अहले हदीस संमेलनात उपस्थितांना संबोधित करताना डॉ. अब्दुल्लाह अल बुऐजान
मोहम्मद अकरम, दिल्ली
रविवारी दिल्लीच्या रामलीला मैदानात जमीयत ए अहले हदीसने आयोजित केलेल्या 'मानवतेचा आदर आणि जगातील धर्म' या विषयावरील दोन दिवसीय संमेलनाची सांगता झाली. शेवटच्या दिवशी देशभरातून आलेल्या हजारो लोकांनी मदिना येथील मस्जिद ए नबवीचे इमाम डॉ. अब्दुल्लाह बिन अब्दुल रहमान अल बुऐजान यांच्या नेतृत्वाखाली मगरीब आणि ईशा नमाज अदा केली. संमेलनात इमाम यांनी इस्लामच्या शिकवणींवर विचार मांडले आणि उपस्थितांना शांतता, मानवता आणि धार्मिक सहिष्णुतेचे महत्त्व पटवून दिले.
इस्लामची योग्य प्रतिमा सादर करणे मुस्लिम समुदायाचे कर्तव्य
इस्लामची शिकवण ही शांतता आणि सह-अस्तित्वाचे प्रतीक असल्याचे डॉ. अब्दुल्लाह बिन अब्दुल रहमान अल बुऐजान यांनी सांगितले. इस्लामची योग्य प्रतिमा जगासमोर सादर करण्याचे मुस्लिम समुदायाचे कर्तव्य असल्याची आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली. देशाच्या विकासासाठी, शांतता आणि बंधुत्व वाढविण्यात सर्वांनी आपली भूमिका पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आंतरधार्मिक सुसंवाद आणि शांततेवर भर
प्रेषित मोहम्मद यांच्या काळात झालेल्या समझोत्याचे उदाहरण देत मौलाना मेराज रब्बानी यांनी भारतात आदरभाव आणि सह-अस्तित्व स्वीकारण्याचे आवाहन केले.विविध धर्मियांसोबत शांतता पसरवणे, मोहल्ल्यांमध्ये शांतता समित्या स्थापन करणे आणि पोलीस सहकार्याने काम करणे आवश्यक असल्याचे, आणि त्यासाठी मुस्लिमांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
आतंकवादाविरुद्ध फतवा
आतंकवादाविरुद्ध सामूहिक फतवा जारी केल्याबद्दल ऑल इंडिया इमाम संघटनेचे अध्यक्ष उमैर इलियासी यांनी अहले हदीस जमातचे कौतुक केले. इस्लाम निर्दोषांच्या जीवाचे संरक्षण करण्याची शिकवण देतो आणि आतंकवाद इस्लामचा भाग नाही, या भूमिकेचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.
इस्लाम न्याय आणि शांततेवर आधारित
मौलाना जरजिस सिराजी यांनी न्याय आणि शांतता हे इस्लामचे आधार असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, न्याय असेल तेव्हाच जगात शांतता स्थापित होऊ शकते. फिलिस्तीन-इस्रायल संघर्षाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आणि पैगंबर मोहम्मद यांनी सांगितलेल्या युद्धाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
शांतता आणि सह-अस्तित्वावर संमेलनात देण्यात आला जोर
संमेलनाचे अध्यक्ष मौलाना असगर अली इमाम महदी सल्फी यांनी इस्लामचा इतिहास धार्मिक सहिष्णुता आणि मानवतेचा आदर करण्याची शिकवण देतो असे स्पष्ट केले. इस्लाम हा शांतता आणि बंधुत्वाचा धर्म असल्याची आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली. यावेळी त्यांनी धार्मिक सद्भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेची गरज अधोरेखित केली.
सर्वधर्मीय धर्मगुरूंनी दिला सह-अस्तित्वाचा आदर करण्याचा संदेश
या प्रसंगी व्यासपीठावर मुस्लिम नेत्यांसोबत मुस्लिमेतर धर्मगुरूंदेखील होते, त्यांनी यावेळी शांततापूर्ण सह-अस्तित्वाचे संदेश दिले. जैन धर्मगुरू आचार्य विवेक मुनि यांनी मानवतेच्या उन्नतीत धर्माच्या योगदानावर भर दिला. बौद्ध धर्मगुरू आचार्य येशीपंत शुक्ल यांनी सर्व धर्मातील लोकांनी शांततेसाठी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. सनातन धर्मगुरू आचार्य सुशील मणि यांनी धार्मिक मूल्यांचे पालन करून भारताला मजबूत आणि स्थिर बनवण्याचे महत्त्व स्पष्ट केले. जमीयत अहले हदीस तमिळनाडू-पांडिचेरीचे अमीर हाफिज अब्दुल वाहिद नाजिम आणि इतर वक्त्यांनी गरिबांची सेवा, पालकांचा सन्मान आणि धर्माच्या साध्या शिकवणी स्वीकारण्याचा संदेश दिला.
संमेलनाचा समारोप
हरियाणा जमीयत ए अहले हदीसचे अध्यक्ष डॉ. ईसा खान, जमात-ए-इस्लामी हिंदचे अमीर इंजिनियर सय्यद सआदतुल्लाह अल-हुसैनी, तसेच विविध राज्यांतील धर्मगुरू आणि प्रतिनिधींनी देखील संमेलनाला संबोधित केले. संमेलनाचा समारोप जमीयतचे अध्यक्ष मौलाना असगर सल्फी यांच्या आभार प्रदर्शनाने झाला, ज्यात त्यांनी शांतता आणि मानवतेची स्थापना करण्याचा दृढ संकल्प पुन्हा अधोरेखित केला.
-मोहम्मद अकरम