इस्त्राईल-हमास यांच्यात सुमारे सहा आठवड्यांपूर्वी सुरू झालेल्या युद्धाच्या भडक्याने गाझा पट्टीचा बराच भाग बेचिराख करून टाकल्यानंतर का होईना तात्पुरत्या शस्त्रसंधीचे शहाणपण दोन्ही बाजूंना सुचले, हेही नसे थोडके.
आता याचे रूपांतर कायमस्वरूपी शांततेत व्हावे, यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हायला हवेत. युद्धाचे उद्दिष्ट काय होते आणि प्रत्यक्षातील कारवाईचे स्वरूप काय, हे पाहिले तर त्यातील तफावत चटकन लक्षात येते.
हमाससारख्या दहशतवादाचा मार्ग स्वीकारणाऱ्या संघटनेचे कंबरडे मोडलेच पाहिजे, यात दुमत नाही. परंतु युद्धाच्या ज्वाळा सगळेच भस्मसात करीत निघाल्या आहेत. हमासने सात ऑक्टोबर रोजी इस्त्राईलवर केलेल्या हल्ल्याने बाराशे लोकांचा बळी घेतला;
प्रत्युत्तरादाखल इस्त्राईलने हमासविरोधात गाझा पट्टीत उघडलेल्या मोहिमेने आतापर्यंत चौदा हजारांवर पॅलेस्टिनींचा बळी घेतला आहे. या भागातील तेवीस लाखांपैकी सतरा लाखांवर नागरिक विस्थापित झाले आहेत.
इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन या दोघांच्याही समर्थकांनी युद्धविरोधी मोहिमा उघडलेल्या आहेत. हमास त्यांच्या ताब्यातील पन्नास इस्त्राईली नागरिकांची सुटका करणार आणि त्या बदल्यात इस्त्राईल त्यांच्या तुरुंगातील दीडशे पॅलेस्टिनी महिला, मुलांची सुटका करणार आहे.
चार दिवसांत ही प्रक्रिया पार पडत असतानाच इजिप्तमधून गाझामध्ये शेकडो ट्रकद्वारे गाझावासीयांना औषधे, अन्नधान्य, इंधन यांच्यासह जीवनावश्यक साहित्य पुरवठ्याचा मार्ग खुला केला जाईल.
हमासने आणखी अपहृतांच्या सुटकेची तयारी दाखवली, तर दहा व्यक्तींमागे एक दिवस याप्रमाणे शस्त्रसंधीचा अंमल वाढवला जाईल. इस्त्राईल-हमास संघर्षाने टोकाचे रूप घेतले असताना झालेल्या तात्पुरत्या शस्त्रसंधीने विचारविमर्शाला आणि थंड डोक्याने भविष्यातील योजना आखण्याला उभय बाजूंना अवधी मिळेल, हे खरे.
ही शस्त्रसंधी पूर्णविराम देणारी नसली तरी उभयतांमध्ये विश्वासाचे, समजुतीचे वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल म्हणता येईल. तथापि, त्याला व्यापक रूप द्यायचे की पुन्हा येरे माझ्या मागल्या करायचे हेदेखील यातील दोन्हीही बाजूंवर अवलंबून आहे.
हमासने इस्त्राईलवर केलेला दहशतवादी हल्ला अत्यंत निंदनीय आहे. त्याचे कधीच कोणीही कदापिही समर्थन करणार नाही. त्याला इस्त्राईलने दिलेले प्रत्युत्तर हा एका मर्यादेतच स्वसंरक्षणाचा भाग मानता येईल.
हमासला नेस्तनाबूत करण्याचा त्याचा इरादाही अमान्य करता येणार नाही. तथापि, हमासला धडा शिकवताना निष्पाप पॅलेस्टिनी नागरिकांचा इस्त्राईलने बळी घेणे, गाझा पट्टीतील रुग्णालये भुईसपाट करणे, तेथील नागरिकांचे अन्नपाणी तोडणे आणि युद्धविषयक संकेतांची कोणतीही पत्रास न ठेवता सर्वसामान्य नागरिक, रुग्ण, महिला-मुलांना लक्ष्य करणे, त्यांचा बळी घेणे हे हीन कृत्यच म्हटले पाहिजे.
त्यामुळेच सुरुवातीला हमासच्या हल्ल्यामुळे इस्त्राईलमागे जगभरातून उभे राहिलेले जनमत विरोधात जाऊ लागले. इस्त्राईलसह अमेरिका, युरोपातील अनेक देशांसह संयुक्त राष्ट्रांतही मानवतेच्या भूमिकेतून गाझातील पेच सोडवा, हीच भूमिका व्यक्त होत आहे.
या जनमताच्या रेट्याला अनुकूल अशी घटना हमासने ओलिसांच्या सुटकेच्या घेतलेल्या निर्णयाने घडत आहे. खरेतर हमासने इस्त्रायलींना ओलिस ठेवण्यासाठी केलेल्या अपहरणनाट्यापासूनच सुटकेच्या प्रयत्नांना प्रारंभ झालेला होता.
कतारने त्यात पुढाकार घेतला; मग अमेरिका, इस्त्राईल, इजिप्त यांचे राष्ट्रीय सुरक्षेतील व गुप्तचर यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये दीर्घकालीन वाटघाटी झाल्या. त्याला यश येऊन सुटकेचा आणि त्यादरम्यान शस्त्रसंधीचा निर्णय झाला. कतारचे अमीर शेख तमीम बीन हमद-अल थानी, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह अल-शिशी, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन तसेच इस्त्राईलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या कानापर्यंत सल्लामसलती जात होत्या आणि अखेरीस सुटकेचा मार्ग सुकर झाला.
काही दिवसांपूर्वी झालेल्या दोन अमेरिकी महिलांच्या सुटकेने उभयपक्षी विश्वासाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, आपल्या भूमिकेपासून इस्त्राईल तसूभरही मागे हटायला तयार नाही. हमासचा निःपात हेच त्याचे उद्दिष्ट आहे.
ही शस्त्रसंधी संपल्यानंतर गाझावासीयांना पुन्हा हल्ल्याला तोंड द्यावेच लागेल, अशी दर्पोक्ती नेतान्याहू यांनी केली आहे. खरे तर इस्त्राईलने युद्ध संपवण्याच्या दिशेने पावले टाकावीत, अशी जगभरातून मागणी आहे. ६८ टक्के अमेरिकी शस्त्रसंधीच्या बाजूने आहेत.
वंशभेदाच्या आगीने होरपळलेल्या ज्यू नागरिकांनी पॅलेस्टिनींचा चालवलेला नरसंहार म्हणजे इतिहासातून धडा न घेता चालवलेली कारवाई, अशी टीका होत आहे. इस्त्राईलमध्ये सध्या नेतान्याहूंची लोकप्रियताही घटत आहे.
इस्त्राईली जनमत युद्ध थांबवण्याच्या दिशेने वळत आहे. याची कारणे अनेक आहेत. इस्त्राईलच्या अर्थकारणाला ग्रहण लागत आहे. इस्त्रायलींना सेवा देणाऱ्या कंपन्या आणि इस्त्राईलकडून सेवा व तांत्रिक सहकार्य घेणाऱ्या कंपन्यांच्या कामकाजाचा खोळंबा होतो आहे.
महत्त्वाचे म्हणजे कुशल मनुष्यबळ युद्धाच्या आघाडीवर गेल्याने कंपन्यांचे कामकाज विस्कळीत झाले आहे. अल-शिफा रुग्णालयाखालून हमासने बोगदे केले आहेत, तेथे त्यांची शिबंदी आहे, असे सांगत इस्त्राईलने त्यावर घृणास्पद हल्ला केला.
इस्त्राईल आपल्या आरोपाच्या पुष्ट्यर्थ सज्जड पुरावा देऊ शकलेले नाही. सूडाचे हे चक्र थांबवणे व्यापक हिताचे आहे. शस्त्रसंधी तात्पुरती न राहता त्याद्वारे इस्त्राईल आणि हमास यांच्यात एकमेकांबाबत विश्वास कसा वाढवता येईल, याचे प्रयत्न अमेरिका व इतर मध्यस्थांकडून किती परिणामकारकरीत्या होतात, यावर शांतता अवलंबून आहे.