मंदिराच्या कळसावर कावळा बसला तर तो गरुड होतो का, असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुण्यात झालेल्या संजीवन व्याख्यानमालेदरम्यान विचारला. 'भारत हा विश्वगुरू झाला पाहिजे' या रा. स्व. संघाच्या महत्त्वाकांक्षेचाही पुनरुच्चार भागवत यांनी केला.
अलीकडील काळात मोदी सरकार आणि भाजप या मुद्द्याचा फारसा कुठे उल्लेख करत नाही. या उलट परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी, "भारत हा विश्वमित्र अर्थात संपूर्ण जगाचा मित्र झाला पाहिजे" ही संकल्पना मांडायला सुरुवात केली आहे. सध्या देशात सांप्रदायिकतेच्या दृष्टीने जे वातावरण निर्माण झाले आहे, ते बदलण्यासाठी आणि भाजप व भाजपला पाठिंबा असणाऱ्या हिंदी भाषिक राज्यांमध्ये सध्या जो मंदिरांवर मशिदी बांधल्या गेल्याचा नवा मुद्दा उपस्थित होत आहे त्या अनुषंगाने भागवत यांचे हे विधान केवळ ओघाने आलेले नसून, ते अत्यंत अर्थपूर्ण आहे. या विधानाकडे समजूतदारीचा सल्ला म्हणून पाहता येईल. संभळ आणि अजमेर शरीफ ही या मुद्द्याची सध्याची ज्वलंत उदाहरणे आहेत.
मंदिरांवर बांधण्यात आलेल्या मशिदींच्या दाव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानेदेखील काही गोष्टींना स्थगिती देत थोडा वेळ घेतला आहे. तसेच प्रार्थना स्थळे कायदा १९९१ ला दिलेल्या आव्हानांवरही सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू असून त्या अनुषंगानेदेखील या विधानाकडे पाहता येऊ शकते. सरसंघचालक पदावरील व्यक्ती जेव्हा अशा प्रकारचे दावे आणि त्या अनुषंगाने होणारी कृत्ये रोखण्याचे आवाहन करते तेव्हा तुम्ही संघाचे अनुयायी असा अथवा टीकाकार असा तुम्हाला सावध होऊन त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष द्यायलाच हवे. सरसंघचालकांनी त्यांच्या अत्यंत रोखठोक भाषणात, हे असे (मंदिर मशिदीचे) मुद्दे उपस्थित करून हिंदूंचे नेतृत्व करू इच्छिणाऱ्या नेत्यांनाही; "मंदिराच्या कळसावर बसलेल्या कावळ्याला गरुड बनण्याची इच्छा असते," अशा शेलक्या शब्दांत कानपिचक्या दिल्या आहेत.
भारताला विश्वगुरु बनविण्याबाबत महत्त्वाकांक्षेच्या पुनरुच्चाराचे मूळदेखील याच सल्ल्यात असल्याचे आपल्याला जाणवेल. कारण याच भाषणात ते म्हणाले आहेत की, भारत हा विजय मिळवून; भाषा,संस्कृती आणि श्रद्धा यांच्या साधर्म्यामुळे अथवा धोरणात्मक हितसंबंधांमुळे बनलेला देश नसून, भारत हा त्याच्या प्राचीन अशा अद्वितीय वैचारिक तत्त्वज्ञानाच्या आधारावर आणि समावेशी संस्कृतीमुळे एक देश बनला आहे. आपण प्रत्येकालाच आपले मानले आहे. ऐक्य म्हणजे एकसारखेपणा किंवा विविधता नष्ट करणे असे नाही." याच मुद्द्याला व्यापक स्वरूप देत सरसंघचालक भागवत म्हणाले, "विविधतेत एकता असे आपण म्हणत आलो आहोत, आता विविधता हीच आपली एकता असे मानायला सुरुवात केली पाहिजे."
... तरच विश्वगुरू
भारतीयांनी एक छोटासा प्रयोग करून पाहावा असे सरसंघचालकांनी या भाषणात सुचवले आहे. ते म्हणाले की, ज्या मुद््यांमुळे समाजात शत्रुत्व अथवा वैमनस्य निर्माण होत असून तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे, असे सर्व मुद्दे सोडून देऊया. आणि आपण सर्व गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहोत हे सर्व जगाला दाखवून देऊया. जर आपण हे करून दाखवू शकलो तरच आपसूक आपण विश्वगुरू होऊ.
एकीकडे धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे लोक आणि राजकीय संघटना सरसंघचालकांच्या या भाषणाचे आकलन अथवा विश्लेषण करत असतानाच दुसरीकडे आश्चर्यकारकरीत्या (किंवा काहींसाठी हे तितकेसे आश्चर्यकारक नसेल) कट्टर उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून मात्र या विधानावर टीका होत आहे. विशेषतः समाज माध्यमांवर त्यांच्या या वक्तव्याविरोधात कट्टर उजव्या लोकांकडून प्रखर टीकात्मक प्रतिक्रिया येत आहेत. 'भागवत यांनी मंदिर-मशिदीचे मुद्दे थांबवण्याचे आवाहन केल्याने सर्वजण थांबतील असे नाही, मुस्लिम शासकांच्या राजवटीत हिंदूंवर झालेले अत्याचार आणि त्यांनी केलेल्या अन्यायकारी कृत्यांबद्दल न्याय मिळावा यासाठी हिंदूंनी दीर्घकाळ प्रतीक्षा केली आहे.' असे मत काही कट्टर उजव्या नेटिजन्सकडून व्यक्त केले जात आहे.
पुन्हा तीच चूक नको
भागवत यांनी मांडलेले मुद्दे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तपशीलवार होते. मुस्लिम राजवटीचा दाखला देत भागवत म्हणाले की, त्याही काळात सर्वांना सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू होती मात्र, औरंगजेब आला आणि त्याने सर्व सत्यानाश केला. त्यानंतर १८५७ मध्येदेखील मौलवी आणि हिंदू संतांनी मिळून राम मंदिर पुन्हा हिंदूंना देण्याचा आणि गोहत्या बंदीचा निर्णय घेतला होता. मात्र हिंदू-मुस्लिमांमध्ये झालेल्या ऐक्याने इंग्रज घाबरले आणि त्यांनी 'फोडा व राज्य करा' ही नीती अवलंबली. त्यांच्या या नीतीची परिणती पाकिस्तानच्या निर्मितीत झाली. त्यामुळे आता तशी चूक पुन्हा होऊ द्यायची नाही.
दोन जून २०२२ रोजी नागपूर येथील संघ शिक्षा वर्गात भागवत म्हणाले होते की, प्रत्येक मशिदीमध्ये शिवलिंग शोधणे सोडून द्या! मात्र संभळ आणि अजमेर येथे मंदिराचा मुद्दा उपस्थित करणाऱ्यांनी भागवत यांचा सल्ला गांभीर्याने घेतला नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच भागवत यांनी पुन्हा एकदा त्यांच्या सल्ल्याची आठवण करून दिली असावी. हिंदुत्ववादाचे राजकारण होणाऱ्या चुकांबद्दल बोलण्याची भागवतांची ही काही पहिली वेळ नाही. या आधीसुद्धा त्यांनी अनेकदा असे मुद्दे मांडले आहेत. उदाहरणार्थ, १५ नोव्हेंबर २०२२ ला अंबिकापूर येथे स्वयंसेवकांना संबोधित करताना, "भारतातील मुस्लिम आणि हिंदू एकच आहेत, कारण त्यांची गुणसूत्रे एकसमान आहेत," असे विधान त्यांनी केले होते. हा मुद्दादेखील कट्टर हिंदुत्वाचा नक्कीच नव्हता.
आत्ताच हा मुद्दा का?
सरसंघचालक या मुद््यांवर वारंवार का बोलत आहेत किंवा आत्ताच हा मुद्दा का लावून धरत आहेत याबद्दलच्या काही शक्यता तपासून पाहू. देशभर पसरलेल्या त्यांच्या संघटनेच्या स्वयंसेवकांकडून त्यांना दैनंदिन घडणाऱ्या घडामोडींबद्दल नियमितप्रतिक्रिया येत असतात. त्यातून असे दिसून येत आहे की भाजपच्या राजकीय धोरणांच्या विपर्यासातून होत असलेल्या गोंधळामुळे संघाची जी बदनामी होत आहे त्याबद्दल ते चिंतित असावेत. दुसरी गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील संघाची प्रतिमा यामुळे खराब होत आहे.
जगातील काही राष्ट्रीय आधीच संघाकडे कट्टर विचारसरणीची संघटना म्हणून पाहत आहेत. अशातच या मुद्द्यांमुळे हिंदू कट्टरवादाचा उदय होत असल्याचा समज निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत हिंदूंचे नेतृत्व हे संघ किंवा भाजप यांच्याकडे राहणे आवश्यक असून त्यात विभागणी होता कामा नये. तसेच मंदिर मशिदीचा मुद्दा जर अधिक तीव्र होत गेला तर भाजपचेच राज्य असणाऱ्या राज्यांमध्येसुद्धा कायदा सुव्यवस्था टिकवणे अवघड होणार आहे. असे झाल्यास संघ आणि भाजपची प्रतिमा मलिन होणार आहे. त्यामुळेच हे रोखण्याकडे त्यांचा कल दिसून येत आहे. तुम्ही जर संघाचे विरोधक असाल तर तुम्हाला हा युक्तिवाद पटणार नाही, परंतु अधिक सखोल विचार केला असता, हे अत्यंत हुशारीचे राजकारण आहे हेदेखील तुमच्या लक्षात येऊ शकते. कारण भाजपच्या माध्यमातून दीर्घकाळ सत्तेत राहणारी संघटना ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे त्यामुळेच संघाकडून होत असलेला हा हस्तक्षेप अत्यंत तर्कशुद्ध आहे.
त्याचप्रमाणे हा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे की, संभळसारखी किती प्रकरणे आपल्या देशाला आणि अगदी भाजपलादेखील परवडणारी आहेत. हे जर असेच सुरू राहिले तर याच मुद्द्यांवर राजकारण करणाऱ्या भाजपला देखील त्यांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था टिकवणे अवघड होऊन जाईल. भारत हा हिंदूबहुल देश आहे आणि त्या बहुसंख्याक हिंदूंना धर्मनिरपेक्षता हवी आहे, म्हणूनच हा देश धर्मनिरपेक्ष आहे, असा दावा भाजपकडून कायम केला जातो. हा एक चांगला युक्तिवादही आहे. त्यामुळेच हिंदूंचे प्रतिनिधित्व करत असल्याचा दावा करत असलेल्या पक्षाला सर्वांना एकत्र ठेवण्यात अधिक रस असावा.
राष्ट्रहिताच्या नजरेतून
शेखर गुप्ता म्हणतात, " मंदिरांवर मशिदी बांधल्या गेल्याचा दावा करणाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सबुरीचा सल्ला देत आहेत; या वादंगांमुळे जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर भाजप सरकारला कायदा आणि सुव्यवस्था राखणे कठीण होऊन बसेल, या जाणिवेतून हा सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे."
सरकार प्रतिसाद देणार का?
सरसंघचालकांनी केलेल्या आवाहनाला मोदी सरकार कसा प्रतिसाद देईल, हेदेखील आपल्याला, प्रार्थनास्थळे कायद्याबाबत केंद्र सरकार न्यायालयात् काय बाजू मांडते, यावरून स्पष्ट होणार आहे. सरकार या कायद्याची पाठराखण करेल की त्याच्या समर्थकांना वाटते त्याप्रमाणे या कायद्याला विरोध करेल की संदिग्धता कायम ठेवेल, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. भागवत यांच्या आवाहनाला सरकार किती गांभीर्याने घेते? याचीही कसोटी यामुळे लागणार आहे.
(अनुवाद - रोहित वाळिंबे)