न्यायालयात निकाल मिळतो; परंतु न्याय मिळेलच याची शाश्वती नाही, अशी खंतवजा तक्रार अनेकदा आपण ऐकतो. न्यायालयात एकदा का प्रकरण गेले की, निकाल हमखास रेंगाळतोच, असा तर हुकमी अनुभव कित्येकांना येत असल्याचे आपण आजूबाजूला बघत असतो.
न्यायदेवता निष्ठूर असते, असाही शेरा कानावर पडत असतोच. परंतु, एखाद्या व्यक्तीने मनावर घेतलेच तर किचकट आणि क्लिष्ट गणल्या जाणाऱ्या न्याययंत्रणेत बदल घडवून आणता येतो आणि तोही पुन्हा आपल्या मूल्यांशी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता.
असा आश्वासक दिलासा, भारताचे माजी सरन्यायाधीश दिवंगत अझीज मुशब्बर अहमदी यांचे प्रस्तुत चरित्र आपल्याला देते. चरित्रलेखक असणाऱ्या पत्रकर्मी इन्सिया वहानवटी यांचे न्या. अहमदी हे आजोबा. असे असले तरी नातीने लडिवाळपणे गायलेले आजोबांचे गुणगान, असे मात्र या ग्रंथाचे स्वरूप अजिबात नाही. अहमदाबाद येथे १९५४ मध्ये वकिलीचा श्रीगणेशा करणाऱ्या अहमदी यांच्या न्यायिक कारकिर्दीचा सर्वोच्च बिंदू अवतरला तो २५ ऑक्टोबर १९९४ रोजी भारताचे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी सूत्रे हाती घेण्याने. १९९४ ते १९९७ अशी तीन वर्षे न्या. अहमदी यांनी देशाच्या सरन्यायाधीशाचे पद भूषविले.
न्या. अहमदी यांचे वडीलदेखील गुजरातेतील न्यायव्यवस्थेत न्यायाधीश होते. ठराविक कालावधीनंतर निरनिराळ्या ठिकाणी त्यांच्या नियुक्त्या होण्याने बदली अटळ असल्याने न्या. अहमदी यांचे शालेय शिक्षण स्थिरपणे व सुविहितपणे होणे अशक्यच होते. परंतु, त्या निमित्ताने बालवयातील न्या. अहमदी यांच्या संवेदनशील उमलत्या मनावर तत्कालीन समाजजीवनातील भल्याबुऱ्या प्रवृत्तींचे ठसे उमटत राहिले. समाजव्यवहारांतील जातिधर्माधारित भेदभाव, त्याआधारे प्रसंगी उफाळणारी हिंसा, असहाय्य पीडितांची घुसमट यांच्या, वयाच्या त्या टप्प्यावर टिपलेल्या अनुभवांमुळे, समाजातील दीनदुबळे, दमनशील प्रवृत्तींचे बळी झालेले शोषित घटक यांच्याबद्दल न्या. अहमदी यांच्या मनात असीम कळकळ स्थिरपद झाली.
पुढ्यात आलेल्या प्रकरणांचा निवाडा न्यायासनावरून करतेवेळी संबधित प्रकरणांशी निगडित असणाऱ्या मानवी पैलूंचे सदय भान, त्यांमुळे, न्या. अहमदी यांच्या ठायी कसे निरंतर जागे असे, याचे किस्से लेखिकेने अतिशय रोचक शैलीमध्ये नमूद केलेले आहेत. परंतु, न्या. अहमदी यांच्या त्या सहृदयतेने त्यांच्या न्यायनिष्ठेवर कधीही मात कशी केली नाही, याचेही दाखले लेखिकेने नोंदविलेले आहेत. किंबहुना, बंडखोर व लढाऊ वृत्ती जन्मजातच घेऊन आलेल्या न्या. अहमदी यांचा नि:पक्ष व नि:स्पृह बाणा, अगदी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत असतानादेखील, काही निवाडापत्रांना त्यांनी जोडलेल्या भिन्न मतपत्रिकेद्वारे कसा प्रगट होत राहिला, याचीही उदाहरणे लेखिकेने इथे दिलेली आहेत.
वकिली व्यवसायात अगदी प्रारंभीच आलेल्या एका विपरित अनुभवामुळे फौजदारी प्रकरणे हाताळायची नाहीत, असा निर्णय घेतलेल्या न्या. अहमदी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेकविध संवेदनशील प्रकरणे हाताळली. किंबहुना, १४ डिसेंबर १९८८ रोजी सर्वोच्च न्यायालयात अहमदी यांची नियुक्ती झाल्यानंतरचा सगळाच काळ देशाचे राजकारण आणि समाजकारण पुरता ढवळून काढणारा शाबीत झाला.
राजकीय अस्थिरता, मंडल आयोगाच्या तामिलीनंतर उसळलेला जनक्षोभ, बाबरी मशिदीचे पतन झाल्यानंतरची धुमश्चक्री, अयोध्या प्रकरण, काही राज्यांतील लोकनियुक्त सरकारांची बडतर्फी... यांपायी निर्माण झालेले किचकट कायदेशीर गुंते न्या. अहमदी यांच्या पुढ्यात येत राहिले. त्या दरम्यानचे सगळे अशांत वास्तव, न्यायालयीन लढाईचे बारकावे, खंडपीठावरील अन्य न्यायाधीश व न्या. अहमदी यांनी त्या त्या प्रकरणांत घेतलेल्या भूमिकांमधील फरकाचे सूक्ष्म बारकावे लेखिकेने नजाकतीने सादर केल्याने ग्रंथातील विवरण सजग वाचनाची मागणी करणारे आहे.
निष्णात न्यायाधीश हा उत्तम न्यायप्रशासकही असणे, ही बाब तशी दुर्मीळच. न्या. अहमदी यांच्या व्यक्तिमत्वात निर्भय, ताठ कण्याचा न्यायाधीश आणि कुशल न्यायप्रशासक यांचा समसमा संयोग असल्यामुळेच राज्याच्या विधिविभागाचे सचिव या नात्याने गुजरातेतील विधिविभागाचा तोंडवळा अंतर्बाह्य पालटणे आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायालयीन कामकाजाचे संगणकीकरण वेगाने घडवून आणणे त्यांना शक्य बनले. सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतेवेळी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या दाव्यांची संख्या एक लाख २० हजारांवरून, निवृत्तीच्या वेळी १८ हजारांपर्यंत घटविण्याचे न्या.अहमदी यांचे कर्तृत्व त्यांच्या न्यायप्रशासनिक कौशल्याची झळाळती खूण ठरावी.
फिअरलेस जज : द लाइफ ॲन्ड टाइम्स ऑफ
ए.एम.अहमदी,
लेखिका : इन्सिया वहानवटी,
प्रकाशक : जगरनॉट बुक्स, नवी दिल्ली २०२४