून, अत्याचार, हिंसाचार या सर्वांचा तुम्ही अंतःकरणापासून तिरस्कार करू शकलात तर हे माझे आणि माझ्या कादंबरीचे यश आहे असेच मी समजेल.”
प्रा. इश्तियाक अहमद यांच्या मते, "’और इंसान मर गया’नेफाळणीवरील सर्वांत मानवतावादी आणि राजकीयदृष्ट्या तटस्थ कादंबरी म्हणून ओळख निर्माण केली." या कादंबरीला समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. सागर उर्दू लेखनातील एक दिग्गज म्हणून प्रस्थापित झाले. मात्र पुढे त्यांनी साहित्यनिर्मिती थांबली. ते चित्रपटांसाठी लिहित होते. कथा आणि कादंबरी यांकरता लिहिणे त्यांनी बंद केले होते. या कृतीचे उत्तर त्यांनी आपल्या अनोख्या शैलीत दिले. जुलै १९४८ मध्ये लिहिलेल्या 'और इंसान मर गया'च्या प्रस्तावनेत ते लिहतात "माझ्या आत बरेच काही आहे जे लेखनाच्या रूपात माझ्यातून बाहेर येऊ इच्छित आहे. मात्रएक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते. पुढचा बराच काळ साहित्यिक म्हणून मी काही लिहू शकणार नाही. कारण पोटाची गरज आत्म्याला आणि मनाला खायला घालण्यापेक्षा अधिक वेदनादायी बनली आहे.”
(अनुवाद: पूजा नायक)
- साकिब सलीम