चालू वर्ष कृत्रिम बुद्धिमत्तेचं!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
कृत्रिम बुद्धिमत्ता
कृत्रिम बुद्धिमत्ता

 

- संदीप कामत

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील चॅटजीपीटीसारख्या प्रयोगांमुळे कुतूहल वाढतं आहे. कुठल्याही विषयावर निबंध, कविता, नाटक लिहू शकणारं चॅटजीपीटी थोड्याच अवधीत व्हायरल झालं. आता तर चॅटजीपीटी -‘एआय’ने अमेरिकेमध्ये वैद्यक, कायदेशीर आणि एमबीएच्या परीक्षा यशस्वीरीत्या दिल्या. पण कृत्रिम बुद्धिमत्तेचं संशोधन अनेक दशकं सुरू असतानाही असे तंत्रज्ञान नेमक्या याच वर्षी का ‘टेकऑफ’ करत आहे?

 

क्रांतिकारी तंत्रज्ञानाची सुरुवात एका रात्रीत होत नाही. नवीन संशोधन पुढे आलं की, त्याच्या प्राथमिक चाचण्या करण्यासाठी कुणीतरी गुंतवणूक करावी लागते, नंतर काही इंजिनिअरिंगमधील प्रज्ञावान लोकांना त्या क्षेत्राकडे आकर्षून घ्यावं लागतं. मग एखादं मूर्त स्वरूप तयार होतं, ज्याला आपण ‘प्रॉडक्ट’ म्हणतो. आपलं लाडकं इंटरनेट घरोघरी पोहोचण्याआधी ते शास्त्रज्ञ आणि संशोधक वर्तुळांमध्ये काही दशकं राहिलं. प्रत्येक हातात मोबाईल येण्याआधी तोही असाच संशोधन क्षेत्रापुरता मर्यादित राहिला. पुढे आकार आणि किमती कमी झाल्या आणि उपयोग वाढले, तसा तो घरोघरी पोहोचला. तसं ‘एआय’ हेही अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. पण, काही वर्षांपूर्वी त्यातल्या क्षमतांचं चित्र जेव्हा थोडंसं स्पष्ट व्हायला लागलं, तेव्हा बरेच गुंतवणूकदार पुढे यायला सुरुवात झाली; आणि मग ह्या तंत्रज्ञानातील प्रगती आणि ह्या क्षेत्रातली वाढती गुंतवणूक हे एकमेकांच्या साह्याने या क्षेत्राला वेगाने पुढे घेऊन जाऊ लागले, हा या क्षेत्रातला एक पहिला महत्त्वाचा ‘पुश’.

 

‘डेटा’चं इंधन

कॉम्प्युटरला जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्तेचं परिमाण दिलं जातं, तेव्हा ते एखाद्या अगदी लहान मुलाला शिकवण्यासारखं असतं. मुलांना घडवताना त्यांच्याशी खूप बोलावं, त्यांना समजवावं लागतं, तसंच खूप उदाहरणं आणि स्पष्टीकरणं द्यावी लागतात. तसाच ह्या कॉम्प्युटरना कृत्रिम बुद्धिमत्ता देण्यासाठी खूप डेटा आधी फीड केला जातो. ह्या वर्षी ‘एआय’ एवढं ‘चमकू’ लागलं आहे याचं कारण म्हणजे डेटाची वाढती उपलब्धता! कुठून आला हा डेटा? विकिपीडिया, यूट्यूब, न्यूज, TED talks इ. सारखी ज्ञानभांडारं तर आहेतच; पण त्यात प्रचंड भर झाली आहे ती स्मार्टफोन्स, स्मार्टवॉचेस, जीपीएसमधून! ही साधनं अहोरात्र डेटा गोळा करत असतात. मग त्यात सामूहिक माहिती, स्थळ, काळ-वेळ, हवामान इ. बरोबरच प्रत्येकाची वैयक्तिक माहिती आणि अगदी आवडीनिवडीही आल्या.

 

हा सगळा डेटा म्हणजे ‘एआय’ च्या इंजिनला शक्ती देणारं एक प्रकारचं इंधन आहे. एखाद्या विषयावर जेवढा जास्त आणि ‘परिपूर्ण’ डेटा, तेवढं त्या त्या विषयात ‘एआय’ अधिक ‘शहाणं’ होत जातं. हा सगळा डेटा ‘एआय’ प्रणालींना एखादी गोष्ट किंवा विषय विस्तृतपणे समजण्यासाठी आणि त्यापुढे जाऊन काही ‘उद्दिष्टे’ साध्य करण्यासाठी अधिक अचूकतेनं प्रशिक्षित करतो. मग त्यामध्ये भाषा समजणं आलं, वेगवेगळ्या क्षेत्रांतले बारकावे लक्षात ठेवणं आलं आणि विचारलेल्या प्रश्नाला नेमकं उत्तर देणंही आलं.

 

गॉर्डन मूर यांचा ‘मूर्स लॉ’ असं सांगतो की, ‘दर दोन वर्षांनी कॉम्पुटरचा वेग दुप्पट होतो.’ जुन्या काळात ट्रकच्या ट्रक भरून संशोधनासाठी बांधावी लागणारी कॉम्प्युटिंग पॉवर आता स्मार्टफोनच्या रूपात आपल्या हातात आणि खिशात मावते! पूर्वी खोली भरून राहतील एवढ्या मोठ्या असलेल्या मेमरी चिप्स आता अत्यंत मायक्रोस्कोपिक झाल्या आहेत. पण ‘एआय’ साठी सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ‘ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट’ (GPU)चा शोध. सुरुवातीला व्हिडिओ गेम्स विकसित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ह्या कॉम्प्युटर चिप्स ‘एआय’ साठी लागणाऱ्या प्रचंड डेटा प्रोसेसिंगसाठी वरदान ठरल्या आहेत. याहून ‘एआय’ साठी लागणाऱ्या ‘टेन्सर प्रोसेसिंग युनिट्स’चाही विकास झाला आहे. यामुळे अधिक शक्तिशाली, अधिक अचूक आणि अधिक कार्यक्षम एआय’ प्रणाली तयार करणं शक्य झालं आहे.

 

आपल्या हातातल्या पॉवरफुल पण छोट्या सुपर कॉम्प्युटरला आता ४जी, ५जीने जोडलेल्या क्लाउडची साथ आहे. क्लाउड म्हणजे दुसरं-तिसरं काही नसतं, तर ते असतात प्रचंड पॉवरफुल असलेले रिमोट सुपरकॉम्प्युटर्स. म्हणजे हातातला स्मार्टफोन आणि दूरवरचं क्लाउड हे दोन्ही मिळून एकूण उपलब्ध असलेली कॉम्प्युटिंग पॉवर आता कितीतरी पटींनी वाढली. पूर्वी अशक्य वाटणारी, अत्यंत गुंतागुंतीची संगणकी गणितं आता चुटकीसरशी सोडवता येत आहेत, त्यामुळे संभाव्य असलेल्या उत्तरांपैकी करोडो शक्यता लक्षात घेऊन काही मिलि-सेकंदांतच नेमकं उत्तर देणं शक्य झालं आहे.

 

विविधांगी उपयोग

आजवर ‘एआय’ अनेकविध उद्योगांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी सज्ज झालं आहे. गेली अनेक वर्षं बुद्धिबळासारख्या खेळात एआय’ ने आव्हान दिलं होतंच; पण आताही रोग्यसेवेपासून ते वित्त, वाहतूक ते उत्पादनापर्यंत सगळी कार्यं स्वयंचलित करण्यासाठी, कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि नावीन्यपूर्ण कामं साध्य करण्यासाठी ‘एआय’उपयोगात आणले जात आहे. सुरुवातीला ह्या तंत्रज्ञानाचे टीकाकार म्हणायचे, कितीही झालं तरी मानवी मनाचा परमोच्च आविष्कार म्हणजे त्याने निर्माण केलेल्या कला, संगीत, चित्रकारिता... ह्या सगळ्या उजव्या मेंदूच्या कलात्मक गोष्टी. यात संगणक काही करू शकणार नाही.

 

पण आता एआय’च्या माध्यमातून काल्पनिक चित्रं, चेहरे, संगीतसुद्धा तयार करत आहेत. एआय’ आता सिनेमाची पटकथाही लिहू लागले आहेत! कर्करोगासारख्या दुर्धर रोगांचं त्वरित निदान व्हावं आणि त्यावर औषधंही तयार व्हावीत यासाठी हे तंत्रज्ञान वापरलं जात आहे. गुगलसारखी कंपनी डायबेटिसमुळे येणारं अंधत्व टाळण्यासाठी आणि त्याचं लवकर निदान व्हावं म्हणून प्रयत्न करते आहे.

 

नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल

जसजसं नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल तसतसं त्यामुळे नोकऱ्या जातील का, ही चर्चाही होत आहे. कॅल्क्युलेटरचा शोध लागला तेव्हापासून गणितज्ञांचं किंवा अकौंटंट्सचं महत्त्व कमी झालं का? नक्कीच नाही! पण त्यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांच्या आणि संशोधकांच्या रोजच्या आयुष्यातल्या गणितांचा भार कॅल्क्युलेटर्सनी उचलला. त्यामुळे माणसांचा आकडेमोडीतला वेळ वाचून पुढच्या संशोधनाकडे अधिक वेळ देणं शक्य झालं. ‘नोकऱ्या जातील का’ यापेक्षा ‘कुठल्या प्रकारच्या नवनवीन नोकऱ्या तयार होतील’, याचा विचार व्हायला हवा. मुळात गमतीची गोष्ट अशी आहे की, ‘एआय’ इतकं पुढे गेलं तरीही शास्त्रज्ञांना अजूनही मानवी मेंदूची पक्की कॉपी बनवता आलेली नाही.

 

(लेखक कॅलिफोर्नियामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.)