‘नवीन वर्ष, नवीन सुरुवात’ ही संकल्पना मनोवैज्ञानिक तत्त्वे आणि मानवी वर्तनात खोलवर रुजलेली आहे. नवीन वर्ष हे एक तात्पुरता ‘लँडमार्क’ म्हणून पाहिले जाते. अगदी मनोवैज्ञानिक ‘रिसेट बटणा’सारखे! ते सगळ्यांनाच एक प्रतीकात्मक नवीन प्रारंभ प्रदान करते. त्यामुळे नवीन उद्दिष्टे आणि संकल्प ठरवणे करणे हे नैसर्गिकरित्याच केले जाते.
स्वत:त सुधारणा
नवीन वर्षातील संक्रमणाच्या वेळी अनेकदा आत्मनिरीक्षण आणि आत्मचिंतन केले जाते. आत्मसुधारणेची इच्छा निर्माण होते. नवीन वर्षाच्या निमित्ताने नूतनीकरणाची, सकारात्मक बदलांची संधी मिळते. लोक त्यांच्या जीवनातल्या विविध पैलूंमध्ये बदल करण्यास प्रेरित होतात.
सामाजिक प्रभाव
नवीन वर्षाचे संकल्प करण्याची परंपरा अनेक समाजांमध्ये सांस्कृतिकदृष्ट्या रुजलेली आहे. य बाबतीत सामाजिक प्रभाव मोठा असतो. सभोवतालच्या इतरांना नववर्षाच्या सुरुवातीला काही तरी लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवताना लोक बघतात. त्यातून प्रेरणा घेऊन स्वत:त सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात.
आशावाद
नवीन वर्षाची सुरुवात एक आशा घेऊन येते. भविष्य हे भूतकाळापेक्षा चांगले असेल, असा विश्वास वाटू लागतो. हा आशावाद प्रेरणा देतो. वैयक्तिक विकास आणि सकारात्मक बदलांसाठी मानसिक बळ मिळायला त्याची मदत होते.
नव्याने सुरुवात
मागील वर्ष आव्हानात्मक गेले असेल किंवा स्वत:कडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नसतील, तरीही व्यक्ती नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा नव्याने प्रयत्न करतात. माणसाच्या आकांक्षा आणि वास्तव यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न होतो.
आंतरिक प्रेरणा
लक्ष्य ठरवणे आणि त्यात यश प्राप्त करणे, यासाठीच्या आंतरिक प्रेरणांचा विचार केला जातो.‘नवीन वर्ष, नवीन प्रारंभ’ यामागील मानसशास्त्र हे असे बहुआयामी आहे. आपणही या वर्षाकडे आशेने पाहूया. नवीन काहीतरी चांगला संकल्प करून त्या दृष्टिने काम करूया!
- डॉ. मलिहा साबळे