रमजान ईदचा सण तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. ईदनिमित्त प्रत्येक जण सुगंधी अत्तर लावून सणाच्या आनंदाला चार चांद लावत असतो. त्यासाठी बाजारात अनेक अत्तराचे प्रकार दाखल झाले आहेत. उद व अंबर प्रकारातील अत्तरासह नेहमीप्रमाणे जन्नत ए फिरदोसला चांगली मागणी आहे. यावर्षीच्या रमजान ईदसाठी पिंक मुश्क अत्तर पहिल्यांदाच बाजारात आले आहे.
ईदनिमित्त घरोघरी सणाच्या तयारीची एकच धावपळ सुरु आहे. कपडे, सुका मेवा, शेवयांच्या खरेदीसोबत खास अत्तराचे प्रकार खरेदी केले जातात. प्रत्येक कुटुंबात अत्तर कपड्यांना लावणे, हातावर लावले जाते. घरी आलेल्या पाहुण्यांना आवर्जून हातावर अत्तर लावून त्याचे स्वागत केले जाते. त्यामुळे वर्षभरात रमजान ईद, दिवाळी व लग्न सराईसाठी अत्तर बाजार कायम फुललेला असतो.
रमजानमध्ये प्रामुख्याने उद व अंबर प्रकारातील अत्तर खरेदी केली जातात. खूप दर्जेदार अत्तर हे तोळ्याच्या दराने विकले जातात. अन्य अत्तरे हे बाटलीच्या किमतीवर विकली जातात.
अत्तरे व त्यांच्या किमती
उद अत्तर : ८०० ते १२००० रुपये
अंबर : १००० ते ३२००० रुपये
२०० रुपये किमतीचे अत्तराचे प्रकार
प्यार सेव्हन, चार्ली, अंटासिया, जुबेदा, शनाया व अलहद
४०० रुपये किमतीचे प्रकार
मुश्की रिझाली, गोल्डन मस्क, गोल्डन ड्रॉप
अत्तरे नेमकी कुठून येतात
अत्तरांची निर्मिती मुंबई, लखनऊ, सुरत या भागात होते. कनोज भागात देखील अत्तरे तयार होतात. कोणत्याही अत्तराची ओळख केवळ त्याच्या सुगंधामुळे होते. त्यामुळे हा सुगंध कायम अत्तराच्या नावाची ओळख देणारा असतो. त्यामुळे अत्तर निर्मितीची पंरपरा आजही कायम अत्तराचे नाव व सुगंध यांच्याशी नाते सांगणारी असते.
जन्नत ए फिरदोसचे धार्मिक महत्त्व
सर्वसाधारणपणे रमजानमध्ये जन्नत ए फिरदोस अत्तराचे एक वेगळे धार्मिक महत्व आहे. त्यामुळे प्रत्येकजण हे अत्तर अगदी आवर्जून वापरतो. या अत्तराची मागणी भरपूर असली तरी ते खरेदी करता यावे यासाठी त्याची किंमत अगदी ५० रुपयांपासून ३० हजार रुपयांपर्यंत असते.
युनिसेक्स अत्तरे
महिला व पुरुषांना वापरण्याची अत्तरे देखील स्वतंत्रपणे बाजारात आलेली आहेत. त्यामुळे सर्व कुटुंबासाठी एकच अत्तर खरेदी होत नाही. महिलांमध्ये वेगळ्या प्रकारची अत्तरे खरेदी केली जातात. पोयम नावाचे अत्तर महिलांसाठी वापरले जाते. तर जन्नत ए फिरदोस हे पुरुषांकडून अधिक खरेदी केले जाते.
सोलापूर जिल्ह्यातील अल कौसर अत्तर विक्री केंद्राचे सुफियान शेख यांनी बाजारात आलेल्या नवीन अत्तर विषयी माहिती दिली.त्यांनी सांगितले की, यावर्षी रमजान ईदसाठी पहिल्यांदाच अत्तराचा पिंक मुश्क हा प्रकार बाजारात आला आहे. या शिवाय नेहमी भरपूर मागणी असलेल्या अत्तरांची व्हरायटी देखील विक्री होत आहे.