एस. जयशंकर पाकिस्तानात उच्चस्तरीय बैठकीत घेणार भाग

Story by  Sameer D. Shaikh | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) बैठकीचा दुसरा दिवस पाकिस्तानच्या जिना कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरू होणार आहे. बैठकीसाठी जगभरातून आलेल्या नेत्यांचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी स्वागत केले. ग्रुप फोटोने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर शरीफ उद्घाटनप्र भाषण करतील. त्यातून पुढील उच्च-स्तरीय चर्चेची दिशा ठरवली जाईल. या अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर पाकिस्तानचे उपपंतप्रधान, इशाक दार आणि SCO महासचिव झांग मिंग मीडियाला संबोधित करतील. पंतप्रधान शरीफ हे मान्यवरांसाठी अधिकृत स्नेहभोजनही आयोजित करतील.

SCO बैठकीत चीन, रशिया, बेलारूस, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि भारत यासह सदस्य राष्ट्रांचे प्रमुख नेते आणि प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे . सोबतच इराणचे  उपराष्ट्रपती आणि मंगोलियाचे पंतप्रधान उपस्थित आहेत. सोबतच तुर्कमेनिस्तानचे उपाध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्रीही विशेष अतिथी म्हणून उपस्थित आहेत.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार , या बैठकीमध्ये प्रादेशिक आर्थिक सहकार्य, व्यापार, दहशतवाद, पर्यावरणीय आव्हाने आणि सदस्य राष्ट्रांमधील सामाजिक-सांस्कृतिक संबंध मजबूत करण्यावर भर देण्यात येणार  आहे. या चर्चेतून SCO सदस्यांमधील सहकार्याला चालना देण्यासाठी आणि आगामी वर्षासाठी संस्थेच्या बजेटला अंतिम रूप देण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची अपेक्षा आहे. SCO ची व्यापक उद्दिष्टे प्रतिबिंबित करणाऱ्या व्यापार, कनेक्टिव्हिटी आणि हवामान बदल यांसारख्या बहुपक्षीय मुद्द्यांवर शिखर परिषदेचा फोकस राहणार आहे.

भारताच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर करत आहेत. त्यांच्याया भेटीकडे ऐतिहासिक संदर्भामुळे लक्ष वेधले गेले आहे. कारण  नऊ वर्षांनंतर भारतीय परराष्ट्र मंत्र्यांची ही पहिली पाकिस्तान भेट आहे. सुषमा स्वराज यांनी २०१५ मध्ये अफगाणिस्तानवरील 'हार्ट ऑफ एशिया' परिषदेसाठी पाकिस्तानला शेवटची भेट दिली होती . जयशंकर परराष्ट्र सचिव म्हणून त्या शिष्टमंडळाचा भाग होते. इस्लामाबादमध्ये त्यांच्या आगमनाने सीमेपलीकडील दहशतवाद आणि जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० रद्द करणे यासारख्या मुद्द्यांवरून संघर्षात अडकलेल्या दोन अण्वस्त्रधारी शेजारी देशांमधील तणाव विरघळण्याच्या संभाव्यतेबद्दलच्या कयासांना पुन्हा बळ मिळाले आहे.

भारतीय आणि पाकिस्तानी दोन्ही शिष्टमंडळांची उपस्थिती असूनही, दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांनी SCO शिखर परिषदेच्या बाजूला कोणतीही द्विपक्षीय चर्चेची शक्यता नाकारली आहे. पाकिस्तानने यजमान या नात्याने आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे आणि असे म्हटले आहे की आपण अशा चर्चा सुरू करू शकत नाही, परंतु भारताने स्वारस्य दाखविल्यास ते चर्चेसाठी तयार आहेत.