भारतोदय : उत्तम संरक्षण नीतीमुळे मिळू लागली आहे जागतिक ओळख

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पुढील दोन बाबींची निश्‍चिती करून घेणं ही भारताच्या संरक्षण मुत्सद्देगिरीची उद्दिष्टं आहेत : १) भारताचं सार्वभौमत्व आणि देशाची अखंडता अबाधित राखणं २) शांततापूर्ण व स्थैर्य प्रदान करणारं वातावरण निर्माण करणं; ज्यामुळे भारतातील लोकांना जलद आर्थिक प्रगती व सुबत्ता साध्य होईल.
 
भारताचं परराष्ट्रधोरण हे गौतम बुद्ध यांच्या आणि महात्मा गांधी यांच्या शिकवणुकीवर आधारित आहे, ज्यात शांततामय सहजीवनाच्या दृष्टिकोनाला आणि मानवजातीच्या ऐक्याला आकार देणं या बाबी प्रामुख्यानं अभिप्रेत आहेत.भारताच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या चे ट्वेंटी परिषदेचे घोषवाक्य ही एक पृथ्वी एक कुटुंब आणि एक भविष्य असेच होते ही भावना भारताच्या नसानसात राहिली वाहते महा उपनिषदांमध्ये ही भावना वसुधैव कुटुम्बकम अशी व्यक्त झाली आहे.भारताच्या परराष्ट्रधोरणात (मुत्सद्देगिरीत) अहिंसा ही केंद्रस्थानी आहे; पण ही अहिंसा आक्रमणकर्त्यांना रोखण्याच्या व त्यायोगे भारताचं भक्कम संरक्षण करण्याच्या मार्गातील अडथळा ठरू दिली जात नाही.
 
अठराव्या शतकातील एक तत्त्ववेत्ते कार्ल वॉन क्लॉजविस त्यांच्या एका प्रसिद्ध वचनात म्हणतात की -‘युद्ध म्हणजे अन्य मार्गांनी राजनीती सुरू ठेवणं होय.’ कौटिल्यांच्या ‘अर्थशास्त्रा’त ‘मंडळ’ या संकल्पनेवर सखोल विचार केलेला दिसतो, ज्यात संरक्षण, राज्यकारभार व परराष्ट्रधोरण यांची प्रभावी अंमलबजावणी सुचवण्यात आलेली आहे. त्यात मित्रराष्ट्रांचं स्वरूप व महत्त्व, तसंच स्वहिताची तत्त्वं, जी अशा मैत्रीबरोबरच येतात, ती अधोरेखित केलेली आहेत.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हा ग्रंथ एक चाणाक्षपणा सुचवतो व तो हा की, जेव्हा एखाद्या देशाकडे त्याचं सशक्त सैन्यबळ असतं तेव्हा मित्रराष्ट्रे त्या देशाबरोबर मैत्रीपूर्ण वर्तनव्यवहार करतात आणि अगदी शत्रुराष्ट्रेही आणखीच मैत्रीपूर्ण वर्तणूक ठेवतात. सशक्त सैन्य जवळ बाळगणं आणि संरक्षण-मुत्सद्देगिरीचा (नीतीचा) यथोचित वापर करणं या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या परस्परनिगडित आहेत.

हाच कदाचित थिओडोर रुझवेल्ट यांच्या इशारेवजा सल्ल्याचा पाया असावा, त्यात ते म्हणतात - ‘मृदू बोला; पण हातात एक भलीमोठी काठी असू द्या; यातच तुमची लांब पल्ल्याची प्रगती दडलेली आहे.’ त्याचप्रमाणे तुमच्याजवळील एक सक्षम सेना तुमचं शांततेचं ध्येय गाठण्यासाठी साह्यभूत ठरते.

गाइल्स हार्लो आणि जॉर्ज गेर्स हे अमेरिकी तत्त्वज्ञ म्हणतात : ‘तुमच्या कब्जात असलेली शांतिसेना इतरांकडून तुमच्याशी होणाऱ्या सभ्य वर्तनव्यवहारात आणि सद्वर्तनाच्या धोरणात किती मोठं योगदान देऊ शकते याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही.’ विशेषत: उत्तरेकडे चीनबरोबर आणि पश्‍चिमेकडे पाकिस्तानबरोबर लांबलचक, तसंच सतत तणावग्रस्त सीमा असलेल्या भारतासारख्या एका विशाल देशाला त्याच्या, या देशांबरोबर असलेल्या सीमावादाचे प्रश्‍न, शांततापूर्ण मार्गांनी सोडवण्याचा प्रयत्न सुरू ठेवणं गरजेचं आहे; हे जरी खरं असलं तरीही त्याच वेळी देशाच्या सीमांवरची सैन्य/ सुरक्षितता यांमध्ये यत्किंचितही ढिलाई होऊ देता कामा नये व ते परवडणारंही नाही.
 
