आस्था, श्रद्धा आणि प्राचीन परंपरेशी नाते ठेवण्याची मानवी प्रवृत्ती असते. दर बारा वर्षांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणारा महाकुंभ किंवा नाशिक, हरिद्वार व उज्जैन येथे दर बारा वर्षांनी होणारे कुंभमेळे हेही त्याच भावनेचे, श्रद्धेचे आणि मानवी जगण्याच्या ताण्याबाण्याचेही प्रतीक आहेत. गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या संगमावरील प्रयागराज येथील महाकुंभाचा शंख आज पहाटेच (सोमवारी) फुंकला गेला असेल. पुराणे आणि महाभारतातही कुंभस्नानाचा उल्लेख आढळतो. आदि शंकराचार्यांनी हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाच्या केलेल्या कार्यात आखाडा परंपरा आणि कुंभपर्वावरील शाही स्नान व त्यानिमित्ताने भाविक, भक्त, साधू-संत व महंत यांच्या या मेळ्याला उत्तरोत्तर विशेष महत्त्व येत गेले.
अगदी मुघल सम्राटांची राजवट आणि ब्रिटिशांच्या काळातही ही परंपरा वर्धिष्णू होत गेली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच, १९५४ मध्ये प्रयागराज येथे महाकुंभ झाला होता. कॉलराची साथ असल्याने लसीकरण केलेल्यांनाच सोडले जात होते. तथापि, अलोट गर्दी आवरणे कठीण झाले आणि त्यावेळी सुमारे आठशे लोकांना चेंगराचेंगरीत जीव गमवावा लागला. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंसह अनेक मान्यवर तत्कालीन अलाहाबादमध्ये असताना घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते.
पुन्हा याच प्रयागराजमध्ये यावर्षी होणाऱ्या महाकुंभासाठी मात्र केंद्र व राज्य सरकार आणि त्यांचे प्रशासन, पोलिस व इतर संरक्षणविषयक दले, हजारो कर्मचारी काम करीत आहेत. पर्यावरणरक्षणाचे भान ठेवत कोट्यवधी भाविकांच्या सहभागाने महाकुंभ यशस्वी करण्याचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बांधलेला चंग कौतुकास्पद म्हणावा लागेल.
अधिकाधिक चांगले आयोजन, त्याला गालबोट लागू न देता त्याची यशस्वी करून दाखवणे हे त्या-त्या राज्याच्या प्रशासनाची उच्चतम गुणवत्ता, त्याची चांगली कामगिरी आणि कर्तृत्व, कल्पकता या सगळ्यांचा आरसा असते. त्यासाठी ही राज्ये आणि प्रशासन, पोलिस व तत्सम सर्व यंत्रणा दोन-तीन वर्षे आधीपासून राबतात. हजारो कोटी रुपये खर्च करून त्यासाठी वेगळी यंत्रणा निर्माण केली जाते.
विशेषतः पाणी, स्वच्छता, वीज यांच्यासारख्या मूलभूत सुविधांपासून वाहतूक, संरक्षण, गर्दी आणि आपत्तीचे व्यवस्थापन, येणाऱ्या साधू-संतांसह भाविक, भक्तांच्या निवास, खाणे-पिणे यापासून ते शेजारील स्थळांना भेटीगाठी, पर्यटन अशा बाबींकडे बारीक लक्ष देत असते.
यावेळीही उत्तर प्रदेश सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ड्रोन यांसह अत्याधुनिक तंत्रसाधनांचा वापर करत संरक्षण सुविधेपासून भाविकांच्या वाहतुकीपर्यंत, त्यांच्यासाठी कुंभग्राम उभारण्यापासून दहशतवादी हल्ले तसेच सायबर हल्ले रोखण्यापर्यंतची सज्जता अशा सर्व बाबींचा बारकाईने विचार करून यंत्रणा उभारली आहे. आकाशातून तसेच पाण्याखालून संरक्षण यंत्रणा चोख राबवणार आहे. हजारो ड्रोनचा उपयोग केला जाणार आहे.
ही सज्जता मान्य केली तरी आगामी दीड-दोन महिन्यांत या सगळ्यांची कार्यवाही किती परिणामकारक व कठोरपणे होते, आपत्तीजनक प्रसंग उद्भवल्यास त्यावर मात किती वेगाने करून महाकुंभ पर्व यशस्वी करते यावर त्याचे मूल्यमापन होणार हेही तितकेच खरे. यानिमित्ताने त्या राज्याच्या अर्थकारणाला, पर्यटन व्यवसायाला गती देता येते. तसेच त्या राज्याला देशातच नव्हे तर जगासमोर नेण्याची, प्रशासकीय कारभाराची चुणूक दाखवायची संधी असते.
ती साधण्याचे योगी आदित्यनाथ सरकारने केलेले प्रयत्न दृश्य स्वरुपात सर्वदूर पोहोचले आहेत. कोणत्याही अप्रिय घटनेतून धडा घेणे हेही तितकेच गरजेचे असते. आता पुन्हा तशा दुर्घटना घडू नयेत, याची सरकारी यंत्रणांबरोबरच लोकांनीही पुरेपूर काळजी घ्यायला हवी. कुंभमेळ्याच्या नियोजनातून राज्याराज्यातील प्रशासकीय यंत्रणेला कामकाजाबाबत अनेक प्रकारचे धडे मिळत असतात.
कुंभग्राम, साधूग्रामची उभारणी, तेथे बारकाव्याने पुरवल्या जाणाऱ्या आरोग्यसुविधा, ठिकठिकाणी स्वच्छतागृहे, सांडपाणी निचराप्रणाली, इंधन, वीज, रस्ते आणि बस, रेल्वे, विमानसेवा यांसारख्या वाहतूकसुविधा अशा अनेक मूलभूत गोष्टी, तात्पुरती स्थानके, पोलिस ठाणी, संरक्षण यंत्रणांचे जाळे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या सगळ्यांच्या कामकाजांचा समन्वय आणि त्याकरता तरतुदी हे सर्व व्यवस्थापनाचा कस पाहणारे असते.
विशेषतः २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या आयोजनाकरता प्रयागराजचा कुंभमेळा हा महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सरकार आणि अभ्यासक अशा सर्वांना वस्तुपाठ ठरणार आहे. तेथील कामकाजाची परिणामकारकता, कार्यवाहीतील अडचणी आणि त्यावर वेळीच केलेल्या उपाययोजना, आणीबाणीच्या प्रसंगी घेतलेले निर्णय व केलेली कार्यवाही, विशेषतः संरक्षण व गर्दीच्या व्यवस्थापनासाठीच्या उपाययोजना या महत्त्वाच्या ठरणार आहेत.
त्यामुळे महाराष्ट्रात सुमारे सहा हजार कोटींवर सोयीसुविधांसह विविध बाबींवर खर्चाचे केलेले नियोजन परिणामकारकपणे अंमलात आणण्यासाठी प्रयागराजचा महाकुंभ अभ्यासासाठी उपयक्त ठरेल, असे वाटते. अर्थात, महाराष्ट्रातही अशा स्वरुपाच्या आयोजनाचा चांगला अनुभव असलेली मंडळीच नियोजनात असल्याने त्यांच्या अनुभवाचा व दूरदर्शीपणाचा फायदाही निश्चित होणार आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter