बांगलादेश-पाकिस्तानात वाढत असलेल्या जवळीकची जगभर चर्चा सुरू झाली आहे. भारतासाठी ही बाब निश्चितच चिंतेची आहे. आतापर्यंत दक्षिण आशियात बांगलादेश हा भारताचा सर्वात जवळचा मित्र मानला जात होता. बदलत्या परिस्थितीत भारतापुढे राजनैतिक आव्हान तयार होत आहे.
बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ इजिप्तच्या कैरो येथे डी-८ च्या बैठकीच्या दरम्यान २० डिसेंबरला एकमेकांना भेटले. त्यांच्यात झालेली बोलणी आणि बांगलादेश पाकिस्तानात वाढत असलेल्या जवळीकची जगभर चर्चा सुरू झाली आहे. भारतासाठी ही बाब निश्चितच चिंतेची आहे, त्याला कारण म्हणजे भारतापासून बांगलादेश दूर जात असल्याचे चित्र निर्माण होत आहे. बांगलादेश सरकार भारताशी आपले संबंध पूर्वीसारखे असल्याचे सांगत असले तरी त्यांच्या उक्ती आणि कृतीत फरक आहे.
विद्यार्थी व इतर घटकांच्या जुलैतील आंदोलनामुळे बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना पाच ऑगस्टला देशातून पळून जात भारतात आश्रय व्यावा लागला. आठ ऑगस्टला बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून मोहम्मद युनूस यांनी शपथ घेतली. माजी पंतप्रधान खालेदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टी (बीएनपी) आणि 'जमात-ए-इस्लामी' सारख्या धर्माध पक्षांचा युनूस सरकारवर सुरुवातीपासून दवाव आहे. मोहम्मद युनूस यांनी सत्ता सांभाळली तेव्हापासून आतापर्यंत हिंदू व अन्य अल्पसंख्याक्कांवर २,२०० हून अधिक हल्ले झाले आहेत. युनूस भारतापेक्षा पाकिस्तानला अधिक महत्त्व देत असल्याचे दिसत आहे. आता तर पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना मायदेशी परत पाठवा, अशी मागणी एका राजनैतिक संदेशाद्वारे बांगलादेशाच्या सरकारने भारताकडे केली आहे.
१९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धात पाकिस्तानच्या लष्कराने केलेल्या अत्याचार, जनसंहार, बलात्कार इत्यादींबद्दल पाकिस्तानने औपचारिक माफी मागावी, ही हसीना सरकारची महत्त्वाची मागणी होती. चांगलादेशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात काही लाख बंगाली लोकांची हत्या करण्यात आलेली आणि हजारो महिलांवर बलात्कार करण्यात आले होते. आता मात्र औपचारिक माफीचा आग्रह सोडण्यासाठी बांगलादेश तयार असल्याचे चित्र दिसते. त्यांना पाकिस्तानशी सामरिक करार अधिक महत्त्वाचा वाटायला लागला असल्याचे चित्र युनूस-शरीफ भेटीनंतर दिसायला लागले आहे.
एका देशाने दुसऱ्या देशावर केलेल्या अत्याचार, जनसंहाराबद्दल माफी मागितली पाहिजे. हिरोशिमा येथे ६ ऑगस्ट १९४५ ला टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बमुळे दीड लाख लोकांचे मृत्यू झाले होते. त्याठिकाणी जाऊन श्रद्धांजली व्यक्त करणारे ओबामा पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष, डी-८ हा आठ विकसनशील मुस्लिम राष्ट्रांचा गट आहे. आर्थिक सहकार्यासाठी असलेल्या या गटात बांगलादेश, इजिप्त, इंडोनेशिया, इराण, मलेशिया, नायजेरिया, पाकिस्तान आणि तुर्कीयेचा समावेश आहे. युनूस यांनी शरीफ यांना स्वातंत्र्ययुद्धाशी संबंधित प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत की ज्यामुळे आपण पुढची वाटचाल सहज करू शकू, असे म्हटले.
पाकिस्तानने केलेल्या अत्याचाराबद्दल माफी मागितली पाहिजे, असे युनूस यांनी शरीफ यांना सांगितले नाही. शरीफ यांनी युनूस यांना पाकिस्तानचा दौरा करण्याचे निमंत्रणही दिले. शरीफ यांनी बांगलादेशातील सरकारसंचालित साखर कारखान्यांना तांत्रिक स्वरूपाची मदत करण्याची तयारी दाखवली. ऑगस्टनंतर युनूस आणि शरीफ यांच्यात झालेली ही दुसरी बैठक. सप्टेंबर महिन्यात अमेरिकेत संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या वेळेसदेखील ते भेटले होते. दोन्ही देशात जवळ येण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्याची सुरुवात युनूस सत्तेवर आल्यानंतर लगेच झाली. त्यापूर्वी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी घडवून आणल्या गेल्या. हे विचारपूर्वक करण्यात आले. मात्र त्याला फारशी प्रसिद्धी मिळणार नाही, याची काळजी घेण्यात आलेली. खालील गोष्टींतून हे स्पष्ट होते.
५३ वर्षांनंतर पहिल्यांदा पाकिस्तानहून निघालेलं एक मालवाहतूक जहाज ११ नोव्हेंबरला सरळ बांगलादेशाच्या चट्टोग्राम (पूर्वीचे चितागोंग) बंदर येथे आले. पनामाचा झेंडा असलेले 'एमव्ही युआन झियांग फा शान' नावाचे जहाज संयुक्त अरब अमिरातहून निघाले. तेव्हाच वाटत होते की दोन्ही देशात समुद्रमार्गे आयात-निर्यातीची सुरुवात होणार. ते खरे ठरले. २० डिसेंबरला 'फा शान' परत एकदा मोठ्या प्रमाणात साखर, रसायने इत्यादी घेऊन कराचीहून चट्टोग्राम येथे आले. याउलट, २०२२ मध्ये शेख हसीना यांनी पाकिस्तानी नौदलाच्या चीननिर्मित 'तैमूर' जहाजाला चट्टोग्राम येथे येण्याची मुभा नाकारली होती. चट्टोग्राम आणि मोंगला बंदराचे भारताच्या दृष्टीने महत्त्व आहे. चट्टोग्राम आणि मोंगला बंदरातून ईशान्य भारतात वस्तू लवकर पोहोचू शकतात. भारताच्या मालवाहतुकीसाठी शेख हसीना पंतप्रधान असताना चडोग्राम आणि मोंगला बंदराचा उपयोग करण्याची मुभा देण्यात आली होती. पाकिस्तान या बंदरातून ईशान्येकडील फुटीरतावाद्यांना शस्त्रपुरवठा करू शकतो, अशी भीती आहे. या भागात चीनच्या हालचालींवर या बंदरातून भारताला लक्ष ठेवणे शक्य होत असे.
पाकिस्तानने १९७१ च्या अत्याचारांबद्दल माफी मागितली नसल्याने २०१५ मध्ये शेख हसीना सरकारने पाकिस्तानी विद्यार्थ्यांना ढाका विद्यापीठात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला होता. आता विद्यापीठाच्या सिनेटने तो निर्णय फिरवला आहे. सरकारच्या मंजुरीशिवाय असे निर्णय विद्यापीठ घेणे शक्य नाही. पाकिस्तानातून आयात वस्तूंवरील निबंध बांगलादेशने सप्टेंबर महिन्यात सौम्य केले. पाकिस्तानने बांगलादेशाच्या व्यापाऱ्यांना मोफत व्हिसा देण्याचा निर्णय घेतला तर बांगलादेशने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यापूर्वी आवश्यक असलेले सिक्युरिटी क्लिअरन्स रद्द करण्याचे ठरवले आहे.
बांगलादेशाच्या इतिहासात पहिल्यांदा मोहम्मद अली जिना यांच्या ७६व्या स्मृतिदिनी ११ सप्टेंबरला ढाका येथील 'नॅशनल प्रेस क्लब'मध्ये उर्दूत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उर्दू पाकिस्तानची राष्ट्रभाषा म्हणून जिना यांनी लादली तेव्हा पूर्व पाकिस्तानात बंगाली लोकांना बंगाली भाषेला समान दर्जा मिळावा यासाठी आंदोलन करावे लागले होते. त्यातून बांगलादेश अस्तित्वात आला. नवी राजवट ही जन्मकथा विसरलेले दिसते.
नोव्हेंबर महिन्यात उच्च न्यायालयात १५ व्या घटनादुरुस्तीच्या संदर्भात सुनावणी सुरू असताना अॅटनों-जनरलने घटनेतून धर्मनिरपेक्षता, बंगाली राष्ट्रवाद यांसारखे शब्द काढून टाकण्याची गरज व्यक्त केली. 'जॉय बांगला' या घोषणेने बंगाली समाजाला एकत्र आणण्याचं ऐतिहासिक काम केले. प्रत्येक चंगालीला या घोषणेबद्दल अभिमान आहे. बांगलादेशाच्या उच्च न्यायालयाने २०२० च्या मार्च महिन्यात 'जॉय बांगला' देशाचं राष्ट्रीय स्लोगन असल्याचे म्हटले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय स्थगित केला आहे.
बंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांना लोक विसरतील, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यांचे धोरण सर्वसमावेशक होते. हिंदू व इतर अल्पसंख्याक मुजीबुर सोबत होते. त्यांच्या जन्मदिवशी आणि पुण्यतिथीच्या दिवशी बांगलादेशात सार्वजनिक सुट्टी असायची. ती रद्द करण्यात आली आहे. महफुझ आलम नावाच्या सरकारच्या सल्लागारांनी 'एक्स' वर म्हटले की, पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा बांगलादेशाचा भाग आहे. भारताने त्यावर व्यक्त केलेल्या तीव्र प्रतिक्रियेमुळे बांगलादेशने ती 'डिलीट' केली. मात्र यातून नवीन सरकारात भारतविरोधी सल्लागार असल्याचे स्पष्ट होते.
आतापर्यंत दक्षिण आशियात बांगलादेश हा भारताचा सर्वांत जवळचा मित्र होता. ही स्थिती कायम ठेवण्यासाठी भारताने अधिक सक्रिय पुढाकार घेत बांगलादेशसोबत संवाद वाढवायला हवा. अलीकडे भारताचे परराष्ट्रसचिव विक्रम मिसरी यांनी बांगलादेशची घेतलेली भेट एक महत्त्वाचे पाऊल होते. पण त्याहून पुढे गेले पाहिजे.
-जतीन देसाई
(लेखक ज्येष्ठ पत्रकार व भारतीय उपखंडातील घडामोडींचे अभ्यासक आहेत.)