भारताने युद्धतंत्रात 'अशी' घेतली ऐतिहासिक झेप

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 13 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

आजच्या युगात युद्ध रणांगणाप्रमाणेच हवेत, अवकाशात आणि सायबर स्पेसमध्येही लढले जाते आहे. ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि मानवरहित विमाने यांसारखी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे जगभरातील संरक्षणपद्धतींना नवे आव्हान देत आहेत. अशा परिस्थितीत भारताने 'लेझर-आधारित ऊर्जा शस्त्रप्रणाली'ची यशस्वी चाचणी करून एक ऐतिहासिक झेप घेतली. 

आंध्र प्रदेशमधील कर्नूल येथील 'नॅशनल ओपन एअर रेंज' (NOAR) येथे भारताने १२ एप्रिल २०२५ रोजी एक अत्यंत महत्त्वाची आणि भविष्यकालीन चाचणी यशस्वीरीत्या केली. यात साडेतीन किमी अंतरावरील ड्रोन आणि स्वार्म ड्रोन यांना निष्क्रिय करण्यात यश मिळवले. हे परीक्षण केवळ एक वैज्ञानिक यश नव्हे, तर भारताच्या भविष्यातील संरक्षणयोजनेत एक क्रांतिकारी टप्पा ठरला आहे. या चाचणीनंतर अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि इस्राईलसारख्या अग्रेसर देशांच्या पंक्तीत भारत सामील झाला आहे यात ३० किलोवॅट शक्तीची लेझर शस्त्रप्रणाली वापरून ३.५ किमी अंतरावरील ड्रोन आणि स्वार्म ड्रोन यांना निष्क्रिय करण्यात देशाने यश मिळवले.

जगभरातील संरक्षण क्षेत्रात आता नॉन-कायनेटिक युद्धप्रणालीला अधिक महत्त्व दिले जात आहे. नॉन-कायनेटिक म्हणजे शत्रूच्या सैनिकांवर थेट गोळीबार न करता किंवा विहल्ला न करता, त्यांच्या तंत्रज्ञानावर आघात करणे. यात सायबर हल्ले, सिग्नल जमिंग, ईएमपी (इलेक्ट्रो-मॅग्नेटिक पल्स) हल्ले आणि डीईडब्लू (Directed Energy weapons लेझर बीम) या प्रमुख प्रणाली आहेत. भारताने यामध्ये पाय ठेवून भविष्यातील युद्धासाठी तयारी सुरू केली आहे. 

आजच्या युगात युद्ध हे केवळ रणांगणात लढले जात नाही, तर ते हवेत, अवकाशात आणि सायबर स्पेसमध्येही लढले जाते. ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि मानवरहित विमाने यांसारखी अत्याधुनिक हत्यारे जगभरातील संरक्षण पद्धतींना नवे आव्हान देत आहेत. अशा परिस्थितीत भारताने 'लेझर आधारित ऊर्जा शस्त्रप्रणाली'ची यशस्वी चाचणी करून एक ऐतिहासिक झेप घेतली आहे. ही प्रणाली एक उच्च ऊर्जेची लेझर बीम उत्सर्जित करते, जी शत्रूच्या ड्रोन, क्षेपणास्त्र किंवा अन्य हवाई उपकरणांपर्यंत अत्यंत अचूकतेने पोहोचते. या लेझर बीममुळे संबंधित उपकरणाचे संरचनात्मक नुकसान होते किंवा त्याचे सेन्सर अंध होतात, ज्यामुळे ते निष्क्रिय होते. 

DEW Mk-II(A) ही भारताची चाचणीप्रणाली ३० किलोवॅटची ऊर्जा निर्माण करते. ही ऊर्जा इतकी प्रभावशाली आहे की ती फिक्स्ड-विंग UAV (Unmanned Aerial Vehicle) आणि एकाधिक ड्रोनसारख्या 'स्वार्म' हल्ल्यांवर त्वरित परिणाम करू शकते. हे शख युद्धातील वेगवान प्रतिसादासाठी (तीन लाख किमी प्रतिसेकंद) खास तयार करण्यात आले आहे.

लेझर शस्त्रप्रणालीसारख्या नव्या संरक्षणयंत्रणांची गरज का भासते आहे, हे समजण्यासाठी आजच्या युद्धांचे स्वरूप पाहणे आवश्यक आहे. इस्राईलने आयरन डोम वापरून पॅलेस्टाईनकडून येणाऱ्या रॉकेट हल्ल्यांपासून आपल्या नागरिकांचे संरक्षण केले आहे. युक्रेनने रशियन ड्रोन व मिसाईल्सविरोधात पाश्चिमात्य संरक्षणप्रणालींचा वापर करून बचाव साधला.

या दोन्ही युद्धांतून एक गोष्ट स्पष्ट झाली पारंपरिक शस्त्रपिक्षा हलकी, वेगवान, आणि बहुसंख्येने येणारी हवाई उपकरणे, विशेषतः स्वार्म ड्रोन, (ड्रोनचा जथा) ही नव्या युगातील मोठी धोक्याची घंटा आहेत. अशा वेळी प्रत्युत्तरही अधिक अचूक, चपळ आणि कमी खर्चिक असले पाहिजे आणि याचं उत्तर म्हणजे लेझर-आधारित ऊर्जाशख. या प्रणालीचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे याचा वापर करताना होणारा अत्यल्प खर्च. एखादे क्षेपणास्त्रप्रक्षेपण करण्याचा खर्च कोटीत असतो, तर लेझर शस्ख काही सेकंद वापरल्यास फक्त दोन ते तीन लिटर पेट्रोलइतका खर्च होतो. 'लो-कॉस्ट पर किल' म्हणजे अत्यल्प खर्चात लक्ष्याचा नाश, ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा 'संशोधन व विकास संघटने'चा (डीआरडीओ) हा प्रयत्न भविष्यातील युद्धशास्त्रासाठी क्रांतिकारी ठरू शकतो.

बहुपातळी सुरक्षा
ही लेझर प्रणाली एका विशेषरीत्या डिझाइन केलेल्या वाहनावर बसवण्यात आलेली आहे, त्यामुळे रणांगणात ती सहज हलवता येते. चाचणीदरम्यान याच प्रणालीने हेवाईतून येणाऱ्या लक्ष्यांचा अचूक वेध घेत त्यांना निष्क्रिय केले, यामध्ये ड्रोनचे केवळ बाह्य नुकसान होणे नव्हे, तर त्यांचे सेन्सर्स पूर्णपणे अकार्यक्षम होणे हेही सिद्ध झाले. या शस्वप्रणालीसह भारत आर्टिफिशियल इंटेलिजन्स, थर्मल इमेजिंग, आणि मल्टीलेअर डिफेन्स यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानांचा समावेश करत आहे.

भविष्यात शत्रू विविध दिशांनी एकाच वेळी हल्ला करू शकतो, त्यामुळे प्रत्युत्तर देण्यासाठी बहुपातळी सुरक्षा आवश्यक आहे. लेझर शस्त्र ही त्यादिशेने एक मोठी झेप आहे. अनेक देश सध्या लेझर शस्त्रप्रणालींचा सक्रियपणे विकास व तैनात करत आहेत, आणि त्यांची क्षमता वेगवेगळ्या ताकद व श्रेणीमध्ये आढळते. अमेरिका, चीन, रशिया आणि इस्त्राईल हे देश लेझर शस्वतंत्रज्ञानाच्या आघाडीवर असून, यातील काही देशांनी यंत्रणा प्रत्यक्षात तैनातही केल्या आहेत उदाहरणार्थ, अमेरिकेच्या नौदलाची HELIOS प्रणाली. या प्रणाली प्रकाशाच्या वेगाने लक्ष्यांवर हल्ला करू शकतात आणि त्यांचा वापर हवामार्ग संरक्षण, क्षेपणास्त्र आणि interception सारख्या विविध उद्दिष्टांसाठी केला जातो.

भविष्यातील भारतीय योजना
भारत सरकारत् २०३०पर्यंत 'अत्याधुनिक संरक्षण साधननिर्मिती' हा प्राधान्याचा विषय मानला आहे. स्रोतांनुसार 'डीआरडीओ याच क्षेत्रात पुढील तंत्रज्ञानावर काम करत आहे: १००० किलोवट क्षमतेची DEW प्रणाली जिचा वापर मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी होईल. उच्च कार्यक्षम ऑप्टिक्स आणि ट्रॅकिंग तंत्रज्ञान ज्यामुळे वेगवान ड्रोन आणि हायपरसोनिक शस्त्रांचा वेध घेणे शक्य होईल. इंटिग्रेटेड बॅटल मॅनेजमेंट सिस्टम्स ने लेझर शस्वांना एआयद्वारे लक्ष्य निवडण्याची क्षमता देतील. याशिवाय, भारतीय संरक्षण संशोधन संस्थांचा खासगी क्षेत्राशी वाढता समन्वयदेखील भविष्यातील प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरत आहे. ही प्रणाली संपूर्णतः स्वदेशी आहे, म्हणजेच भारतातच विकसित करण्यात आली असून कोणत्याही परकी तंत्रज्ञानावर अवलंबून नाही. या प्रणालीचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे ती कमी ऑपरेशनल खर्चात चालते. एकदा ऊर्जास्रोत तयार झाला की, त्याचा वापर अनेकदा करता येतो आणि गोळ्यांच्या साठ्याची गरज उरत नाही.

भारताचा हा प्रयोग म्हणजे केवळ एक वैज्ञानिक यश नाही, तर जागतिक संरक्षण क्षेत्रात एक ठसा उमटवणारी गोष्ट आहे. अत्यल्प खर्च, अधिक अचूकता, आणि अवकाशयुद्धातील स्वच्छ व टिकाऊ पर्याय हे 'डायरेक्टेड एनर्जी वेपन'चं भविष्यातील महत्त्व ठरवणार आहे. लेझर शस्त्रप्रणाली म्हणजे केवळ विज्ञानकथा नव्हे; ती आता वास्तव बनली आहे. भारताने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर आपली क्षमता सिद्ध केली आहे. ही प्रणाली केवळ शत्रूला रोखण्यासाठी नव्हे, तर भविष्यातील युद्धात सामध्यनि उभे राहण्यासाठीही एक अनमोल साधन ठरणार आहे.

डॉ. सुरेश नाईक 
लेखक 'इस्रो'चे माजी समूह संचालक आहेत.