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान म्हणून असलेल्या कारकीर्दीत भारतीय लष्कराला चांगला निधी व चांगली शस्त्रसामग्री मिळाली आहे; ज्यायोगे भारतीय लष्कर त्याच्यापुढची विविध आव्हानं व धमक्या यांना चोखपणे प्रत्त्युत्तर देण्यासाठी सक्षम आहे; मग ही आव्हानं भूस्तरीय मार्गांनी येणारी असोत वा सागरी मार्गांनी येणारी असोत.

संरक्षणधोरणाची (मुत्सद्देगिरीची) हाताळणी व त्याची अंमलबजावणी करण्याचा भारताला प्रदीर्घ इतिहास व अनुभव आहे. भारतानं अवलंबलेल्या संरक्षण-मुत्सद्देगिरीची अशी उदाहरणं रामायणात व महाभारतात पाहायला मिळतात. महाभारतयुद्धात कौरव आणि पांडव यांच्या दरम्यान श्रीकृष्ण हे एक शांतिदूत म्हणून भूमिका निभावतात.

भारताचा संरक्षणधोरणासंदर्भातील विचार हा व्याप्ती आणि आशय यांच्याबाबतीत समृद्ध आहे. ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथापासून बरंच काही शिकण्याजोगं आहे. त्यात साम (संवाद), दाम (आमिष), दंड (शिक्षा) आणि भेद (फूट पाडणं) या नीतीचा समावेश होतो.

आजच्या अनिश्‍चिततेनं भरलेल्या जगात - ज्यात सत्तेचं संतुलन सतत बदलत असतं अशा जगात - भारताची संरक्षणधोरणामधील स्वायत्तता, तसंच भारताला समविचारी, सहचारी देशांबरोबर सहकार्य करून भारतासाठी संरक्षणसामग्रीची निर्मिती आणि त्याबाबतची व्यवस्था करण्याबाबत योग्य ते निर्णय घेण्याची पूर्ण मुभा आहे.

भूस्ततरीय व सामरिक (सागरी) शक्ती म्हणून भारत आपलं संरक्षणविषयक धोरण ठरवत आहे; मग ते धोरण भूभागांवरील सीमांवरील असो किंवा शेजारीदेशांबरोबर असलेल्या, लांबपर्यंत पसरलेल्या भूभागावरील असो किंवा विस्तीर्ण सागरी क्षेत्रावर पसरलेल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील असो. संरक्षणधोरण (मुत्सद्देगिरी) फार उपयोगाचं (महत्त्वाची) असते. त्याचा वापर मित्रराष्ट्रांबरोबर मैत्री आणि सहकार्य वाढवण्यासाठी केला जातो.

उच्चस्तरीय संरक्षणाचं आदान-प्रदान, संयुक्त संरक्षण/युद्धसराव, मैत्रीपूर्ण सांस्कृतिक संबंध आणि खेळांचं आयोजन या बाबी त्याच मार्गदर्शकतत्त्वांचा भाग आहेत. भारतानं आपल्या वाढत्या संरक्षणव्यवस्थेची क्षमता भक्कम करतानाच भारतीय भूभागातील व भारताच्या आजूबाजूच्या क्षेत्रांतील समस्या हाताळताना सर्वप्रथम आणि तत्काळ प्रतिसाद देणारा देश अशी स्वत:ची विश्‍वासार्ह प्रतिमा तयार केली आहे.

सन १९८८ मध्ये भारताने मालदीवमधील बंड रोखण्यासाठी तिथं भारतीय लष्कराच्या तुकड्या पाठवल्या होत्या. ‘ऑपरेशन कॅक्टस’ या नावानं ती मोहीम ओळखली जाते. सन २००४ मध्ये आलेल्या सुनामीच्या वेळी भारतानं आपल्या सामरिक आणि हवाईक्षमतेचा वापर भारतासाठी व भारताच्या आजूबाजूच्या भूभागातील देशांसाठी मानवी दृष्टिकोनातून मदत व आपत्तीपासून बचावकार्य (एचएडीआर) करण्यासाठी केला.

अगदी नजीकच्याच भूतकाळात (२०१५ मध्ये) भारतीय संरक्षण दलांनी येमेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना भारतात सुरक्षितपणे परत आणलं आहे. ती मोहीम ‘ऑपरेशन राहत’ म्हणून संबोधलं जातं. भारतानं तशाच प्रकारची स्तुत्य कामगिरी युक्रेनमध्ये २०२२ मध्ये व दक्षिण सुदानमध्ये २०२३ मध्ये केली, या मोहिमा अनुक्रमे ‘ऑपरेशन गंगा’ व ‘ऑपरेशन कावेरी’ या नावांनी ओळखल्या जातात.

कोरोनामहामारीच्या काळात, आपल्या संरक्षण-मुत्सद्देगिरीचाच एक भाग म्हणून, भारतीय लष्करानं जगातील कित्येक देशांना प्राणवायू (ऑक्सिजन), वैद्यकीय साहित्यसामग्री आणि तत्सम स्वरूपाची इतर मदत पोहोचवली.
 
जेव्हा भारतीय नौदलाची जहाजं जगभरातील देशांना मैत्रीपूर्ण भेटी देतात तेव्हा भारत व त्याची मित्रराष्ट्रे संयुक्त लष्करी सराव घेतात, भारतीय संस्कृती, खाद्यसंस्कृती यांचा जगाला परिचय करून देतात, त्यांचा प्रसार करतात, तसंच बऱ्याचदा त्या त्या देशातील काही स्थानिक पायाभूत सुविधांची दुरुस्ती करण्यात मदत करतात आणि त्यायोगे क्षमतानिर्मितीच्या कार्यक्रमांचं मजबूतीकरण करण्यासाठी मदतही करतात.

तद्वतच, जेव्हा भारताचे हवाई लढवय्ये आणि लष्करी कर्मचारी मित्रराष्ट्रांबरोबर संयुक्त लष्करी सराव करतात तेव्हा ते एक सर्वसंमत, नियमांधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था कायम करण्याची पायाभरणी करण्यासारखं, त्यासाठी पृष्ठभूमी तयार करण्यासारखं फार मूलभूत काम करत असतात.

संरक्षण-मुत्सद्देगिरीचा एक भाग आणि भारतानं स्वत:च्या सैन्यदलांचं नुकसान सहन करून विमानं, टेहळणी-जहाजं आणि हेलिकॉप्टरही इतर देशांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध व त्यांच्यामध्ये सद्भावना निर्माण करण्यासाठी म्हणून कित्येक राष्ट्रांना भेट म्हणून दिलेली आहेत. ज्यांत मॉरिशसपासून मालदीव, श्रीलंका, अफगाणिस्तान व इतरही काही देशांचा समावेश आहे.

कित्येक वेळा, राष्ट्राराष्ट्रांमध्ये परस्परविश्‍वासाच्या निर्मितीचे पर्याय तयार करण्यासाठी, तसंच राष्ट्रांमधील ताणतणाव कमी करण्यासाठी आणि संघर्ष टाळण्यासाठी भारतानं आपली संरक्षण-मुत्सद्देगिरी वापरलेली आहे/लागू केलेली आहे. ज्या देशांबरोबर भारताचे अगदी वैरभावाचे संबंध आहेत, तसंच सीमावादाचे प्रश्‍न आहेत, अशा देशांच्या बाबतीतही भारतानं आपली संरक्षणनीतीची (मुत्सद्देगिरीची) व्याप्ती ही एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकेल अशीच ठेवलेली आहे.

उदाहरणार्थ : भारत आणि चीन यांच्या दरम्यान भारताकडून एक शासकीय (अधिकृत) पातळीवरच्या संवादाची यंत्रणा, सीमेवरील लष्करी अधिकारी/कर्मचारी यांच्या दरम्यान नियोजित बैठका, अनियोजित/तातडीनं घेतलेल्या बैठका आणि सीमेवरील ‘तत्काळ प्रतिसाद फोनलाईन’ (हॉटलाईन) यांच्याद्वारा संवाद सुरू ठेवला जातो ज्यायोगे २०२० मधील गलवानमधील रक्तरंजित घटनेनंतरही भारत-चीन दरम्यान एक संपर्क व संवाद सुरू राहण्यास मोलाची मदत होऊ शकली.

हे पाकिस्तानसाठी एक उदाहरण आहे व ही एक दुर्दैवी वस्तुस्थिती आहे की, पाकिस्तानबरोबरच्या भारताच्या वर्तन-व्यवहारात संरक्षण-मुत्सद्देगिरीला, जर काही असेलच तर, फारच मर्यादित महत्त्व आहे; कारण, पाकिस्तानमधील सैनिकी यंत्रणा ही भारताबद्दल कट्टर पद्धतीचा शत्रुभाव बाळगते व भारताला अस्थिर करण्यासाठी सीमेपलीकडून दहशतवादाचा वापर सातत्यानं करते.

ईदच्या आणि दिवाळीच्या विशिष्ट प्रसंगी सीमेवर एकमेकांना मिठाईची देवाण-घेवाण करण्यापलीकडे पाकिस्तानबाबत भारताची संरक्षण-मुत्सद्देगिरी कुचकामी ठरते; कारण, पाकिस्तान हा जो आपला विशिष्ट शेजारी आहे, त्याला भारताबरोबरचा सभ्य वर्तनव्यवहार हा अडचणीचाच वाटतो.

कारण, त्याच्या मनात भारताबद्दलची जी मूलगामी भावना/प्रतिमा आहे, त्यात भारत हा त्यांचा असा शत्रू आहे, ज्याला ‘हजार ठिकाणी घाव घालून रक्तबंबाळ करायचं आहे.’ पाकिस्तानच्या या सूत्राला हा सभ्य संवाद अडथळा ठरतो, असं त्या देशाला वाटतं.

अगदी शत्रूबरोबरच्या युद्धातही शत्रुराष्ट्राच्या जखमी सैनिकांची हाताळणी करताना भारतीय लष्कर अत्यंत उच्च दर्जाच्या मानवी सन्मानाचं/तत्त्वांचं पालन करतं. इथं एका गोष्टीची आठवण आवर्जून करून द्यायला हवी व ती म्हणजे, सन १९९९ मध्ये पाकिस्तानशी झालेल्या कारगिलयुद्धाचा परमावधीचा काळ असतानाही भारतानं (भारतीय लष्करानं) पाकिस्तानच्या मृत सैनिकांचे अंत्यसंस्कारही त्यांच्या (पाकिस्तानच्या) धार्मिक रीती-रिवाजांनुसार योग्य पद्धतीनं केले होते व जिथं जिथं आणि जेव्हा जेव्हा शक्य होतं तिथं तिथं आणि तेव्हा तेव्हा पाकिस्ताच्या मृत सैनिकांचे अवशेषही पाकिस्तानला सन्मानपूर्वक परत केले गेले होते.

हा भारताच्या समृद्ध/सभ्य संरक्षण-मुत्सद्देगिरीचा (नीतीचा) भाग आहे. त्याला आपल्या लष्कराच्या बाबतीत पाकिस्तानकडून तसाच सन्मानाचा प्रतिसाद कधीच मिळाला नाही. उलट, पाकिस्तानच्या ताब्यातील भारताच्या मृत जवानांची शरीरं मृत्यूनंतरही पाकिस्तानकडून छिन्नविछिन्न केली जातात.

भारतीय नाविक दलाचं इंडियन ओशन नेव्हल सिम्पोसियम (आयओएजएस), इंटरनॅशनल फ्लीट आणि खासकरून भारताची भव्य प्रजासत्ताकदिन परेड यांचं भारताच्या संरक्षण-मुत्सद्देगिरीची अंमलबजावणी करण्यातील योगदान लक्षणीयरीत्या विलक्षण आहे.

- सुजान चिनॉय, [email protected]
(लेखक हे ‘मनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज् अँड ॲनॅलिसिस’चे महासंचालक, ‘जी-२०’ अध्यक्षपरिषदेचे अध्यासन प्रमुख आणि भारताचे जपानमधील माजी राजदूत आहेत.)
 
(अनुवाद : डॉ. बजरंग सुखदेवराव कोरडे)

 
'भारतोदया'विषयीचे हे महत्त्वाचे लेखही वाचा: