महाराष्ट्रातील विविध शहरांना त्यांची त्यांची एक विशिष्ट संस्कृती लाभली आहे. त्या शहरांची विशिष्ट ओळख राज्यभरात आहे. लातूर शहर देखील त्यापैकीच एक. ऐतिहासिक वास्तूंनी वेढलेल्या या लातूरने त्याची ऊस उत्पादकांचा जिल्हा, सोयाबीनचे सर्वात मोठे व्यापारी केंद्र म्हणून वेगळी ओळख जपली आहे. तसेच शिक्षणक्षेत्रात लातूर पॅटर्न देखील फेमस आहे. परंतु व्यापराचे केंद्र आणि साक्षरतेचे प्रमाण असून देखील लातूरचे मतदार विशेषतः मुस्लिम मतदार मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात ‘आवाज मराठीने’ दौरा केला. यावेळी आम्ही लातूरच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर तसेच मुस्लिम मतदारांचे प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
लातूरचा राजकीय इतिहास आणि संस्कृति
राजकीय चष्म्यातून बघायचे झाले तर लातूर म्हटल की डोळ्यासमोर येतात ते राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख. विलासराव देशमुख यांना लातूर शहराने राज्य नव्हे तर देश पातळीवर ओळख मिळवून दिली. गेल्या तब्बल तिन दशकांहून अधिक काळ लातूरचे राजकारण हे देशमुख घराण्याच्या अवती भोवती फिरत आहे. लातूरमध्ये एकहाती सत्ता असताना देखील या भागाचा विकास म्हणावा तितका झालेला दिसत नाही. लातूरच्या संस्कृतीबद्दल बोलताना त्याठिकानचे पर्यावरण तज्ञ आणि स्थानिक सुपर्ण जगताप सर म्हणतात, “ जेव्हा लातूरची लोकसंख्या दोन हजार होती तेव्हापासून आम्ही याठिकाणी राहतो. पूर्वी लातूरची संस्कृती ही संमिश्र पद्धतीची होती. जंगलातील विविध झाडे जसे एकत्र राहतात तसे लोक इथे गुण्यागोविंदाने नांदायचे. सर्व धर्मियांचे लोक मिळवून याठिकाणी सण उत्सव साजरा करायचे.”
अलीकडच्या काळात लातूरच्या बदलत्या संस्कृतीविषयी बोलताना ते म्हणतात, “पूर्वी लातूर मध्ये सामाजिक सौहार्द पाहायला मिळायचे. तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात एकत्र येत वैचारिक चर्चा करायचे. ती लातूरची संपत्ति होती. परंतु आज तरुणांमध्ये संवाद होत नाही. यामुळे संमिश्र संस्कृती जपण्याचे आवाहन सध्या लातूरकरांच्या पुढे आहे.
लातूरच्या प्रस्थापित प्रतिनिधिवर मुस्लिम समाजाची नाराजी
गेल्या तीस पस्तीस वर्षापासून एकाच घरात असलेली सत्ता, मुस्लिमांसाठी न उचललेली पाऊले, रखडलेला विकास पाहता लातूरच्या मुस्लिम समाजामध्ये अस्वस्थता दिसते. लातूरच्या मुस्लिम ग्रामस्थ विद्यमान आमदारांविषयी उघड नाराजी व्यक्त करतात. तसेच त्यांच्यात असुरक्षितता दिसून येते. सामाजिक सौहार्द जपणाऱ्या लातूरच्या बदलत्या ट्रेंडविषयी सामाजिक आणि राजकीय मानसशास्त्राचे अभ्यासक अक्रम ढालाईत सविस्तर बोलताना म्हणतात, “ निवडणूका आहेत म्हणून मुस्लिमांची चर्चा होते अस काही नाही. राजकीय वर्तुळाच्या परीपेक्षा जास्त मुस्लिमांची चर्चा होत असते. मुस्लिमांचे प्रश्न दोन टप्यावर अभ्यासले गेले पाहिजेत. एक राजकीय प्रश्न आणि दुसरे सामाजिक प्रश्न. जेव्हा आम्ही एकंदरीत मुस्लिमांच्या प्रश्नांचा अभ्यास करतो त्यावेळी असे जाणवते की बऱ्याचदा मुस्लिमांच्या प्रश्नांना राजकीय दृष्टिकोनातून पहिले जाते. यामुळे मुस्लिमांच्या सामाजिक प्रश्नांना न्याय मिळत नाही. या कारणामुळे मुस्लिम समाजामध्ये नाराजी पहायला मिळते. ”
प्रस्थापितांवर मुस्लिम समाजाच्या नाराजीविषयी राजकीय घडामोडींचे अभ्यासक प्रदीप देशमुख म्हणतात, “ आजपर्यंत लातूरमध्ये देशा आणि राज्याप्रमाणे अनेक लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका झाल्या. लातूर शहर विधानसभा मतदारसंघ मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. परंतु कोणत्याही प्रमुख पक्षाने याठिकाणी मुस्लिम समाजातील व्यक्तीला उमेदवारी दिली नाही. हे लोकशाहीला पूरक नाही. निवडून येणे हा त्याचा दूसरा मुद्दा आहे.”
पुढे ते म्हणतात, “ मुस्लिम समाज जसा शिक्षणापासून वंचित आहे तसाच तो राजकीय दृष्ट्यादेखील वंचित आहे. प्रस्थापित पक्ष मुस्लिमांना उमेदवारी देत नाही. मात्र मुस्लिम समाजदेखील उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड करताना दिसत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेवर थोड्याप्रमाणात मुस्लिमांना प्रतिनिधित्व मिळते.”
मुस्लिम तरुण बहूअंगी विचार करतोय - अक्रम ढालाईत
सगळीकडे मुस्लिमांचे प्रश्न सारखेच आहेत. इतर समाजाप्रमाणे मुस्लिमांचे देखील शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय प्रश्न आहेत. लातूरच्या शैक्षणिक स्थितीवर बोलताना अक्रम ढालाईत म्हणतात, “शिक्षण क्षेत्रात लातूरला एक वेगळी ओळख आहे. ज्याला आपण लातूर पॅटर्न म्हणून ओळखतो. परंतु हा लातूर पॅटर्न मी मानत नाही. कारण लातूर पॅटर्न शैक्षणिक दृष्ट्या तुम्ही किती मार्क घेतले पाहिजे यावर भर देते. समाजाविषयी तुमचे विचार, शहराविषयी तुमची मते काय असावीत यावर लातूर पॅटर्न मधून बोलल जात नाही. ते सांगितले जात नाही.”
मुस्लिम समाज हा अलीकडे त्यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर चिंतन करायला लागला आहे. याविषयी ते म्हणतात, “२०१४ नंतर लातूर शहरात जर आपण पाहिले तर ग्रामीण स्तरापासून ते देश पातळीपर्यंत मुस्लिमांबद्दल अपप्रचार केला जात आहे. अलीकडे मुस्लिम तरुण सर्व बाजूंनी विचार करायला लागल्याचे दिसते. त्यातील एक अंग म्हणजे मुस्लिमांबद्दलच्या अपप्रचाराला कशा पद्धतीने आळा घालता येईल यावर ते चिंतन करत आहे.”
कोणी आमचा आवाज ऐकणार आहे का ?
आत्तापर्यंत आवाज मराठीच्या वेबसाईटवर मुस्लिम प्रतिनिधित्वाविषयी अनेक स्टोरी प्रकाशित झाल्या आहेत. लातूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात मुस्लिम प्रतिनिधित्वाचा विषय गंभीर आहे. मुस्लिम लोकसंख्येच्या तुलनेत त्यांचे प्रतिनिधित्व अगदी अल्प आहे. लातूरदेखील याला अपवाद नाही. लातूरच्या मुस्लिम प्रतिनिधित्वाविषयी ते म्हणतात, “उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन १९८२ मध्ये लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली. या नंतरच्या निवडणुकांमध्ये मुस्लिमांना राष्ट्रीय पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली नाही. लातूरमध्ये कोणताही मुस्लिम प्रतिनिधि नगरसेवक पदाच्या पुढे जाऊ शकला नाही. अर्थात हे राजकारण आहे. मात्र याठिकाणच्या प्रस्थापित पक्षाने, नेत्यांनी मुस्लिम प्रतिनिधित्व उभे होऊ दिले नाही असे वाटते. यामुळे कोणी आमचा आवाज ऐकणार आहे का ? हा प्रश्न मुस्लिम समाजा पुढे आहे.”
सहकार आणि लातूरचा मुस्लिम
महाराष्ट्राला सहकाराचा मोठा इतिहास लाभला आहे. राज्यभरात सहकार क्षेत्रातून अनेक मोठी नेतृत्व तयार झाली आहेत. लातूरच्या सहकार क्षेत्रावर आणि सहकारातून मुस्लिम प्रतिनिधीत्वावर बोलताना सहकार क्षेत्रात काम करणारे सय्यद सैउद्दीन म्हणतात, “ लातूरमध्ये मुस्लिम शेतकरी वर्ग हा जवळपास १५ % आहे. लातूरच्या सहकार क्षेत्रात जेव्हा मुस्लिम प्रतिनिधित्व द्यायची वेळ येते तेव्हा मुस्लिमांना डावळलं जाते. गेल्या ४० वर्षांपासून प्रस्थापितांची हुकुमशाही याठिकाणी आहे.”
ते पुढे म्हणतात, “ लातूर जिल्हा बँकेवर प्रस्थापितांचे वर्चस्व आहे. एकूण १९ संचालक ही बँक चालवतात. त्यापैकी एकही मुस्लिम संचालक आजपर्यंत झाला नाही. सहकारातून उद्धार हा स्व. यशवंतराव चव्हाण यांनी दिलेला संदेश आहे. सहकारामुळे महाराष्ट्र घडला आहे. सहकारातून काही विशिष्ट लोकांना लाखो रुपये कर्ज दिले जाते. परंतु मुस्लिम समाजातील व्यक्तीने कर्जाची मागणी केली तर त्याला दहा हजार रुपये देखील मिळत नाही, ही शोकांतिका आहे.”
'दगडापेक्षा वीट मऊ' - जुनैद आतार
दगडापेक्षा वीट मऊ या संकल्पनेवर गेल्या काही वर्षांपासून मुस्लिम समाज मतदान करत आहे. याविषयी बोलताना लातूरमधील सामाजिक कार्यकर्ते जुत्याच्यातून मुस्लिम जुनैद आतार म्हणतात, “ दगड आणि वीट दोन्हीने आम्हाला मार बसत आहे. लातूरचे गृहीत राजकारण मुस्लिम समाजाचा घात करत आहे.”
पुढे ते म्हणतात, “ पूर्वी लातूरची शंतताप्रिय शहर म्हणून ओळख होती. अलीकडे ती ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. लातूरमध्ये कधीही दंगल झाली आणि. पत्र गेल्या तिन वर्षं[पासून याठिकानचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. मुस्लिम पुरस्कृत घटना म्हणून याठिकाणी राजकारण केले जात आहे. प्रस्थापित मंडळी मुस्लिम समाजाबाबत भावनाहीन झाली आहे. मुस्लिमांनी राजकीय महत्वकांक्षा बाळगायची नाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
लातूरच्या मुस्लिमांचे प्रश्न
लातूरचे कापड व्यापारी तौसिफ शेख मुस्लिमांचे प्रश्न मांडताना म्हणतात, “ मुस्लिम समाजाने आजपर्यंत ज्यांना नेतृत्व म्हणून पहिले त्यांनी मुस्लिम समाजाची कोणतीही कामे केली नाही. चळवळीच्या मध्यमातून मुस्लिम समाजातील युवकांनी आता पुढे आले पाहिजे. समाजाच्या मागण्या त्यांनी लावून धरल्या पाहिजे.”
याविषयी बोलताना शहिद अहमद खां कृती समीतीचे अध्यक्ष सरफराज सय्यद म्हणतात, “ लातूरच्या गंजगोलाई भागात ११६ मुस्लिम टपरीधारक होते. गेल्या दहा वर्षांपूर्वी त्या सर्व परिवारांना गंजगोलाईमधून उठवण्यात आले होते. अजूनही त्यांचे पुनर्वसन झाले नाही.”
यापुढे मुस्लिम प्रश्नांवर बोलताना करीम पठाण म्हणतात, “ प्रस्थापित पक्षांतील काही विशिष्ट लोकांकडून निवडणुकीमध्ये दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मुस्लिमांच्यात भीतीचे वातावरण निर्माण केले जाते. यामुळे मुस्लिमांच्या दैनंदिन जीवनातील प्रश्न, त्यांचे इतर सामाजिक राजकीय प्रश्न पुढे येत नाहीत.”
अॅड अल्ताफ काजी म्हणतात, “ बेरोजगारी हा सर्व समाजामध्ये मूळ प्रश्न आहे. परंतु मुस्लिम समाजामध्ये बेरोजगारीसोबतच त्यांच्या अर्थकरणाचा देखील मोठा प्रश्न आहे. मुस्लिमांची आर्थिक स्थिति सुधारावी म्हणून याठिकानच्या प्रस्थापित मंडळींनी कोणतीही कामे केली नाहीत. एकहाती सत्ता असूनही त्यांनी कधी ड्रेनेजची व्यवस्था केली नाही. तसेच याठिकाणी शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.”
मुस्लिम समाजाच्या रोजच्या प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष, त्यांचे राजकीय भवितव्य, प्रतिनिधित्व हा मोठा प्रश्न लातूरप्रमाणेच राज्यभरात उपस्थित झाला आहे. आगामी निवडणुकीत या मुद्यांवर चर्चा केली जाईल अशी अपेक्षा मुस्लिम समाजाकडून व्यक्त केली जात आहे. येणाऱ्या निवडणुकीत या मुद्यांना व्यासपीठ मिळणार का? संबंधित प्रश्न मार्गी लागणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.