नांदेड दक्षिण : सर्व समाज घटकांचा विश्वास जिंकणाराच ठरणार विजेता

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 5 d ago
प्रमुख दावेदार फारूक अहमद (डावीकडे) आणि दिलीप कंदकुर्ते
प्रमुख दावेदार फारूक अहमद (डावीकडे) आणि दिलीप कंदकुर्ते

 

नांदेड शहर हे मराठवाड्यातील महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर वसलेले शहर आहे. अल्पसंख्यांकबहुल बहुसांस्कृतिक अशी या शहराची  ओळख आहे. शिखांचे दहावे आणि शेवटचे  गुरु, गुरु गोविंदसिंह यांची समाधी याच शहरात असल्यामुळे या शहराला आंतरराष्ट्रीय महत्त्वही आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार नांदेड शहराच्या एकूण लोकसंख्येत मुस्लिम समाज २८.४३  टक्के, बौध्द समाज १६.३६ टक्के आणि शीख समाज १.६२ टक्के आहे. म्हणजेच शहरात एकूण ४७ टक्के लोकसंख्या ही अल्पसंख्यांक समाजाची आहे. या शहराने महाराष्ट्राला आजवर चार मुख्यमंत्री दिले आहेत. काँग्रेसचे शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण हे प्रत्येकी दोन वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर राजकीयदृष्ट्या नांदेड शहरावर प्रामुख्याने काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. 

तेलंगणातील असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने २०१२ च्या नांदेड  महानगरपालिका निवडणुकांमध्ये सहभाग घेतला. प्रामुख्याने मुस्लिम मुद्द्यांवर राजकारण करणाऱ्या या पक्षाने पहिल्याच प्रयत्नात या शहरातून आपले ११ नगरसेवक निवडून आणले.

नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून ‘एमआयएम’चा नांदेडमध्ये आणि पर्यायाने महाराष्ट्रातील राजकारणात चंचुप्रवेश झाला. नांदेड शहरातील मुस्लिम राजकारणाला यामुळे महत्त्व प्राप्त झाले.  नांदेड शहरात दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. एक नांदेड उत्तर आणि दुसरा नांदेड दक्षिण. दोन्ही विधानसभा मतदारसंघ हे निमशहरी आहेत. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये २३.५ टक्के मतदार हे मुस्लिम असून  १७ टक्के मतदार हे दलित समाजातील आहेत.
 
त्यामुळे इथे कोणत्याही उमेदवाराला निवडून येण्यासाठी बहुतांश मुस्लिम आणि दलित मते मिळवणे आवश्यक आहे. कोणत्याही एका समुदायाच्या मतांवर निवडून येणे इथे शक्य नाही. गेल्या दोन  विधानसभा निवडणुकांच्या खालील आकडेवारीचे विश्लेषण केले तर हीच बाब आपल्या लक्षात येईल.
 
 
२०१२ च्या नांदेड महानगरपालिका निवडणुकांमधील यशानंतर २०१४ च्या विधानसभेची निवडणुक एमआयएम पक्षाने संपूर्ण ताकदीने लढवली होती. मुस्लिम समाजामध्ये विशेषतः तरुणांमध्ये एमआयएम पक्षाचं आकर्षण होते. लोकप्रियतेच्या शिखरावर असूनही पक्षाचे उमेदवार सय्यद मोईन केवळ ३४, ५६० मते मिळवू शकले होते. अर्थात त्यातील बहुतांश मते ही मुस्लिम समाजाची होती. मात्र विजय मिळवण्यासाठी ती अपुरी ठरली. त्यामुळे मुस्लीमबहुल मतदारसंघ असला तरी इथे केवळ मुस्लिम  समाजाच्या मतांच्या बळावर विजयाचे  समीकरण बनू शकत नाही. त्यावेळी शिवसेनेचे हेमंत पाटील ४५, ८३६ मते मिळवून विजयी झाले होते.

लोकसभा २०१९ च्या वेळी प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या भारिप बहुजन महासंघाचं रूपांतर वंचित बहुजन आघाडीमध्ये केले. दलित, मुस्लिम आणि लहान ओबीसी जातींना जोडून त्यांनी एका बृहद आघाडीची निर्मिती केली. लोकसभेसाठी एमआयएम पक्षासोबत त्यांची युती झाली होती. या युतीचा फायदा औरंगाबाद लोकसभेत इम्तियाज जलील यांना झाला आणि ते लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले. परंतु ही युती लवकरच तुटली आणि 2019 ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक दोन्ही पक्षांनी स्वतंत्र  लढवली. 

विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत नांदेड दक्षिण मतदारसंघात  वंचितचे फारुक अहमद आणि एमआयएम चे साबेर चाऊस रिंगणात होते. दोन्ही पक्षांकडून मुस्लिम उमेदवार उभा असल्याने मुस्लिम मतांचे विभाजन झाले. वंचितचे फारुक अहमद यांना २६, ७१३  तर एमआयएम चे साबेर चाऊस यांना २०, १२२ मते मिळाली. वंचितने फारुक अहमद यांना उमेदवारी देऊन दलित-मुस्लिम समीकरण साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु एमआयएमने मुस्लिम उमेदवार दिल्याने मुस्लिम मतांचे विभाजन होऊन दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला. दोन्ही उमेदवारांना पडलेल्या मतांची बेरीज ४६, ८३५ होते.  विजयी उमेदवाराच्या मतांच्या जवळ ही मते जातात. 

त्यावेळी रिंगणात असलेल्या इतर १९ मुस्लिम उमेदवारांनी जवळपास ४००० मते मिळवली होती. जर  वंचित आणि एमआयएम ही निवडणूक सोबत लढले असते तर त्यांना विजयाचे समीकरण साधने सहज शक्य झाले असते. मुस्लिम मतांचे विभाजन झाल्यामुळे कॉंग्रेसचे नवखे उमेदवार मोहन हंबर्डे  ४६, ९४३ मते मिळवून विजयी झाले होते. 

विधानसभा २०२४ 
२०१४ पासून या विधानसभा मतदारसंघात चौरंगी किंवा पंचरंगी लढत पहावयास मिळत आहे. या निवडणुकीत सुद्धा पाच प्रमुख सशक्त उमेदवार निवडणूक  मैदानात उतरले आहेत. त्यामुळे विजयाचे  गणित हे जवळपास पूर्वीसारखेच असणार आहे. त्यामुळे जो उमेदवार ५०,०००  च्या जवळपास मते मिळवू शकेल तो विजयश्री खेचून आणण्याची शक्यता अधिक आहे.

या विधानसभा निवडणुकीत वंचितने फारुक अहमद यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. एमआयएमकडून मात्र यावेळी  सय्यद मोईन निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २०१९ विधानसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही दोन सशक्त मुस्लिम उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मागील विधानसभा निवडणूक हरल्यानंतर फारुक अहमद हे गेल्या पाच वर्षांपासून दलित - मुस्लिम समीकरण तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एमआयएमकडून सय्यद मोईन यांनी अर्ज दाखल केला. सय्यद मोईन हे सशक्त मुस्लिम उमेदवार असले तरी मतदारसंघात एमआयएमचे पूर्वीसारखे वर्चस्व राहिलेले नाही. मात्र दोन मुस्लीम उमेदवारांमुळे  मुस्लिम मतदारांसमोर संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

मुस्लिम मतदारांमधील काँग्रेसचा पारंपरिक मतदारदेखील काही प्रमाणात काँग्रेसचे उमेदवार मोहनराव हंबर्डे यांना मतदान करेल. मात्र या परस्थितीत मुस्लिम मतांचे तीन उमेदवारांमध्ये विभाजन होण्याची शक्यता आहे. दिलीप कंदकुर्ते हे मागील दोन निवडणुकांमध्ये ४३ ते ४४ हजार मते मिळवत आहे. भाजप किंवा अपक्ष लढूनदेखील त्यांनी आपल्या मतांची आकडेवारी कायम राखण्यात यश मिळवले होते. यावेळेसही ते अपक्ष उमेदवार म्हणूनच मैदानात आहेत. जवळपास पूर्वीच्या इतकीच मते ते यावेळेसही  घेतील असा अंदाज आहे.

शिवसेनेकडून (शिंदे गट ) आनंद तिडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेची स्वतःची ३५ ते ४० हजार मते या मतदारसंघात आहेत. २०१४ मध्ये शिवसेनेचे हेमंत पाटील  ४५, ८३६  मते मिळवून विजयी झाले होते. यावेळेसदेखील शिवसेनेला जवळपास ३५ ते ४० हजार मते मिळण्याची शक्यता आहे.

यावेळी मात्र  या मतदारसंघातील प्रमुख लढत वंचितचे फारूक अहमद आणि अपक्ष उमेदवार दिलीप कंदकूर्ते या दोघांमध्येच असणार आहे. कंदकूर्ते हे त्यांचे मतदान ४३ ते ४४ हजारवरून ५० हजारपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतील. तर फारूक अहमद हे मुस्लिम मतांचं विभाजन थांबवण्याचा प्रयत्न करतील.

प्रकाश आंबेडकर यांना मानणारा दलित समुदाय आणि बहुतांश मुस्लिम समुदाय यांच्या मताचे समीकरण साधले गेले तर फारूक अहमद विजयासाठीचा  ५० हजारांचा टप्पा ओलांडू शकतील. दिलीप कंदकूर्ते आणखी किती मते आपल्यासोबत जोडू शकतात आणि फारूक अहमद मुस्लिम मतांचे विभाजन रोखून किती दलित मते खेचतात यावर दोघांच्या विजयाची गणित अवलंबून आहे.

 - शहेबाज म. फारूक  मनियार 
(लेखक  मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि नागरिक शास्त्र विभागात सीनियर रिसर्च स्कॉलर आहेत.)

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter