मराठी साहित्यात ऐतिहासिक कादंबऱ्या ठराविक मर्यादांच्या पलिकडे सरकत नाहीत. सतराव्या शतकातील सरंजामशाही संघर्ष, त्याभोवतीच्या राजकीय घडामोडी आणि त्या आधारे उभा केला जाणारा भावनिक पट इतकेच मराठी कांदबऱ्यांमध्ये चर्चिले गेलेले गत सात दशकांपासूनचे चर्चा विश्व आहे.
इतिहासलेखनाने वर्तमानात उभे केलेले तिढे, इतिहासाविषयीच्या साचेबध्द समाजभानातून निर्माण झालेला संघर्ष चर्चेत घेऊन कथानकाच्या मदतीने त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सहसा होत नाही. इतिहासशास्त्र आणि समाजशास्त्र या दोन्ही ज्ञानशाखांच्या मदतीने नव्या कथानकाला स्पर्शही मराठीतल्या ऐतिहासिक कादंबऱ्यांनी केल्याचे जाणवत नाही.
दिवसागणिक इतिहासाच्या समजेतून निर्माण झालेले संघर्ष तीव्र होत असताना हिंदू आणि मुसलमान दोघांनी समन्वयशील सहिष्णू परंपरांचा शोध घेण्याची गरज आधिकच जाणवते. नेमकी हीच जाणीव अधोरेखित करत संग्राम गायकवाड यांनी मनसमझावन ही कादंबरी लिहिली आहे.
या कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी भारताचा समन्वयशील, सहिष्णू सामाजिक व सांस्कृतिक वारसा शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांनी सुफी शाह तुराब यांच्या ‘मनसमझावन’ या पद्यग्रंथाचा कादंबरीच्या मुल्यभानाचे केंद्र म्हणून उपयोग केला आहे. त्यासोबतच सुफी परंपरा या कादंबरीमध्ये सातत्याने चर्चेला येतात.
सतराव्या शतकात रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले. त्यांनी आपल्या लिखाणामध्ये दखनी पदावल्यांचाही समावेशही केला. या पदावल्यांमध्ये इस्लामची बऱ्यापैकी चर्चा आहे. रामदास स्वामींच्यानंतर सुफी शाह तुराब नावाच्या सुफी संताला या दखनी पदावल्या खुणावू लागल्या त्यातून त्यांनी रामदास स्वामींचा शोध घेतला. या शोधाची परिणिती म्हणजे सुफी शाह तुराब यांनी रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकाच्या आधारे रचलेले किंवा दखनीत रुपांतरीत केलेले मनसमझावन हा पद्यग्रंथ.
या ग्रंथाला दखनी भाषेच्या माध्यमातून सुफी आणि महाराष्ट्रीय हिंदू अध्यात्म परंपरेत झालेल्या संवादाचे एक प्रतिक मानले जाते. सुफी शाह तुराब यांनी मनसमझावन या ग्रंथात केवळ रामदासांच्या श्लोकांचे भाषांतर करण्यात समाधान मानले नाही, तर त्यांनी सुफी आणि महारष्ट्रीयन मुस्लिमेतर संतांमध्ये संवादाची एक परंपरा कायम करण्याच्या हेतूने या ग्रंथात काही परंपरा आणि सांस्कृतिक प्रतिकांचा शोधही घेतला.
अलीकडच्या काळात हिंदू आणि मुसलमान दोघांनीही समन्वयवादी परंपरांकडे दुर्लक्ष करुन परस्पर संघर्षाचे मुद्दे आधिक टोकदार केले आहेत. वर्तमान स्थितीत अनेक कुटूंब, व्यक्ती, संस्था या संघर्षात गुरफटत चालले आहेत. मनसमझावन या कादंबरीचे लेखक संग्राम गायकवाड यांनी चिन्मय नावाच्या अनाथ मुलाची कथा चर्चेला घेतली आहे. हा चिन्मय हिंदुत्ववादी आहे. पण त्याचा जन्म एका अंतरधर्मीय प्रेमी जोडप्याच्या विवाहपूर्व प्रेमसंबंधातून होतो.
त्याला जन्म देणारी आई राबिया ही मुजावर कुटुंबातील आहे. तिचे कुटुंबीय सुफी शाह तुराब यांचा शिष्य असणाऱ्या लालबाबा या बाभुळगावातील सुफीच्या दर्ग्याचे मुजावर आहेत. लालबाबाचा दर्गा बाभुळगावच्या समन्वयवादी परंपरेचे प्रतिक आहे. पण पुढे याच मुजावर कुटुंबातील नवी पिढी तब्लीग जमातचा प्रभाव वाढत जाऊन दर्ग्याची मुजावरकी सोडून देण्यापर्यंत पोहोचते. त्यातच राबियाच्या प्रेमसंबंधामुळे व अकाली गरोदरपणातून हे कुटुंब विस्थापित होऊन सोलापूरात येते. पुढे राबिया बाळंतीण होते. तिच्या मुलाला चिन्मयला बिजापूरच्या अनाथाश्रमात दिले जाते. तेथून हा मुलगा एका ब्राह्मण कुटुंबात दत्तक जातो. आणि त्या कुटुंबात वाढलेला हा मुलगा कर्मठ होऊन मुसलमानांचा द्वेष करायला लागतो. पुढे त्याच चिन्मयला स्वतःच्या मुळांचा शोध घ्यावासा वाटतो. मग तो बाभुळगावला पोहोचतो.
बाभुळगावात आलेला चिन्मय अनेक टप्प्यांवरचा प्रवास करत लालबाबाचा दर्गा, त्याचा वारसा, दखनी भाषा, सुफी संस्कृती असा शोध घेत मुस्लिमद्वेषातून बाहेर पडतो. दुसऱ्या बाजूला त्याची आई राबिया ही एक बंडखोर स्त्री म्हणून समोर येते. राबियाने केलेले बंड बहुमुखी आहे. एका बाजूला ही राबिया कोणतेही प्रतिगामी वर्चस्व मान्य न करता स्वतंत्रपणे जगण्याच्या आपल्या भूमिकेसाठी वाट्टेल ती किंमत चुकवायला तयार आहे. दुसऱ्या बाजूला ही किंमत चुकवत असताना ती आपल्यातली बंडखोर वृत्तीही सोडत नाही.
प्रेमामुळे आपल्या वाट्याला आलेलं आयुष्य ही आपल्या चुकांची देण आहे, असा पश्चात्ताप ती करत बसत नाही. उलट तिच्यातला बंडखोरपणा वाढत जातो. वाईन पिणारी, समाजभानाचं निरीक्षण करणारी रबिया पुढे सोलापूर जवळील गुलबर्ग्यात एकल जीवन जगण्यास सुरुवात करते. तिच्या भावना, एकटी स्त्री, त्यात तिचं मुस्लिम असणं, असं सर्वबाजूने आव्हानात्मक असणारे जीवन ती जगते.
एका बाजूला ही कादंबरी सहिष्णू परंपरांचा शोध घेते, तर दुसरीकडे त्या परंपरा संपवण्यासाठी उभ्या राहात असलेल्या कट्टरवादी विचारांच्या विरोधात सहिष्णुतेचा मार्ग दाखवणारी (चुकलेल्या वर्तमानात) मानवी परंपरांच्या अधिष्ठानावर आधारीत सुधारणा सुचवते. आपण माणूस म्हणून कोण आहोत याचा ती शोध घेते. आणि वर्तमानात एका समाजाला नाकारल्या जात असलेल्या सांस्कृतिक प्रतिनिधीत्वाला अधोरेखित करते. हे सांस्कृतिक प्रतिनिधित्व अधोरेखित करतानाही या कादंबरीचा लेखक त्या समाजाचे एकांगी वर्चस्ववादी, सांस्कृतिक राष्ट्रवाद उभे राहणार नाही याचीही बारकाईने काळजी घेतो. त्यामुळे त्याची ही कृती सम्यक विवेकवाद जोपासणारी आहे.
संग्राम गायकवाड यांनी या कादंबरीत नुसते कथानक मांडलेले नाही. तर त्यांनी कादंबरीत दखनी भाषा, सुफी संस्कृती, वारकरी परंपरा आणि ग्रामीण जीवन यांना अधोरेखित करण्याचा प्रयत्नदेखील केला आहे. राबिया ज्या लालबाबाच्या दर्ग्याच्या मुजावर कुटुंबातून आहे, तो लालबाबाचा दर्गादेखील एक पात्र म्हणून वाचकांशी संवाद साधतो. आपल्यासोबत काय घडलं हे जन्मापासून कथानक खूप चांगल्या पध्दतीने या दर्ग्याच्या कथनातून मांडलं जातं.
दखनी भाषेचे पात्र जेव्हा बोलायला लागते तेव्हा दखनी भाषा, तिचा वारसा आणि परंपरा, त्यातील महत्वाचे कवी आणि त्यांच्या कविता, ही कोण, कुठे व कशी बोलतो याचे काही दाखले दखनी भाषा आपले दखनी समाजजीवनातील न दुर्लक्षीत करता येणारे अस्तित्व कथन करते. त्यामुळे मराठी भाषेत प्रथमच कादंबरीच्या माध्यमातून ही भाषा चर्चेला येते.
कादंबरीचा रचनाबंध थोडासा निराळा आहे. या कादंबरीत अनेक पात्र आहेत. ती पात्रं स्वतःच्या वाट्याला आलेलं कथानक कथन करतात. यामध्ये अनेक निर्जीव पात्रंही आहेत. ती देखील आपल्या आजूबाजूला घडलेल्या घटना कथन करतात. पध्दतीने WhatsApp, Twitter सारखी निर्जीव माध्यमेही पात्ररूपाने वाचकांशी संवाद साधतात आणि वर्तमानातील राजकारण, सांस्कृतिकरण आणि सामाजिक तिढे वगैरेंची चर्चा करतात. लेखक संग्राम गायकवाड यांनी कादंबरीच्या निमित्ताने वर्तमानासोबत, इतिहास आणि संस्कृतीचा केलेला अभ्यासदेखील पानोपानी जाणवतो. वर्तमानातील अनेक तिढ्यांपासून सुरु झालेली ही कादंबरी सामाजिक समन्वयाचा वारसा शोधत हा देश कोणत्या मार्गाने पुढे गेला पाहिजे हे सांगते. त्यामुळे ही कादंबरी समकालातील एक अतिशय महत्वाची कादंबरी ठरते.
- सरफराज अहमद
(लेखक, मध्ययुगीन इतिहासाचे अभ्यासक)
मनसमझावन
संग्राम गायकवाड
रोहन प्रकाशन
किंमत - ३७५
पृष्ठे - २५५