हाथरस घटना : सत्संग आणि असंग

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 5 Months ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

कुणी कुणाच्या पायावर डोके टेकावे आणि कुणाला मोजुनी शाब्दिक पैजारा माराव्यात, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. श्रद्धेने कुठेतरी मस्तक ठेवावे, आणि नशिबात असेल ते भोगायला तयार व्हावे, ही तर मुमुक्षुंची सामान्य धारणा असते. श्रद्धेपोटी एकत्र येऊन मनातील देवत्वाला भजावे, हा काही कुविचार मानायचे कारण नाही. सामान्य जीविते असल्याच श्रद्धांच्या काड्यांच्या आधारे भवसागरात तरंगत असतात. आपल्या देशात अनेक धर्म नांदतात, आणि त्यांचे मेळावे, सत्संग आदी कार्यक्रम नित्यनेमे होत असतात. परमेशाच्या दरबारात सारे सारखेच या मनोभावाने सतरंज्यांवर बसून व्यासपीठावरील धर्मवाक्ये ऐकत असतात.

यात सुपंथावर चालण्याची शिकवण देणारे गुरु असतात, तसेच कुठे कुठे श्रद्धाळूंच्या गर्दीचा फायदा उकळून आपले तथाकथित अध्यात्म पुडीत गुंडाळून विकणारे भोंदू येरुदेखील असतात. गुरु आणि येरुंची ही सरमिसळ समाजाला अधिकच गोंधळात टाकते. अनेक सत्संग कार्यक्रमांमध्ये सामाजिक जाणीवा रुजवण्याचे प्रामाणिक प्रयत्न होताना दिसतात. कुठे व्यसनमुक्तीचे दरवाजे उघडून मिळतात. असा सत्संग आवश्यकही म्हटला पाहिजे. किंबहुना, चांगल्या हेतूने आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून चांगल्या समाजाच्या घडणीचे काम कळत- नकळत होत असते. परंतु, आश्रम-मठांच्या नावाखाली कोट्यवधींची संपदा गोळा करणारे हे बाबा आणि महाराज यांचीही आपल्या देशात कमतरता नाही. अशा परिस्थितीत उडदामाजी काळे गोरे निवडण्याचे तारतम्य सामान्यजनांनाच दाखवावे लागते, आणि नेमकी तिथेच फसगत होण्याची शक्यता असते. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या अशाच एका सत्संग मेळाव्यातील चेंगराचेंगरीत १२१ श्रध्दाळूंचा हकनाक बळी गेला. कुण्या नारायण साकार विश्व हरि नामक भोलेबाबाच्या या मेळाव्याला अडीच लाखांची गर्दी जमली होती, आणि भोलेबाबांची चरणधूळ घेण्यासाठी धावलेल्या श्रद्धाळूंमध्ये अभूतपूर्व चेंगराचेंगरी होऊन भलतेच होऊन बसले. भारतात असल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटना नवीन नाहीत.

या दुर्दैवी अपघातमालिकेला चक्क सहा-सात दशकांचा इतिहास आहे. तथापि, गर्दीचे व्यवस्थापन, तंत्रज्ञान, सुरक्षाव्यवस्था हे सारे आधुनिक होत असतानाही हे प्रकार थांबत का नाहीत, हा खरा प्रश्न आहे. कुण्या बाबा-महाराजांच्या सत्संगाला लाखांची गर्दी होणारच, हे अगदी ठरलेले चित्र असते. या बाबालोकांचा तामझाम, अंधश्रद्धांना पोसणारा त्या मंडपातील माहौल, अनुग्रह किंवा किमानपक्षी आशीर्वादासाठी जमलेली ती निरपराध गर्दी…हे भारतीय दु:श्चित्र आता परदेशातही बऱ्यापैकी ठळकपणे माहीत झाले आहे. अशी दुर्घटना घडली की साधारणत: स्थानिक प्रशासनाची बेपर्वाई, सरकारी अनास्था यावर खापर फोडण्याचा जाहीर कार्यक्रम, नुकसानभरपाईवरुन होणारे राजकीय वितंडवाद, अंतिमत: काही सेवादारांची धरपकड आणि डझनभर सरकारी कर्मचाऱ्यांचे निलंबन याच अनुक्रमाने सारे काही थंड बासनात जाते. मुळात असले प्रकार टाळण्यासाठी काय करायला हवे आहे, याची चर्चा करण्यात कुणालाच स्वारस्य नसते. हाथरसच्या दुर्घटनेतील भोलेबाबांच्या जवळदेखील अद्याप पोलिस यंत्रणा पोहोचू शकलेली नाही. प्राथमिक अहवालात त्यांचा उल्लेखसुद्धा नाही. याला काय म्हणायचे? गर्दीचे बळ बाळगणाऱ्या या बाबालोकांकडे मतांचे गठ्ठे असतात, आणि ऊर्ध्वगामी राजकारण्यांचा डोळा त्या गठ्ठ्यांवर असतो, म्हणूनच अशा लोकांचे फावते. परिपाठानुसार उत्तर प्रदेश सरकारने या दुर्घटनेची न्यायिक चौकशी करण्याचे आदेश जारी केले असून विशेष तपास पथकही नेमले आहे.

यातून हाती लागेल ती फक्त फुटकळ नुकसानभरपाई आणि काही जणांना तुरुंगवासाची शिक्षा. हा काही मूलभूत उपाय नव्हे. सत्संग मेळाव्यांना श्रद्धाळू जमाव येतो, याला काही समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय कारणे आहेत. त्या खोल पाण्यात न उतरतादेखील प्रशासकीय पातळीवर काही गोष्टी टाळता येऊ शकतात. मुळात असे मेळावे आयोजित करण्यापूर्वी आयोजकांची तयारी कितपत आहे, याची पाहणी करणारी यंत्रणा हवी. सत्संग अथवा भव्यदिव्य प्रचारसभा किंवा रोडशोसाठी परवानगी देतानाही गर्दीचे व्यवस्थापन कसे होणार, याकडे लक्ष देणारी आचारसंहिता हवी. किंबहुना, सत्संग मेळावे घेणे हा जो एक व्यवसाय होऊ पाहात आहे, त्याला अटकाव करणारे कायदे हवेत. या सगळ्याचीच आपल्याकडे वानवा आहे. स्वतंत्र भारताचा इतिहास वरवर चाळला तरी असे दिसते की, असे चेंगराचेंगरीचे प्रकार किमान दोन डझनवेळा होऊन गेले आहेत. ही अपघातांची मालिका थांबता थांबत नाही, या विचाराने उद्विग्न करते. भारत हा गर्दीचा देश आहे, आणि श्रद्धाळूंचाही. आपण ठेवलेल्या मस्तकाच्या ठिकाणी मार्गदर्शक गुरुचे पाय आहेत की कुण्या भोंदूबाबाचे खूर, हे ओळखण्याचे तारतम्य गर्दीच्या ठायी असतेच असे नाही. इथेच प्रबोधनाच्या ‘खऱ्या’ सत्संगाची गरज भासते.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter