अल्लामा इक़्बाल आणि नेहरू यांच्यातील इस्लामवरील चर्चा विस्ताराने मांडणारे पुस्तक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 9 d ago
 नेहरू : द डिबेट्स् देंट डिफाइन्ड इंडिया
नेहरू : द डिबेट्स् देंट डिफाइन्ड इंडिया

 

आशय, विषय, विषयाची हाताळणी आणि रचना अशा विविध बाबतींत वैशिष्ट्यपूर्ण असणारे काही ग्रंथ एक वेगळ्याच प्रकारचा वाचनानंद देऊन जातात. त्रिपुरदमनसिंग आणि अदील हुसेन या लेखकद्वयाच्या प्रस्तुत अक्षरश्रमांची गणना ग्रंथांच्या त्याच वर्गात होते. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याभोवती जरी या ग्रंथाची गुंफण झाली असली तरी 'नेहरू' हा काही या ग्रंथाचा विषय नाही.
 
'स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावरील भारत' आणि 'नवस्वतंत्र भारत' या देशाच्या वाटचालीदरम्यानच्या दोन कळीच्या पर्वादरम्यान जी चार प्रमुख चर्चाविश्वे तत्कालीन समाजमानसात गाजत-गर्जत राहिली, ती इथे केंद्रस्थानी आहेत. सार्वजनिक जीवनामध्ये 'धर्म' या संस्थेची भूमिका नेमकी काय असावी, हिंदू आणि मुस्लिम संबंध, पाकिस्तान तसेच चीन या शेजारी देशांसंदर्भातील भारताचे धोरण आणि स्वतंत्र भारतातील पहिली घटनादुरुस्ती व तिच्यासंदर्भातील पंडित नेहरूकृत समर्थन ही ती चार चर्चाविश्वे.
 
तपशीलाच्या थोड्याफार फरकानिशी हीच चार चर्चाविश्वे आजही प्रसंगोपात्त पृष्ठभागावर उसळी घेत राहतात, या वास्तवाचा अनुभव आपण सगळेच घेत असतो व आहोतही. त्यांमुळे, गतकालीन चर्चाविश्वांच्या समकालीनत्वाचे दर्शन सूचित करणारा दस्तऐवज म्हणून या ग्रंथाचे एक निराळेच संदर्भमूल्य आहे. या चारही चर्चाविश्वांत नेहरू हेच समान चार्चिक असल्यामुळे त्यांच्या चरित्राचा साधनग्रंथ असेदेखील आणखी एक परिमाण त्याला लाभले आहे.

या चारही चर्चाविश्वांचे तत्कालीन सामाजिक- राजकीय पर्यावरण व महत्त्व विशद करणारे प्रास्ताविक कथन आणि त्यानंतर त्या चर्चाविश्वातील महत्वाच्या चार्चिकांची भाषणे, लेखन व पत्रव्यवहार यांची उद्धृते या क्रमाने ग्रंथाचे अंतरंग उलगडत नेलेले आहे. मुस्लिम समाजाच्या एकजुटीची धार्मिक मीमांसा आणि एकंदरीनेच धर्माचे सार्वजनिक जीवनातील स्थान या संदर्भातील चर्चाविश्व या ग्रंथात उमलते, ते कवी मोहम्मद इक्बाल आणि नेहरू यांच्यादरम्यानच्या वैचारिक देवाणघेवाणीद्वारे. तर, स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर हिंदू आणि मुस्लिमांच्या संबंधांबांबत ठिणग्यामय चर्चाविश्व निपजले ते नेहरू आणि मोहम्मदअली जीना यांच्यादरम्यान. काळाच्या संदर्भात ही दोन्ही चर्चाविश्वे स्वातंत्र्यपूर्व पर्वादरम्यानची ठरतात.
 
ग्रंथातील उर्वरित दोन चर्चाविश्वे उभरली ती स्वातंत्र्यानंतरच्या उण्यापु- ऱ्या पहिल्या अर्धदशकातच. नेहरू यांच्या; विशेषतः चीनविषयक राजनैतिक भूमिकेबाबत तत्कालीन धोरणविश्वात तसेच खुद्द काँग्रेस पक्षातही नांदणाऱ्या असमाधानाचे रोखठोक ध्वनी उमटलेले दिसतात ते त्यांबाबत पंडितजी आणि सरदार पटेल यांच्यादरम्यानच्या खणखणीत पत्रापत्रीमध्ये. जवळपास चार वर्षांच्या सघन व प्रगल्भ विचारविनिमयांती साकारलेल्या भारतीय राज्यघटनेमध्ये तिच्या स्वीकारानंतर अवघ्या सव्वा वर्षातच कळीच्या तीन दुरुस्त्या करण्याबाबत पं. नेहरूंनी संसदेमध्ये मांडलेल्या विधेयकादरम्यान ते आणि हिंदू महासभेचे अग्रणी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्यादरम्यान झडलेले प्रगल्भ आणि तितकेच टोकदार मंथन हा आहे चौथ्या चर्चाविश्वाचा गाभा.

पं. नेहरू, मोहम्मद इक्बाल, जीना आणि शामाप्रसाद मुखर्जी या चारही उत्तुंग व्यक्तिमत्वांच्या व्यासंगाचे, वादपटुत्वाचे आणि समृद्ध विचारविश्वाचे मनोज्ञ दर्शन घडविणारे असेच या ग्रंथाचे अंतरंग आहे. इथला सगळ्यांत लोभसवाणा आणि म्हणूनच मनावर बिंबणारा आविष्कार म्हणजे या चारही महनीयांच्या भाषेचे सौष्ठव आणि व्यक्तिमत्वातील शालीनता. त्या भाषावैभवाला लाभलेले त्यांच्या चिंतनशीलतेचे अस्तरदेखील तितकेच वेधक आहे. तसे बघितले तर, सरदार पटेल हे स्वपक्षातील तर बॅरिस्टर जीना आणि डॉ. शामाप्रसाद मुखर्जी हे नेहरू यांचे वेगळ्या पक्षातील भिन्नविचारी तुल्यबळ लोकाग्रणी. या तिघांशी पंडितजींचे असणारे वैचारिक मतभेददेखील विलक्षण संवेदनशील आणि तितकेच तीव्र व मूलभूत. असे असूनही परस्परांच्या भूमिकांना छेद देताना अथवा समोरच्याच्या मताचे खंडण करताना कोणाच्याच विचारांचा तोल आणि भाषेचा पोत अणुभरही कोठे ढळलेला आढळत नाही. संसदीय लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आकळलेल्या बुद्धिनिष्ठ राजकीय धुरिणांचे वादविवाददेखील समाजमन कसे व किती उन्नत बनवू शकतात, याचा वस्तुपाठ हा ग्रंथ आपल्या पुढ्यात मांडतो. आजच्या कमालीच्या अवनत राजकीय व्यवस्थेतील पातळीहीन गधेगाळीच्या पार्श्वभूमीवर तर पूर्वकालीन पिढीतील राजकीय धुरिणांचे ते सौजन्य अधिकच झळाळून उठते !

पुस्तक : नेहरू : द डिबेट्स् देंट डिफाइन्ड इंडिया, लेखक : त्रिपुरदमनसिंग आणि अदील हुसेन,
प्रकाशक : हार्पर कॉलिन्स
पाने : २७२, मूल्य : ६९९ रु.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter