भारताच्या शेवटच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती करणारी मुस्लीम महिला 'सुरैय्या तैयबजी'
आपण देशाच्या तिरंग्याकडे पाहतो तेव्हा आपली छाती गर्वाने, अभिमानाने आणि देशभक्तीने भरून येते. तिरंगा हा आपल्या देशाच्या एकात्मतेचा आणि अखंडतेचा प्रतीक आहे. अशा देशाच्या अस्मितेचाही प्रतीक असलेल्या तिरंग्याची रचना नेमकी कशी झाली?, जाणून घेऊयात सविस्तर...
ट्रेवर रॉयल या इंग्लिश इतिहासकाराने आपल्या 'द लास्ट डेज ऑफ राज' या पुस्तकात लिहिले आहे की, भारताचा शेवटचा राष्ट्रध्वज सुरैय्या तैयबजी यांनी बनवला होता. हैदराबादच्या (आंध्र प्रदेश, आताच्या तेलंगणाची राजधानी) सुरैया एक प्रख्यात कलाकार होत्या. समाजाप्रतीच्या त्यांच्या सकारात्मक विचारांसाठी त्या ओळखल्या जात. त्यांचा विवाह भारतीय सनदी अधिकारी बद्रुद्दीन तैयबजी यांच्याशी झाला होता. बद्रुद्दीन हे नंतर अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू झाले.
सुरैया संविधान सभेच्या अंतर्गत असलेल्या विविध समित्यांच्या सदस्या होत्या. त्यातील अनेक समित्यांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे ध्वजसमितीच्याही त्या सदस्य होत्या. त्या फार कलात्मक आणि बहु-प्रतिभावान महिला होत्या. त्यांच्या आधीही अनेकांनी ध्वजाचे वेगवेगळे डिझाईन दिले होते. यांमध्ये भगिनी निवेदिता, मॅडम कामा, अॅनी बेझंट, लोकमान्य टिळक आणि पिंगली व्यंकय्या यांचाही समावेश होता.
महात्मा गांधी यांनी काँग्रेसच्या १९२१ सालच्या परिषदेत, ‘भारताचा स्वतंत्र झेंडा असावा,’ असा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर असे ठरवण्यात आले कि, ‘भारताचा स्वतंत्र झेंडा असेल, जो भारताचा एक राष्ट्र म्हणून प्रतिनिधित्व करेल. आपल्या सर्व भारतीयांसाठी अर्थातच हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू, पारशी आणि ज्यांच्यासाठी भारत हे त्यांचे घर आहे अशा सर्वांसाठी आपला स्वतःचा ध्वज असणे अत्यंत आवश्यक आहे, ज्याच्यासाठी आपण जगू किंवा मरू.’
गांधीजींच्या या कल्पनेने प्रभावित होऊन अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आणि क्रांतिकारकांनी ध्वजासाठी पर्यायी डिझाइन्स तयार केले. त्यापैकी आंध्र प्रदेशातील पिंगली व्यंकय्या यांनी केलेल्या एका ध्वजाला गांधीजींनी स्वीकृती दिली. या ध्वजात लाल आणि हिरवा असे दोन रंग वापरलेले होते. गांधीजींच्या सूचनेवरून त्यात पांढरा रंग व चरख्याचे चिन्हही वापरण्यात आले होते.
नंतर काही वर्षांत त्यात पुन्हा बदल करण्यात आले आणि शेवटी सुरैय्याने बनवलेला तीन रंगांचा ध्वज फायनल करण्यात आला. ‘द वायर’च्या एका रिपोर्टनुसार, बद्रुद्दीन आणि सुरैया यांनीच फिरत्या चाकाऐवजी ‘अशोक चक्र’ हे चिन्ह वापरण्याचा सल्ला दिला होता. सुरैया यांनीच या ध्वजाचे डिझाइन तयार केले होते.
हा तिरंगा सुरैयाने स्वतःच्या देखरेखीखाली शिवून घेतला होता. सुरैयाने भेट म्हणून नेहरूंना दिलेला हा तिरंगा पहिल्यांदा नेहरूंच्या गाडीवर फडकला होता. पुढे राष्ट्रीय ध्वज म्हणून २२ जुलै १९४७ रोजी या तिरंग्याला मंजुरी मिळाली. मात्र, त्यावेळी संविधान सभेत राष्ट्रध्वजाबाबतचा जो ठराव मंजूर झाला होता त्यात पिंगली व्यंकय्या किंवा सुरैय्या तैयबजी यांचे नाव नव्हते. सुरैया आणि तिच्या पतीनेही कधी असा दावा केला नाही की राष्ट्रध्वजाची रचना त्यांनी केली आहे. व्यंकय्या यांनी तिरंग्याची मूळ रचना केली होती, याचा त्यांना नेहमीच आदर आणि स्वीकार होता.
म्हणूनच आजही ध्वजाच्या निर्मात्याच्या नावाबाबत अजूनही संभ्रम आहे. पण शेवटचा जो ध्वज निश्चित करण्यात आला त्यात सुरैय्या यांचे योगदान होते, हे कोणीही नाकारू शकत नाही. पण भारतातील इतर अनेक महान महिलांप्रमाणे सुरैया तैयबजी यांनाही इतिहासात विशेष स्थान मिळाले नाही.
तर, सुरैया हि एक अशी महिला आहे जिने बनवलेला भगवा, पांढरा आणि हिरवा रंगाचा, निळा अशोक चक्र असलेला तिरंगा आज पाहिल्यावर आपल्या मनात देशभक्तीची भावना निर्माण होते. त्यामुळे भारताच्या या कन्येला आपण स्मरणात ठेवणे गरजेचे आहे.
कशी असते ध्वजाची निर्मिती प्रक्रिया?
कायद्यानुसार राष्ट्रध्वज हा खादीचा किंवा रेशमचा असावा. ध्वजाची निर्मिती प्रक्रिया आणि तपशील भारतीय मानक कार्यालयाद्वारे ठरवली जाते. भारताचा ध्वज तयार करण्याचा अधिकार खादी विकास आणि ग्रामोद्योग आयोगाकडे आहे, जो प्रादेशिक गटांना त्याचे वाटप करतो. २००९ पर्यंत ‘कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ’ ध्वजाचा एकमेव निर्माता होता. ध्वजाचा वापर हा भारतीय ध्वज संहितेद्वारे नियंत्रित केला जातो.
ध्वजाचे वैशिष्ट्य
भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी ध्वजाचे वैशिष्ट्य सांगितले आहे. ते पुढीलप्रमाणे,
“भगवा रंग म्हणजे त्याग. आपल्या नेत्यांनी भौतिक फायद्यासाठी उदासीन असले पाहिजे आणि स्वतःला त्यांच्या कार्यात समर्पित केले पाहिजे. मध्यभागी असलेला पांढरा रंग म्हणजे प्रकाश आणि सत्याचा मार्ग आहे, जो आपल्या आचरणासाठी मार्गदर्शन करतो. हिरवा रंग वनस्पतींच्या जीवनाशी असलेला आपला संबंध दर्शवतो ज्यावर आपले जीवन अवलंबून आहे. पांढऱ्या रंगाच्या मध्यभागी असलेले अशोक चक्र हे धर्माच्या कायद्याचे चाक आहे. हे चक्र शांततापूर्ण बदलाची गतिशीलता दर्शवतो."
ध्वजांचा इतिहास
भारतात ध्वजाची परंपरा प्राचीन काळापासून आहे. अर्जुनाच्या कपिध्वजाचा उल्लेख महाभारतात सापडतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जरीची झालर असलेला भगवा ध्वज प्रसिद्ध आहे. १८३१ साली राजा राममोहन राॅय बोटीने इंग्लंडला जात असताना त्यांनी एका फ्रेंच जहाजावर फ्रान्सचा तिरंगी झेंडा पाहिला व स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे प्रतीक असलेला ध्वज आपल्या देशालाही लाभावा, असे त्यांना वाटले. पुढे १८५७ च्या युद्धात देशभक्तीच्या भावनेतून एक ध्वजगीतही निर्माण झाले.