काश्मिरातील शिखांच्या स्थितीवर प्रकाश टाकणारे पुस्तक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 9 h ago
'Those who stayed'
'Those who stayed'

 

काश्मीरमधील शीख समाजाच्या स्थितीविषयी भूपिंदरसिंग बाली या शिक्षकाने पुस्तक लिहिले आहे. तेथील ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय परीघाचा लेखकाने वेध घेतला आहे. शिखांनी परिस्थितीला दिलेले तोंड, त्यांचे झगडे, परिस्थितीशी जुळवून घेत आनंदी राहण्याची त्यांची वृत्ती या गुणांवर त्यांनी प्रकाश टाकला आहे.

या लिखाणाला अर्थातच अनुभवाची जोड आहे. काश्मीरमध्येच राहण्याचा निश्चय केलेल्या शीख बांधवांच्या मुलाखती लेखकाने घेतल्या आहेत. त्यातूनही शीख समाजाची कैफियत समोर येते. दहशतवाद्यांचे संकट असताना, हिंसेला तोंड द्यावे लागलेले असूनही आपली जन्मभूमी सोडून जाण्याचा त्यांचा निश्चय आणि जन्मभूमी सोडून जायचे की नाही, या विचारांच्या झगड्याला त्यांना कसे सामोरे जावे लागले हे आपल्याला कळते. 
 
आजवर या गोष्टी दुर्लक्षितच होत्या. राज्याचे माहिती आयुक्त आणि लेखक खुशवंतसिंग म्हणतात की, तेथे राहणाऱ्यांव्यतिरिक्त त्यांची काय अवस्था आहे, हे कुणालाच ठाऊक नव्हते. काश्मिरी पंडितांच्या मोठ्या संख्येने झालेल्या स्थलांतराबाबत बरेच काही लिहून आले आहे, त्यावर चित्रपटही आले; पण तेथील शिखांच्या दुर्दशेकडे दुर्लक्षच झाले. पण त्यांचे वास्तव सर्वांपुढे आणण्याची जबाबदारी घेऊन लेखकाने त्याबाबत लिहिले आहे. 

केवळ शीख असल्यामुळे एका शिक्षकाची ८ ऑक्टोबर २०२१ या दिवशी हत्या झाली, त्यामुळेच हे पुस्तक लिहावे लागले, असे लेखक सुरुवातीलाच सांगतो. सध्याच्या घटनांचे मूळ ऐतिहासिक घटनांत कसे आहे, याचा शोध घेत लेखक १९४७ मध्ये झालेल्या फाळणीनंतरचे स्थलांतर आणि हिंसाचार याचा मागोवा घेतो. टोळीवाल्यांच्या आक्रमणामुळे महाराजा हरिसिंग यांना काश्मीर भारतात सामील होण्यास मान्यता द्यावी लागली. त्यानंतरचा काश्मीरसाठीच्या दीर्घकाळ चाललेल्या भारत- पाकिस्तान झगड्याचे येथील जनतेवर, विशेषतः शिखांवर झालेले परिणाम याचे सविस्तर वर्णनही आपल्याला वाचायला मिळते. 

१९८९मधील घुसखोरीचे भयानक परिणाम, त्यानंतर झालेल्या उलथापालथीत ४८ हजार लोकांना प्राण गमवावे लागले, तेव्हापासून या भागात कायमची अस्थिरता कशी आहे, हे कळते. मुस्लिम बहुसंख्येने असलेल्या भागात अत्यल्प असलेल्या आपल्या जमातीला, कशा झळा बसतात याचे वर्णन बाली करतात. शिखांच्या दयनीयतेचे काहींचे वैयक्तिक अनुभव, त्यांच्यापुढील अवघड आव्हाने यातून त्यांची दुर्दशा चित्रित केली आहे. त्यासाठी लेखकाने छत्तीससिंघपूरा येथील कत्तलीत ३५ शीख ओळख न पटलेल्या बंदूकधाऱ्यांकडून मारले गेले, त्या घटनेबद्दल सांगितले आहे. त्यावरून तेथील जिणे या लोकांसाठी किती कठीण आहे, हे कळते. येथे ऐतिहासिक काळापासून मुळे रुजलेली असूनही शीख समाजाच्या भवितव्याची अनिश्चितता बालींना अस्वस्थ करते. त्या अस्वस्थतेचे प्रतिबिंब पुस्तकात पडलेले आहे. 

आपल्याला येथे परके समजले जाते, या जाणीवेची बोच त्यांना सतत जाणवतते. परंतु १९७०-८० या दशकांत जन्मलेल्यांची परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी अगदी भिन्न आहे. त्यांचे जीवन बंद आणि संचारबंदी यांनी व्यापले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायमस्वरुपी आघात झाला आहे. त्याचे दुःख त्यांना सतत छळत असते, नंतरच्या दशकात जन्मलेल्यांची अवस्था आणखी वेगळी आहे. तेव्हां काश्मीरला लष्कराने घेरलेले होते. पाहू तेथे लष्करच दृष्टीस पडायचे. परिणामी या मुलांना शांततेची बोलणी परिकथेप्रमाणे वाटतात. 

या पुस्तकात १४९० पासून आजतागायतचा काश्मीरमधील शिखांचा इतिहास आहे. कुलबीर सिंग बादल यांनी प्रबंधात म्हटले आहे की, त्यावेळी गुरुनानक यांनी प्रथमच काश्मीरला भेट दिली. गुरु अर्जुनदेवजी यांनीही शीख धर्म तेथील लोकांना शिकवण्यासाठी धर्मप्रचारक पाठवले. गुरु गोविंद सिंग यांनी धर्माचे शिक्षण देण्याकरता प्रचारक पाठवले. महाराजा रणजीत सिंग यांच्या काळात अनेक शीख काश्मीरमध्ये आले, असा हा दीर्घ इतिहास असला तरी आता शीख आपली ओळख गमावून बसले आहेत. त्यांना ती परत मिळवायची आहे. 

पुस्तकः दोज हू स्टेड : द शीख्स 
ऑफ काश्मीर, लेखक: भूपिंदर सिंग बाली,
प्रकाशक : अमरिल्लिस, (अॅन इंप्रिंट ऑफ मंजुल पब्लिशिंग ऑफिस )
पाने : ३०८, किंमत : ६९९ रुपये.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter