जम्मू काश्मीरमध्ये योगदिनाचा उत्साह

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 Months ago
श्रीनगर : नरेंद्र मोदी योग करताना
श्रीनगर : नरेंद्र मोदी योग करताना

 

देशभरात दहावा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला जात आहे. योगदिनानिमित्त विविध ठिकाणी विविध उपक्रम राबवले जात आहेत. श्रीनगरमध्येही योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहून देशवासियांना योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या योग शिबिराला काश्मिरी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेषतः मुस्लीम महिलांनी शिबिराला लक्षणीय सहभाग नोंदवून योगदिन साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांसोबत सेल्फी घेत या संदर्भात ट्विट करत माहिती दिली. 

श्रीनगर येथील कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, “जगातील अनेक देशांमध्ये योग हा दैनंदिन जीवनशैलीचा एक भाग बनत आहे. २०१५ मध्ये तुर्कमेनिस्तानमध्ये योग केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. येथील वैद्यकीय विद्यापीठात योगाचा समावेश करण्यात आला आहे." 

पुढे ते म्हणाले, "सौदी अरेबियाने आपल्या शिक्षण केंद्रात योगाचा समावेश केला आहे. मंगोलियामध्ये अनेक योग शाळा चालवल्या जात आहेत. भारतात यावर्षी फ्रान्समधील १०१ वर्षीय महिला योग शिक्षिकेला पद्मश्री देण्यात आली आहे. ती कधीच भारतात आली नाही. त्यांनी आपले जीवन योगाला समर्पित केले."

शेवटी ते म्हणाले, "२०१५ मध्ये ३५ हजार लोकांनी कर्तव्याच्या मार्गावर एकत्र योग केला. हा एक आंतरराष्ट्रीय विक्रम ठरला. गेल्या वर्षी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात १३० देशांच्या प्रतिनिधींनी एकत्र योगासने केली होती. परदेशातील १० मोठ्या संस्थांनीही योगास मान्यता दिली आहे. जगभरात योगा करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. ध्यान केंद्रित करण्यासाठी योग महत्त्वाचा आहे”. 

योगदिन का साजरा केला जातो ? 
जागतिक पटलावर भारत हा कला, संस्कृती, विज्ञान,अध्यात्म अशा चतुःसुत्रीने बांधलेला देश म्हणून ओळखला जातो. योग विद्येच्या माध्यमातून भारताने आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारताने २०१४मध्ये संयुक्त राष्ट्र संघात आंतरराष्ट्रीय योगदिनाचा प्रस्ताव ठेवला आणि प्रस्तावाला भारतासह १७७ देशांनी पाठिंबा दिला. तेव्हापासून जगभरात २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा केला जातो. मुस्लीम महिलांनी या कार्यक्रमात लक्षणीय सहभाग घेऊन योगदिन साजरा केला. 

यामुळे योग करणे आहे महत्वाचे 
योगामुळे आपण आपले मन, शरीर आणि पूर्ण व्यक्तिमत्व विकसित करू शकतो. तरुणाईला योग विद्या आत्मसात व्हावी यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासात योग विद्येचे धडे देण्यात आले आहेत. एकाग्रतेसाठी आणि शारीरिक  तंदुरुस्तीसाठी योग करणे अत्यंत महत्वाचे असून आपण सर्वांनी योग करण्याचा संकल्प करायला हवा.
 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter