वंचित-एमआयएमच्या शीतयुद्धामुळे मुस्लीम मतांचे विभाजन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 20 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

असे म्हटले जाते की, “तुमचा सर्वात मोठा शत्रू तो असतो जो कधीकाळी तुमचा सर्वात चांगला मित्र होता”. वंचित आणि एमआयएम बद्दल सध्या तेच घडत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकरणात नवा प्रयोग करून खांद्याला खांदा लावून लढणारे हे दोन नैसर्गिक मित्र. पण विधानसभा २०१९ मध्ये या मैत्रित मिठाचा खडा पडला आणि या दोघा पक्षांमध्ये शीत युद्ध सुरू झाले. पर्यायी राजकारण उभे करण्यासाठी स्थापन झालेले आणि २०१९ मध्ये एकत्र आलेले हे दोन पक्ष आता  काही मतदारसंघात एकमेकांचे प्रमुख शिलेदार पाडण्यासाठी निवडणूक लढत असल्याचे दिसून येते. 

वंचित आणि कॉंग्रेस मध्ये देखील असेच शीत युद्ध चालू आहे. लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत आणि पूर्वी देखील कॉंग्रेस, अकोला मतदारसंघात मुस्लिम उमेदवार देत आली आहे ज्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचा पराभव होतो. पण जेंव्हा प्रकाश आंबेडकर कॉंग्रेस सोबत निवडणूक लढवतात तेंव्हा मात्र त्यांचा विजय होतो. वंचित आणि कॉंग्रेस मध्ये गठबंधन न झाल्याने दोन्ही पक्ष वेगवेगळे निवडणूक लढतात ज्याचा तोटा हा दोन्ही पक्षांना होत आहे. या शीत युद्धाचा फटका मात्र प्रामुख्याने मुस्लिम राजकीय प्रतिनिधीत्वाला बसत आहे.

महाराष्ट्र विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत वंचित, कॉंग्रेस आणि एमआयएम वेगवेगळे लढल्याने पडलेले मुस्लिम उमेदवार

१) नासिर सिद्दिकी (एमआयएम)  
( औरंगाबाद मध्य मतदारसंघ )
 
प्रदीप जयस्वाल (शिवसेना) ८२२१७
नासिर सिद्दिकी (एमआयएम)   ६८३२५
अमित भुईगल (वंचित)    २७३०२

 

२) फरूख अहमेद (वंचित)

( नांदेड दक्षिण मतदारसंघ )

मोहनराव हंबरडे (कॉंग्रेस)    ४६९४३
फरूख अहमेद (वंचित)    २६७१३
साबेर चाउस (एमआयएम)    २०१२२

 

३) फेरोज लाला (एमआयएम)

( नांदेड उत्तर मतदारसंघ )
 
बालाजी कल्याणकर (शिवसेना)  ६२८८४
फेरोज लाला (एमआयएम)   ४१८९२
मुकुंदराव चावरे (वंचित)  २६५६९

४) आरिफ नसीम खान (कॉंग्रेस)
( चांदिवली मतदारसंघ )
 
दिलीप लांडे (शिवसेना)  ८५८७९
आरीफ नसीम खान (कॉंग्रेस) ८५४७० 
अब्दुल हसन खान (वंचित)  ८८७६

५) साजिद खान (कॉंग्रेस)
( अकोला मतदारसंघ )
 

 

गोवर्धन शर्मा   (भाजपा)   ७३२६२
साजिद खान    (कॉंग्रेस) ७०६६९
मदन भारगड   (वंचित) २०६८७

वंचित – एमआयएम शितयुद्ध
विधानसभा २०१९ मध्ये सुरू झालेले हे शित युद्ध लोकसभा २०२४ आणि विधानसभा २०२४ च्या निवडणुकीमध्ये देखील सुरू आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एमआयएम चे इम्तियाज जलील  यांचा पराभव झाला तिथे वंचितने पक्षाची ताकद नसताना विरोधात मुस्लिम उमेदवार दिला होता. मत विभाजनाचा फटका तिथे इम्तियाज जलील यांना बसला. अकोला लोकसभेत वंचित आणि कॉंग्रेस मध्ये मत विभाजण होऊन प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाला.

या शीत युद्धाचा तिसरा सीजन हा विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये या पक्षांकडून जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत पाहायला मिळत आहे. विधानसभा २०१९ प्रमाणेच विधानसभा २०२४ मध्ये देखील एकमेकांचे शिलेदार पाडण्याचा जणू काही चंग या पक्षांनी बांधला आहे. मतदारसंघ निहाय हे शीत युद्ध कसे लढले जात आहे त्यात मुस्लिम राजकीय प्रतिनिधीत्वाचा कसा बळी जाऊ शकतो हे आपण सविस्तर  पाहू.

औरंगाबाद पूर्व मतदारसंघ :
औरंगाबाद हा एमआयएम चा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात उत्कंठा वाढवून शेवटी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची उमेदवारी त्यांच्या पक्षाने जाहीर केली. वंचितने इथे आधी विकास दांडगे यांना उमेदवारी दिली होती. पण इम्तियाज जलील यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांनी तातडीने उमेदवार बदलून अफसर खान हा मुस्लिम उमेदवार दिला. लोकसभेत देखील हे दोघे समोरासमोर होते आणि इम्तियाज जलील यांना त्याचा फटका बसला होता.
  
नांदेड दक्षिण मतदारसंघ : 
एमआयएम चा प्रमुख शिलेदार पाडण्यासाठी वंचित कडून फिल्डिंग लावली गेल्यावर एमआयएम कडून देखील वंचितचे प्रमुख शिलेदार तसेच राज्य प्रवक्ता फरूख अहमद यांच्याविरोधात नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सय्यद मोईन यांना उमेदवारी देण्यात आली. फरूख अहमद यांनी या मतदारसंघात मागील पाच वर्षांच्या काळात प्रचंड कामे केलेली आहेत.

भायखळा मतदारसंघ : 
मुस्लिम बहुल असलेल्या या मतदारसंघात २०१४ मध्ये एमआयएम चे राष्ट्रीय प्रवक्ता  वरिस पठाण हे विजयी झाले होते. २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. यावेळेस पक्षाने त्यांना भिवंडी पश्चिम मधून उमेदवारी दिली आहे. तर पूर्व आमदार फय्याज खान हे भायखळा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. वंचितने देखील या मतदारसंघातून फहाद खान या मुस्लिम उमेदवाराला पक्षाची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात मत विभाजनाचा धोका आहे.

औरंगाबाद मध्य मतदारसंघ :   
इम्तियाज जलील यांनी २०१४ ते २०१९ मध्ये या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. लोकसभेतील पराभवानंतर ते पुन्हा याच मतदारसंघातून निवडणूक लढवतील या आशंकेने वंचितने येथून इम्तियाज जलील यांचे पूर्व सहकारी आणि वर्तमानतील वैरी जावेद कुरेशी यांना उमेदवारी दिली. म्हणून इम्तियाज जलील हा मतदारसंघ सोडून औरंगाबाद पूर्व मतदारसंघात गेले. एमआयएम कडून नासिर सिद्दिकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात देखील मत विभाजणीचा धोका आहे.

वंचित – कॉंग्रेस  शितयुद्ध

अकोला पश्चिम मतदारसंघ : 
या मतदारसंघात कॉंग्रेस ने साजिद खान यांना मागील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती आणि त्यात त्यांचा केवळ २५९३ मतांनी निसटता पराभव झाला होता. यावेळेस देखील कॉंग्रेस कडून त्यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. वंचितने ऐन वेळी कॉंग्रेसमधून बंडखोरी केलेले झिशन हूसैन यांना आयात करून उमेदवारी दिली आहे. इथे देखील आता मत विभाजनाचा धोका आहे.

२०१९ च्या निवडणुकीत चांदिवली या कॉंग्रेसच्या आरिफ नसीम खान यांचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघातून वंचितने मुस्लिम उमेदवार दिला होता. आरिफ नसीम खान यांचा ४०९ मतांनी निसटता पराभव झाला होता. यावेळी वंचितने इथे मुस्लिम उमेदवार दिलेला नाही त्यमुळे मत विभाजन टळेल.  

एमआयएम- समाजवादी  शितयुद्ध
२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत एमआयएम आणि सपाची छुपी युती झाली होती. दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार दिला नव्हता. परिणामी समाजवादीचे राईस शेख हे भिवंडी पूर्व मतदार संघातून निवडून आले होते. पण मागच्या ५ वर्षांमध्ये पुला खालून बरेचसे पाणी वाहून गेले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये दोघांनी एकमेकांवर भरपूर टीकास्त्र सोडले होते. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सपा हा मविआ चा घटक पक्ष आहे. त्यामुळे काही मतदारसंघांमध्ये हे दोन्ही पक्ष सामोरा समोर आले आहेत. 

मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघ :
सपा महाराष्ट्र पदेशाध्यक्ष अबु आझमी यांचा हा बालेकिल्ला आहे. त्यांच्याविरोधात एमआयएम ने अतिक अहेमद खान यांना उमेदवारी दिली आहे. तसेच राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडून नवाब मलीक देखील या मतदार संघातून रिंगणात आहेत. त्यामुळे मत विभाजनाचा मोठा फटका अबु आझमी यांना बसू शकतो.

भिवंडी पश्चिम मतदारसंघ :
एमआयएम चे राष्ट्रीय प्रवक्ता वरिस पठान हे आपला भायखळा मतदारसंघ सोडून भिवंडी पश्चिम मतदारसंघातून यावेळेस आपले नशीब आजमावत आहेत. शेवटच्या क्षणाला त्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. सपा कडून देखील शेवटच्या क्षणाला रियाज आझमी यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या मतदारसंघात देखील मत विभाजनाचा धोका निर्माण झाला आहे.

धुळे शहर मतदारसंघ :
एमआयएम चे फारूक शाह हे २०१९ विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून विजयी झाले होते. पण या वेळेस सपा ने येथून इर्षाद जहागीरदार यांना उमेदवारी दिल्याने फारूक शाह यांची या वेळेस जिंकण्याची वाट कठीण झाली आहे.

“महाराष्ट्रातील या सर्व लहान पक्षांच्या एकमेकांवरील कुरघोडीच्या राजकारणामुळे जरी या राजकीय पक्षांनी उमेदवार देताना  समजूतदारपणा दाखवला नसला तरी मतदारांनी मात्र  उमेदवाराची निवड करतेवेळेस आपल्या विवेकबुद्धीचा वापर करून  समजूतदारपणा दाखवून एका योग्य पर्यायाची  निवड करावी आणि मत विभाजन होणार नाही याची दक्षता घ्यावी.”  
 
- शहेबाज म. फरूक मनियार 
 
(सीनियर रिसर्च स्कॉलर, मुंबई विद्यापीठ) 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp 
Awaz Marathi Facebook 

Awaz Marathi Twitter