खरे तर कुण्या एका तबलजीच्या जाण्याने सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याची लय बिघडावी, असे काही नसते. पण उस्ताद झाकिर हुसेन यांचे अचानक मैफलीतून उठून जाणे, तमाम संगीत रसिकांसाठी वेदनादायी ठरले. संगीताचा आत्माच जणू हरपल्याची भावना झाली आहे. कारण या अवलिया कलावंताने तुमच्या-आमच्यासारख्यांच्या साध्याशा जीवनातल्या लयीशीही छानदार जान-पहचान करून दिली होती. अभिजात हिंदुस्थानी तालसंगीताचा सारा खजिनाच जणू या प्रतिभावंताच्या हाताच्या बोटांवर वस्तीला होता. तबल्याची पैदाईश पार अमीर खुस्त्रोपर्यंत नेऊन ठेवली जाते. हे जोडवाद्य कोणी उत्पन्न केले, याबद्दल तज्ज्ञांमध्ये बेताल वाद होत असले तरी वर्तमानातल्या पिढीसाठी मात्र तबल्याचा दायां बायां उस्तादजींसाठीच जन्मला अशी समजूत असणार. उस्ताद झाकिर हुसेन आणि तबला हे संगीतविश्वातले आगळेच अद्वैत होते. गंमत अशी की, तबला हे वाद्यच मुळी द्वैत. जोडीने संगत करणारे. पण वाजवणाऱ्या दोन हातांची लडिवाळ भेट झाल्याबिगर हे मैत्र आपला रंग जमवू शकत नाही. हा मैत्रीचा रंग उस्तादजींनी भारतीय रसिकांच्या किमान तीन पिढ्यांच्या अंगोपांगी माखला.
उस्ताद झाकिर हुसेन यांच्या जाण्याने सांबशिवाच्या हातातील डमरु मूक झाल्याच्या वेदना आहेत. 'कुरळ केश शिरी, सरळ नासिका' असे देखणे रूप लाभलेले झाकिर भाई संचावर येऊन बसले की बघत राहावेसे वाटे. मानेपर्यंत आलेल्या त्या कुरळ्या केसांच्या त्या बेशिस्त बटांचे मात्रेगणिक होणारे नर्तन बघणाऱ्याला मंत्रमुग्ध करत असे. त्यांची ही मनमोहक छबी इतकी लोकप्रिय होती की एका चहा कंपनीने त्यांना जाहिरातीत स्थान देऊन 'वाह, ताज कहिए' असे वदवून घेतले. समोरच्या तबल्याचे 'दायां-बायां' तालमात्रांचे अविश्वसनीय दागिने दणादण रसिकांपुढे भिरकावत असताना झाकिरभाईंची ती तेजस्वी बैठी मूर्तीही नजरबंदी करायची. जणू त्यांचा संपूर्ण देह, संपूर्ण अस्तित्वच नादब्रह्माशी नाळ जोडलेला वाटू लागे. वयाच्या सातव्या वर्षापासून झाकिर हुसेन नावाचा हा चमत्कार रसिकांना बुचकळ्यात टाकत होता. वालिद मरहूम अल्लारखा कुरेशी ऊर्फ अब्बाजी हे स्वतः पंजाब घराण्याचे नामवंत कलाकार, त्यामुळे झाकिर यांना घरच्या घरीच तालीम मिळाली. पिला आणि गुरु एकाच ठिकाणी मिळणे ही तशी दुर्मिळ बाब नाही. पण बऱ्याचदा प्रतिभेचा प्रवाह एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना आक्रसताना दिसतो. हे फक्त संगीत क्षेत्रातच घडते असे नव्हे, अभिनयापासून क्रिकेट किंवा राजकारणातही घडताना दिसते. पण अल्लारखा ऊर्फ अब्बाजींकडून मिळालेला वास्सा झाकिरभाईंनी अधिकच समृद्ध केला. त्यांच्यायोगे नादप्रवाह अधिक विस्तारला, असेच म्हणायला हवे. उस्तादजीमधली सहृदयता आणि विनम्रभाव अगदी साहजिक होता. खोट्या बिनम्रतेचा ठेवणीतला दागिना मिरवून झाल्यावर पुन्हा पेटीबंद करणाऱ्या महाभागापैकी ते कधीच नव्हते. पं. रविशंकरजींपासून पं. हरिप्रसाद चौरसियांपर्यंत ज्येष्ठ दिग्गजांना पटकन वाकून नमस्कार करणारे झाकिरभाई एरवी सॅन फ्रेंन्सिस्कोच्या अमेरिकी वातावरणात राहतात, यावर कुणाचा विश्वास बसत नसे. तबलावादनाला सरस्वतीची पूजा मानणारा हा कलावंत होता. त्याच श्रद्धेने उस्तादजी मंचावर पादत्राणे बाहेर काढून मगच प्रविष्ट होत. हा अंतर्बाहा भारतीय कलावंत तालमात्रेचेच गलबत हाकारत सातासमुद्रांना पालाण घालता झाला, तेथील बीटल्सपासून जॅझ, रॉक, पॉप आणि समकालीन संगीतातल्या सिताऱ्यांसोबतही पश्चिमात्य तालजगत जिंकत गेला, ही खरेच स्तिमित करणारी यशोगाथा आहे. पद्मविभूषण किताबाने सन्मानित उस्ताद झाकिर हुसेन यांच्या घरातील फडताळावर पाच 'ग्रॅमी' पुरस्कारही दिमाखाने मिरवत असत. असे अजेय कलावंत देशाच्या सरहद्दी लीलया पुसून टाकत असतात. स्थलकालाचे सारे मापदंड त्यांच्यापुढे थिटे पडतात. याचे ज्वलंत उदाहरण स्वतः उस्ताद झाकिर हुसेन हेच होते.
उस्तादजींनी दिग्गजांना साथसंगत केली, तशीच नवोदितांनाही सांभाळून घेतले. एरवी संगीताच्या दुनियेत ज्येष्ठ-कनिष्ठांचे सोवळेओवळे फार, पण उस्ताद झाकिरभाईंनी सरहद्दीसोबत ही वयाची अटही झुगारुन दिली होती. मैफलीतले सगळेच काही तबलावादनातले ददर्दी नसतात. पण तो निर्माण होणारा नाद मोहवतो. अशांसाठी उस्तादजी रेला, हिरन की छलांग, शंखध्वनी, डमरु ध्वनी वगैरे तबलावादनातील चमत्कारी ध्वनीही पेश करत. रसिकांच्या टाळ्या पडत. पण जाणकार मात्र या रसिकधार्जिणेपणाला नाके मुरडत. उस्तादजींच्या या गमतीजमतींमागे त्यांची सहृदयताच होती. सृष्टीचा उगम लयीतून झाला की सृष्टिनिर्मितीच्या वेणांमधून लय निर्माण झाली, याची चर्चा चालू राहू दे. पण त्या लयीतूनच सूर, ताल, तरंग निर्माण झाले. आणि निःशब्दाला वाचा फुटली, सूर निर्माण झाले. एका संथ लयीत सृष्टिचक्र आत्ममग्नपणे फिरत असते. त्या चक्राला आवाज नसतो, पण एक अनाहत नाद मात्र असतो. त्या नादाचे एक जितेजागते देहस्वरुप म्हणजे उस्ताद झाकिर हुसेन हे होते. 'तो मज गमले विभूती माझी, स्फुरत पसरली विश्वामाजी, दिक्कालासह अतीत झालो, उगमी विलयी अनंत उरलो...' अशाच अलौकिक मानसानिशी उस्तादजी नक्षत्रलोकात विलीन झाले. आता ७३ हे काही मैफल अर्थात सोडून जाण्याचे वय नव्हे. तरीही कधीही न चुकणाऱ्या जगन्नियंत्याची बहुधा मात्रा चुकली आणि चुकीच्या समेवर आघात झाला. झाकिरभाईंचे नुसते असणेहो आपल्या आयुष्यातल्या लयतालाचे किती सुंदर स्मरण करुन देणारे होते !