छत्रपती शिवराय : सकलजनवादी आदर्श

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 d ago
सकलजनवादी शिवराय
सकलजनवादी शिवराय

 

सकलजनवाद हे तत्त्वज्ञान शिवरायांच्या जीवनचरित्राचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. शिवरायांनी त्यांच्या जीवनामध्ये या तत्त्वज्ञानाचा विकास केला. त्यांनी भारतीय समाजाला या तत्त्वज्ञानाचा व्यवहारात उपयोग करण्याची कौशल्ये शिकविली. शिवरायांच्या काळात निर्माण झालेल्या समस्या त्यांनी सकलजनवादी विचारसरणीच्या पद्धतीने सोडविल्या. आज साजऱ्या होत असलेल्या शिवजयंतीनिमित्त.

सकल जनांचे प्रतिनिधित्व करणे हा सकलजनवादाचा राजकीय व्यवहारातील अर्थ आहे. समावेशनाची प्रक्रिया सकलजनवादामध्ये मध्यवर्ती आहे.  त्याचबरोबर कोणाच्याही वगळणुकीला तीव्र विरोध हेही तिचे एक वैशिष्ट्य. सकलजनवाद हे संरक्षण, राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांना स्पर्श करणारे तत्त्वज्ञान आहे. सर्वांच्या वित्ताचे आणि जीविताचे संरक्षण करणे, सर्व जाती-धर्मांच्या लोकांचे प्रतिनिधित्व करणे, रुढीवाद नाकारून प्रगतिवादी विचारांचा किंवा सुधारणावादी विचारांचा पुरस्कार हीदेखील या विचारसरणीची वैशिष्ट्ये. समाजाबरोबर राहून समाजात सुधारणा घडवणे या गोष्टीला महत्त्व देणारी ही विचारसरणी. शेती, व्यापार व उद्योग अशा विविध प्रकारच्या उत्पादननिर्मितीच्या प्रक्रियेचा समतोल राखण्याचा विचार त्यात सामावलेला आहे. 

शैक्षणिकदृष्ट्या तर्क आणि गणित याबरोबरच जीवनाच्या विविध क्षेत्रांतील कला कौशल्यांचे ज्ञान आत्मसात करणे या गोष्टीला ही विचारसरणी महत्त्व देते. उदाहरणार्थ सांकेतिक भाषा, चित्रकला, वास्तुकला इत्यादी. धार्मिक दृष्टिकोनातून सकलजनवादी विचार धर्मांधता आणि टोकाची धर्मनिरपेक्षता नाकारतो. याऐवजी सकलजनवाद विचार सहिष्णुता आणि सामाजिक सलोखा यांना महत्त्व देतो. सकलजनवाद हे तत्त्वज्ञान शिवरायांच्या जीवनचरित्राचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. 

शिवरायांनी त्यांच्या जीवनामध्ये या तत्त्वज्ञानाचा विकास केला. त्यांनी भारतीय समाजाला या तत्त्वज्ञानाचा व्यवहारात उपयोग करण्याची कौशल्ये शिकविली. शिवरायांची 'महाराष्ट्र धर्मा'ची संकल्पना जनांचा महाराष्ट्रधर्म अशी घडली. स्वसंरक्षण, समाजाचे संरक्षण आणि स्वराज्याचे संरक्षण असे अर्थ महाराष्ट्र धर्म संकल्पनेचे शिवरायांनी जनांच्या संदर्भात विकसित केले. त्यांनी लोकांना लढण्याची उमेद दिली. त्यांनी लोकांमधील लढण्याची प्रेरणा जागृत केली. लोकांना संघर्ष करण्यासाठी प्रवृत्त केले. हा एक प्रकारचा कर्मयोग होता. हे शिवरायांच्या जीवनचरित्राचे खास वैशिष्ट्य ठरते.

अज्ञान आणि अशिक्षितपणा या गोष्टी शिवरायांनी दूर केल्या. त्यांनी गणित आणि तर्क या दोन क्षेत्रांबरोबर विविध क्षेत्रांतील ज्ञानाचे संकलन केले. त्यांनी विविध व्यक्तींना विविध प्रकारच्या क्षेत्रांतील ज्ञानाची जोपासना करण्यासाठी मदत केली. संस्कृत भाषेच्यो क्षेत्रातील ज्ञान जोपासण्यासाठी त्यांनी कवी परमानंदाना मदत केली. याबरोबरच त्यांनी लोकभाषेतील ज्ञाताचे संकलन करण्यासाठी कवी आणि शाहिरांनी मदत केली. आरमाराच्या क्षेत्रातील ज्ञानाचे संकलन करण्यासाठी शिवरायांनी स्थानिक लोकांना शिक्षण दिले. 

याबरोबरच व्यापार करण्यासाठी त्यांनी नवीत् व्यवस्था निर्माण केली. विशेष म्हणजे त्यांनी मस्कतपर्यंत व्यापार करण्याचे नवे कौशल्य विकसित केले, सहिष्णुता आणि सामाजिक सलोखा ही एक ऐतिहासिक प्रेरणा आहे. हा ज्ञानाचा स्रोत त्यांनी समाजामध्ये नव्याने पुनरुज्जीवित केला. थोडक्यात भारतीय समाजात नवीन ज्ञानाची दारे शिवरायांनी सर्व लोकांसाठी प्रथम सार्वजनिक पातळीवर खुली करण्याचे कार्य केले. या विचारसरणीमध्ये ज्ञानाचा पुरस्कार आणि प्रसार-विस्तार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 

शिवरायांनी आर्थिक क्षेत्रात सकलजनवादाचा पुरस्कार कशा रीतीने केला हे पाहण्यासारखे आहे. थोरला दुष्काळ पडला होता. एक शेर सोने देऊन एक शेर कुळीत मिळत नव्हते. दूरदूरपर्यंत लोकवस्ती दिसत नव्हती. अशा परिस्थितीत शिवरायांनी रयतेला शेतीसाठी प्रेरणा दिली व मदत केली. याबरोबरच व्यापाराची नवी दृष्टी विकसित केली. शिवरायांनी रायगडच्या पायथ्याला नव्याने उद्योग सुरू केले. रयतवर्ग, सैनिकवर्ग, व्यापारीवर्ग, उद्योग क्षेत्रात काम करणारा वर्ग अशा विविध प्रकारच्या उद्योगी आणि कामावर प्रेम करणाऱ्या वर्गाची जडणघडण त्यांनी केली. त्यांनी खरे तर एका नवीन समाजाची निर्मिती केली. या प्रक्रियेला सभासदाने 'नवीन सृष्टी'ची निर्मिती असे म्हटले आहे. 

समाजाला अनेक प्रकारच्या कौशल्यांची गरज असते. अशा अनेक कौशल्यांना शिवरायांनी पाठिंबा दिला. त्यांनी विविध प्रकारच्या कौशल्यांना एकत्रितपणे जोडले. त्यांनी विविध प्रकारच्या कौशल्यांमधून स्वराज्याचा विचार विकसित केला. म्हणजेच थोडक्यात सकलजन आणि सकल कौशल्य यांचा त्यांनी मेळ घातला. एका अथनि 'कौशल्यांवर आधारलेला समाज' ही नवीन कल्पना शिवरायांनी विकसित केलेली दिसते.

समग्र नैतिकता
शिवरायांनी नैतिकतेची संकल्पना शिक्षण आणि सकल कौशल्यांशी जोडली. यामुळे शिवरायांची नैतिकतेची संकल्पना संघर्षाशी जोडली गेली होती. स्वराज्याचा संघर्ष अतिशय कठीण होता. यामुळे त्यांची नैतिकतेची संकल्पनादेखील संघर्षातून उदयास आली होती. शिवरायांची नैतिकतेची संकल्पनादेखील राजकीय, लष्करी आणि जनांची नैतिकता या प्रकारची होती. स्वराज्यातील कारभारी वगनि सर्व रयतेशी नैतिक वर्तन करावे, हा मुख्य मुद्दा त्यांनी व्यवहारात आणला होता. तसेच शिवरायांनी लष्कराचे नैतिकीकरण केले होते. शिवरायांचे लष्कर हे नेहेमीच नैतिक वर्तन करत होते.

समाजात वावरताना त्याचा प्रत्यय येत होता. याबरोबरच शिवरायांनी सर्व लोकांमध्ये एक नैतिकतेचा प्रवाह विकसित केला होता. एका अथनि शिवरायांचे जीवन विविध प्रकारच्या नैतिकतेचा (राजकीय नैतिकता, लष्करी नैतिकता, जनांची नैतिकता) एकत्रितपणे सांधा जोडण्याचा प्रयोगच होता. या अर्थान शिवरायांचे जीवनचरित्र सकलनैतिकतांचा दावा करणारे आहे.

शिवरायांची मानवी जीवनाकडे पाहण्याची एक समग्र दृष्टी होतो. व्यक्तीची जीवनदृष्टी, समाजदृष्टी, राष्ट्रदृष्टी आणि विश्वदृष्टी यांचा त्यांनी एकत्रितपणे मेळ आपल्या जीवनामध्ये घातला होता. यामुळे व्यक्तीच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. 

समाजजीवन विस्कळीत झाले होते. शिवरायांनी समाज जीवनामध्ये एकप्रकारची सुसूत्रता आणली. (रयत वर्ग, सैनिक वर्ग, व्यापारी वर्ग, उद्योगी वर्ग, बुद्धिवंतांचा वर्ग). अशा विविध वर्गामध्ये त्यांनी ऐक्य आणि एकोपा घडवून आणला. यामुळे समाजाची दृष्टी व्यापक झाली. शिवरायांनी राष्ट्राला एक नवी दृष्टी दिली. युरोपियन राष्ट्र संकल्पनेचे प्रयोग भारताच्या किनारपट्टीवर पोर्तुगीज इंग्रज डच करत होते; तर मध्य आशियामधील राष्ट्र संकल्पना उत्तर भारतामध्ये प्रभावी होती. शिवरायांनी या दोन्हीही प्रकारच्या राष्ट्र संकल्पना नाकारल्या. शिवरायांनी सकलजनांची राष्ट्रसंकल्पना स्वीकारली. यामुळे शिवराय सकलजनवादी राष्ट्र संकल्पनेचे त्या काळातील व्यवहारी तत्त्वज्ञान विकसित करतात. हा प्रयोग युरोपमध्ये पराभूत झाला होता. युरोपमधील लेखकवर्ग औरंगजेबाच्या राजवटीचे समर्थन करत होता. 

भारतामध्ये मात्र शिवरायांनी औरंगजेबाचा राजकीय प्रयोग अमान्य केला होता. युरोपपेक्षा वेगळी विचारसरणी शिवरायांनी स्वीकारली होती. त्यांच्या विचारसरणीचा मुख्य कणा सहिष्णुता हा होता. तसेच व्यवहार हादेखील त्या विचारसरणीचा मुख्य भाग होता. युरोपियन विचारसरणी हिंसेचे गौरवीकरण करत होती. तेव्हा शिवरायांनी राज्यकारभारामध्ये वाटाघाटी, चर्चा, संवाद हे स्वरूप आपल्या विकसित केले होते. यामुळे सर्व लोकांची मते त्यांनी राज्यकारभारामध्ये आणली होती.

'हर हर महादेव' ही ललकारी संरक्षणाबरोबरच सुजलाम सुफलामतेची होती. या ललकारीमध्ये सकलजनांच्या जीविताचा एक अर्थ सामावलेला होता. सकल जनांच्या उदरभरणाचा अर्थ 'हर हर महादेव' या ललकारीत होता. ती कर्मयोगाला प्रवृत्त करणारी होती. या ललकारीचा एक अर्थ सकलजनांमधील सकल कौशल्यांचा योग्य उपयोग करणे हादेखील होता. (स्यत आणि सैनिकवर्ग). या कारणामुळे शिवरायांचे जीवनचरित्र स्वातंत्र्यसंग्रामाला प्रेरणा देणारे ठरले. स्वातंत्र्योत्तर काळात सकल भारतीयजनांचा महत्त्वाचा आदर्श शिवराय आहेत, एकविसाव्या शतकामध्ये भारतीय समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी शिवरायांचा हा सकलजनवादी विचार आपल्या मदतीला येतो. म्हणजेच शिवरायांच्या जीवनचरित्रातून आपण प्रेरणा घेऊन आपले प्रश्न सोडवू शकतो.

- डॉ. प्रकाश पवार
(लेखक राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'सकलजनवादी छत्रपती शिवराय' या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले आहे.)


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter