'इस्रो'च्या मोहिमांचे दमदार शतक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
  प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

प्रारंभी मर्यादित निधी आणि सुविधांचा अभाव असला तरी नाउमेद न होता 'इस्रो'ने दमदार वाटचाल केली. देशाचे शंभरावे मिशन या संस्थेने नुकतेच यशस्वीपणे पूर्ण केले आहे. त्यासाठी ४६ वर्षांचा कालखंड लागला आहे. या यशोगाथेची प्रेरक नोंद. 

भारतातील नावाजलेल्या संस्थांमध्ये 'इस्रो'चे नाव अग्रगण्य आहे. (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन-भारतीय अवकाश संशोधन संस्था) 'मानवी सेवेसाठी अंतराळतंत्रज्ञान' हे ध्येय असलेल्या 'इस्रो'ने शास्त्रज्ञ विक्रम साराभाईंच्या नेतृत्वाखाली १५ ऑगस्ट १९६९ रोजी वाटचाल सुरु केली. यशाचे छोटे-मोठे पल्ले गाठत इस्रोने २९ जानेवारी २०२५ रोजी शंभरावी ऐतिहासिक मोहीम यशस्वी करून मैलाचा एक दगड पार केला आहे. या मोहिमेत श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून जीएसएलव्ही-एफ १५ रॉकेटमार्फत एनव्हीएस-२ हा उपग्रह त्याच्या नियोजित कक्षेत २० मिनिटांनी अचूकपणे प्रस्थापित केला.

जीएसएलव्ही (जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लॉचिंग व्हेईकल) चे हे १७ वे उड्डाण होते. त्यात क्रायोजेनिक इंजिनचा वापर केला होता. भारताला परदेशातून क्रायोजेनिक इंजिन मिळत नाही म्हणून पुढील 'उंची' गाठता येणार नाही, हे लक्षात आले. कुणा शायराने म्हटलेय "अभी साझे दिल में तराने बहुत है, अभी जिंदगी के बहाने बहुत है, दरे गैर पर भीक मांगो न फंकी; जब अपने ही घर में खजाने बहुत है!" इस्रोने स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन तयार करण्याची जबाबदारी तरुण संशोधकांवर सोपवली. कालापव्यय झाला, पण आपल्या तंत्रज्ञांची सांधिकवृत्ती आणि गुणवत्ता सिद्ध झाली! 

अतिउंचीवरील कक्षेत अचूकपणे उपग्रह सोडण्यासाठी क्रायोजेनिक इंजिनखेरीज पर्याय नसतो. कारण घनइंधनाचे ज्वलन होताना त्यावर नियंत्रण साधणे कठीण असते. द्रवरूप इंधनाचे ज्वलन होताना त्यावर हुकमी नियंत्रण साधता येते. क्रायोजेनिक इंजिनमध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन वायू अतिशीत द्रवरूपात असतात. जिओसिंक्रोनस, किंवा भू-संलग्न (भूस्थिर) उपग्रह ३६ हजार कि.मी. उंचीवरून पृथ्वीप्रदक्षिणा करतात. त्यामुळे एनव्हीएस-२ हा उपग्रह अढळपद मिळाल्यासारखा सतत आपल्या देशावर राहून सेवा देईल. 

भारताचे दिशादर्शन करणाऱ्या अवकाशातील उपग्रहाचे समूह म्हणजे एक 'नक्षत्र'च असल्याने त्याला 'एनएव्हीआयसी', म्हणजे नॅव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टिलेशन म्हणतात. भारताचा संपूर्ण स्वतःसाठी अंतरिक्षात पाठवलेल्सी दिशादर्शक उपग्रहांपैकी एनव्हीएस-२ हा एक आहे. कारगिल युद्धाच्यावेळी ऐनवेळी भारताला ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम' (जीपीएस) परदेशाकडून उपलब्ध झाली नव्हती. भारताने याबाबतीत आत्मनिर्भर व्हायचे ठरवले. मग भारताने नॅव्हिगेशनसाठी उपग्रहांवर आधारलेली आपली स्वतंत्र स्थितिदर्शक नाविक (नावाडी) यंत्रणा घडवलेली आहे. वाहनाचा वेग आणि ते कोणत्या क्षणी निश्चित कोठे आहे, हे यामुळे समजते. याला स्टैंडर्ड पोझिशनिंग सर्व्हिस (एसपीएस) म्हटलेलं आहे. वेळ अचूकपणे नोंदली जाते, कारण ते घड्याळ रुविडियम अणूच्या स्पंदनावर आधारलेले, 'अण्वीय' घड्याळ आहे! त्यामुळे ते एक अब्जांश सेकंदाएवढीदेखील चूक करत नाही. 

'नाविक' उपग्रह भारत आणि सभोवतालचा सुमारे दीड हजार किलोमीटरचा भाग निरीक्षण करून नॅव्हिगेशन सेवा पुरवू शकतो. या विभागीय सेवेचा विस्तार भावीकाळात वाढवता येईल. या सेवेचा उपयोग लोकांना व लष्कराच्या हालचालींसाठी पण होईल. सध्या सात उपग्रह सामूहिक रीतीने हे कार्य करीत आहेत. अजून चार उपग्रहांची भर पडल्यावर गरजूंना दर्जेदार आणि परिपूर्ण सेवा पुरवता येईल. हे उपग्रह आयआरएनएसएस, म्हणजे 'इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम' म्हणून ओळखले जातात. जगात फक्त अमेरिका, रशिया, चीन आणि युरोपियन महासंघ यांच्याकडे उपग्रहांवर आधारलेली (जीपीएससारखी) पद्धती उपयोगात आणलेली आहे. यात भारताचा पाचवा क्रमांक लागतो. साहजिकच नॅव्हिगेशनच्या बाबतीत भारत अन्य देशांवर (फारसा) अवलंबून नाही. 

स्थलीय, हवाई आणि सागरी नॅव्हिगेशनखेरीज 'नाविक' उपग्रह कृषीविषयक अंदाज, भौगोलिक सर्वेक्षण, उपग्रहांची कक्षा तपासणे, फ्लीट मॅनेजमेंट, मोबाईलमधील स्थानाधारित सेवा, इंटरनेट सेवा आणि आणीबाणीची वेळ आली तरीही 'नाविक' सेवा देईल. इस्रोची उभारणी करताना अनेक दिग्गज भारतीय अवकाशशास्त्रज्ञांचे योगदान मिळाले होते. सुरुवातीला अग्निबाणाचे भाग अनेकांनी बैलगाडीतून किंवा सायकलला बांधून खाचखळगे पडलेल्या कच्च्या रस्त्यावरून केंद्राकडे पोहोचते केले होते. प्रारंभी मर्यादित निधी आणि सुविधांचा अभाव असला तरी नाउमेद न होता 'इस्रो'ने देशाचे शंभरावे मिशन यशस्वीपणे पूर्ण केले आहे. 

त्यासाठी ४६ वर्षांचा कालखंड लागला आहे. तथापि पुढील १०० मोहिमांसाठी फक्त पाच वर्षांचा कालखंड पुरेसा आहे, असा विश्वास नवनियुक्त इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन् यांनी व्यक्त केला. इस्त्रोच्या ९९ क्रमांकाच्या मोहिमेमध्ये टार्गेट आणि चेसर या दोन उपग्रहांची जोडणी ('डॉकिंग') करण्याची 'स्पेडेक्स' मोहीम १६ जानेवारी २०२५ रोजी यशस्वी झाली. ती जास्त आव्हानात्मक होती. डॉकिंगच्या प्रयोगामध्ये अंतरिक्षात भ्रमण करणाऱ्या एखाद्या यानामध्ये पाणी, ऑक्सिजन, औषधे, ऊर्जा आदी वस्तूंचा पुरवठा करणे शक्य होते. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाची बांधणी करताना सातत्याने डॉकिंगचे प्रयोग करावे लागले. इस्त्रोला स्वतःचे 'भारतीय अंतरिक्षस्थानक' स्थापन करताना डॉकिंगचे प्रयोग उपयोगी पडणार आहेत. 

अंतराळातील बाजारपेठेत उपग्रहांचे प्रक्षेपण करून देणे, हा एक 'रॉकेटिंग बिझनेस' झाला आहे. कारण उपग्रह सेवा ही भावीकाळामधील दुभती गाय ठरणार आहे. इस्रोने पीएसएलव्ही-३७च्या एकाच उड्डाणात १०४ उपग्रह त्यांच्या नियोजित कक्षेत १७ फेब्रुवारी २०१७ रोजी सोडून जागतिक विक्रम केला होता. त्यात भारताचे फक्त तीन उपग्रह होते. बाकी परदेशी होते. साठ देशांचे ४३३ उपग्रह भारताने अंतराळातील नियोजित कक्षेत रास्त किमतीत यशस्वी रीतीने सोडून त्यांचा विश्वास संपादन केलाय. त्यात ब्रिटनचे दोन उपग्रह सर्वात जड म्हणजे ५४ हजार ते ५७ हजार किलोग्रॅम वजनाचे होते.

आंतरग्रहीय मोहीम
इस्रोने पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या नियोजित कक्षेत २४ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळयान यशस्वीपणे पाठवले. या आंतरग्रहीय अंतरिक्षाच्या प्रवासात रिक्षामीटरने जेवढे भाडे होईल तेवढाच खर्च आला! मंगळयानाने मंगळाच्या वातावरणाचे व खनिजद्रव्यांचे संशोधन केले. चांद्रयान-१ चंद्राच्या शंभर किलोमीटर वरील कक्षेत पाठवण्याचा इस्त्रोचा प्रयोग १४ नोव्हेंबर २००८ रोजी यशस्वी झाला. या चांद्रयान-१ वरून एक प्रोब चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ प्रक्षेपित करण्यात आला होता. त्याच्या चारही बाजूंवर भारताचा तिरंगा झेंडा होता. चांद्रयान-२ अखेरच्या क्षणी किरकोळ चुकीमुळे चंद्रावर उतरले नाही, पण या मोहिमेत अंशतः यश मिळाले होते. चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण धृवाजवळ २३ ऑगस्ट २०२३ रोजी अलगद उतरले. चंद्रावर यान उतरवू शकणारा भारत चौथा देश आहे.

 मर्यादित निधी आणि खाचखळग्याग्यांनी भरलेला रस्ता असला तरी तो स्वयंनिर्भरतेचा होता. त्यावरून इस्त्रोने सतत नव्या जोमाने प्रशंसनीय वाटचाल केली आहे. आंतरराष्ट्रीय चढाओढीत अशीच प्रगती होणे जरुरीचे असते. कारण "चांद के दर पर जा पहुंचा है आज जमाना, नए जगत से हम भी नाता जोड चुके है।" यामुळे आगामी काळात नयी उमंगे, नयी तरंगे पाहायला मिळतील. 

- डॉ. अनिल लचके 
(लेखक विज्ञानाचे अभ्यासक आहेत.)

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter