बांगलादेशाच्या राजकारणात शेख हसीना यांचं वर्चस्व अबाधित!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

धनंजय बिजले 
जगाच्या विविध भागांत येत्या वर्षांत निवडणुका होणार आहेत. त्यानिमित्ताने त्या त्या देशांतील अनेक महत्त्वाचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. या सगळ्याची नोंद घेणारे नवे पाक्षिक सदर.

गेली तीन दशके बांगलादेशचे राजकारण (Bangladesh Politics) दोन ‘बेगम’ भोवतीच फिरते आहे. त्यातील एक म्हणजे सध्याच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) आणि दुसऱ्या माजी पंतप्रधान खालिदा झिया (Khaleda Zia). अजूनही या परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही. सत्तेच्या या सारीपाटावर अजूनही या दोन महिला नेत्यांचेच राज्य आहे. भारताचा शेजारी असलेल्या बांगलादेशातील जनता येत्या रविवारी (ता. ७) सार्वत्रिक निवडणुकीला सामोरी जात आहे.

यावेळी पुन्हा शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आवामी लीग (Awami League) निवडणुका जिंकून सलग चौथ्यांदा सत्तेवर येईल, यात कोणालाच शंका नाही. कारण प्रमुख विरोध पक्ष ‘बांगलादेश नॅशनल पक्षा’ने (Bangladesh National Party) निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे छोटे पक्ष व अपक्षांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. ७८ वर्षीय खालिदा झिया सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात आहेत. गेल्या महिन्यात निवडणुकीचा घोषणा झाल्यापासूनच बांगलादेश धुमसत आहे.

हसीना या हुकूमशाही प्रवृत्तीच्या असून त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका पारदर्शी पद्धतीने होऊच शकत नाहीत, असा तमाम विरोधकांचा आरोप आहे. सर्वपक्षीय सरकार नेमून त्याच्या नेतृत्वाखाली निवडणुका घ्याव्यात, ही विरोधकांची प्रमुख मागणी होती. हसीना यांनी ही मागणी फेटाळल्यापासून देशभर हिंसक निदर्शने सुरु झाली. सरकारने विरोधी पक्षाच्या शेकडो नेत्यांना व कार्यकर्त्यांना अटक करण्यास सुरवात केली. अखेर खालिदा झिया यांनी निवडणुकीवरच बहिष्कार टाकला. त्यामुळे शेख हसीना यांच्यासाठी सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे.

या दोन्ही महिला नेत्यांना घरातूनच राजकारणाचा वारसा आहे. हसीना यांचे वडील शेख मुजिबूर रहमान हे बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष. तर खालिदा झिया यांचे पती झियाउर रहमान हेदेखील माजी राष्ट्राध्यक्ष. दुर्दैवाने दोन्ही नेत्यांची सत्तेवर असताना हत्या झाली आणि बांगलादेशात लष्करी राजवट सुरु झाली. लोकशाहीच्या स्थापनेसाठी या दोन्ही लढवय्या ‘बेगम’नी एकत्रितपणे लढा दिला.

८० च्या दशकात हुकूमशहा इर्शाद यांच्या राजवटीविरोधात हसीना व खालिदा एकत्रितपणे रस्त्यावर उतरल्या. त्यानंतर दोघीही देशाच्या पंतप्रधान बनल्या. पण आज या दोघींतून विस्तवही जात नाही, अशी स्थिती आहे. सत्तेत असताना केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून खालिदा झिया यांना तुरुंगवास झाला असून, सध्या त्या घरातच नजरकैदेत आहेत. तेथूनच त्या पक्ष चालवितात. राजकीय आकसातून आपल्यावर कारवाई झाल्याचा त्यांचा आरोप आहे.

वेगवान आर्थिक विकास
दुसऱ्या बाजूला सलग तीन निवडणुका जिंकत हसीना यांनी बांगलादेशला गरिबीच्या खाईतून बाहेर काढल्याचा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. सन २००९ पासून हसीना सत्तेत आहेत. तेव्हापासून देशात बऱ्यापैकी राजकीय स्थैर्य आहे. त्यांच्या काळात विरोधकांची गळचेपी झाल्याचा आरोप होतो. मात्र विरोधकांचे आरोप फेटाळताना देशाचे प्रगतिपुस्तक मांडतात. मुस्लीमबहुल बांगलादेशाची एकेकाळी जगातील गरीब देशात गणना होत असे. मात्र गेल्या दशकात देशाची आर्थिक घौडदौड वेगाने होत आहे.

आर्थिक विकासात बांगलादेशने भारतालाही मागे टाकले आहे. दरडोई उत्पन्न तिप्पट झाले आहे. या काळात तब्बल अडीच कोटी लोक गरिबीतून बाहेर पडल्याचे प्रशस्तिपत्रक जागतिक बॅंकेनेच दिले आहे. आजच्या घडीला तयार कपड्यांच्या उद्योगात चीनच्याखालोखाल बांगलादेश जगात दुसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार देश आहे. गेल्या वर्षी बांगलादेशने युरोप व अमेरिकेत तब्बल ४५ अब्ज डॉलरचे तयार कपडे निर्यात केले. हसीना यांनी सध्या पद्मा नदीवरील भव्य महत्त्वाकांक्षी पुलाच्या प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे.

तब्बल २१ जिल्ह्यांना जोडणारा सहा किलोमीटर लांबीचा पूल झाल्यास बांगलादेशच्या स्वावलंबी आर्थिक प्रगतीचे प्रतीक असणार आहे. हसीना यांचा हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. यासाठी त्यांनी जागतिक बॅंकेकडून चार अब्ज डॉलरचे कर्ज घेतले आहे. बांगलादेशचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता प्रकल्पात आहे. विरोधकांच्या विविध आरोपांना हसीना या आकडेवारीने निरुत्तर करतात. आर्थिक स्तर उंचावल्याने बहुतांश गरीब जनता त्यांच्या पक्षामागे गेल्या दोन्ही निवडणुकांत उभी ठाकली.

भारतासाठी महत्त्वाचा शेजारी
बांगलादेशची स्थिरता भारतासाठी फार महत्त्वाची मानली जाते. या देशाची सीमा थेट आपल्याला भिडलेली आहे. ‘चिकन नेक’ नावाने ओळखला जाणारा वीस किलोमीटर भूभाग नेपाळ, बांगलादेश आणि भूतानमधून जाते. हा भाग ईशान्येकडील राज्यांना जोडला जातो. त्यामुळे संरक्षणाच्यादृष्टीने हा भाग फार संवेदनशील आहे. हसीना सरकारशी भारताचे मैत्रीचे सबंध राहिलेले आहेत. दक्षिण आशियात आपला सर्वाधिक व्यापार हा बांगलादेशबरोबरच आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्याही हा शेजारी महत्त्वाचा आहे. आणखी एक चिंतेची बाब म्हणजे बांगलादेशात पाय रोवण्यासाठी चीन शक्य तितके प्रयत्न करीत आहे. त्यामुळे भारतासाठी हा शेजारी देश फार मोलाचा आहे.

सध्या ३०० सदस्यांच्या संसदेसाठी २७ पक्ष रिंगणात आहेत. मात्र प्रमुख विरोधी पक्षाने माघार घेतल्याने जतिया पार्टी व अपक्षांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आवामी लीग व जतिया पक्ष जवळपास २५० जास्त जागा लढत आहेत. त्यातच तीनशे अपक्ष रिंगणात आहेत. त्यातील ९० पक्ष उमेदवार चांगली मते घेतील, असे मानले जाते. त्यातील किती विजयी होतील हे पाहणे फार रंजक ठरणार आहे. कारण विरोधकांचा मोकळा अवकाश त्यांना मिळण्याची शक्यता आहे. असे असले तरी सलग चौथ्यांदा पंतप्रधान बनण्याचा विक्रम करण्याची शेख हसीना यांना मोठी संधी आहे.

युनूस यांच्यावरील कारवाईचे पडसाद
देशाच्या या प्रगतीची किंमत लोकशाही मूल्यांच्या रूपाने चुकवावी लागल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे. हसीना यांनी देशाचा आर्थिक विकास करताना मानवी मूल्ये पायदळी तुडविल्याचे विरोधकांचे सातत्याने म्हणणे आहे. ग्रामीण बॅंकेच्या माध्यमातून बचत गटांना सक्षम करण्याचे विकासाचे प्रारूप जगाला देणारे नोबेल विजेते महंमद युनूस यांना नुकतीच कारावासाची शिक्षा झाली. त्यांच्यावर सरकारने कामगार कायद्यांच्या उल्लंघनाचा आरोप केला होता.

युनूस यांच्यावर कारवाई करू नये, अशी विनंती जगभरातून झाली होती. विनंती करणाऱ्यांमध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, हिलरी क्लिंटन अशा शक्तिशाली व्यक्तींचा समावेश होता. तरीही सरकारने त्यांचे काहीही न ऐकता कारवाई केलेली आहे. युनूस यांनीही त्यांच्यावरील सारे आरोप फेटाळले असून शिक्षेला आव्हान देण्याचे स्पष्ट केले आहे. हसीना यांच्या मनमानीचे हे ठळक उदाहरण असल्याचे विरोधक सांगतात.
-धनंजय बिजले