तरुणाईला आकर्षित करणाऱ्या परफ्यूम आणि डिओचे अनेक ब्रॅण्ड उपलब्ध असतानाही रमजान ईदसाठी नवाबी अत्तराची मागणी कायम आहे. ग्राहक अत्तर खरेदीकडे वळू लागल्याने बाजारपेठेत पुन्हा एकदा अत्तराचा सुगंध दरवळतोय. अत्तर विक्रीतून वार्षिक सुमारे ७० लाखांची उलाढाल होत असून अत्तर २०० रुपये ते ४० हजार रुपये तोळा या दराने विकले जात आहे. परिणामी, रमजान ईदनिमित्त अत्तर शौकिनांची बाजारपेठेत वर्दळ पहायला मिळत आहे.
शहराच्या बाजारात नवनवीन परफ्यूम येत आहेत. यामुळे अत्तर व्यवसायावर परिणाम जाणवत होता. दोन वर्षांपूर्वीपर्यंत अत्तराला विशेष मागणी नव्हती. मात्र, गतवर्षापासून आणि रमजानच्या दिवसांत पुन्हा ग्राहकांकडून अत्तरासाठी मागणी वाढू लागली आहे. दिवाळी असो की ईद, ग्राहकांचा अत्तर घेण्याकडे कल वाढला आहे. मनाला मोहवून टाकणाऱ्या सुगंधाची जादू स्वतःचे अस्तित्व टिकवून आहे.
पारंपरिक, अरेबिक व पाश्चात्य या प्रकारातील अत्तर बाजारपेठेत उपलब्ध आहेत. पाश्चात्त्य प्रकारात बॉडी कोरस, कॉपर फ्रेंच असे प्रकार आहेत; तर अरेबिक प्रकारात अरेबियन मस्क, सऊतुल अरब, मुश्क अंबर यांना मागणी आहे. मजमुआ, कस्तुरी, बॉडी कोरस, जोवन मस्क व ब्लू स्टोन या अत्तरांचा ग्राहक कायम आहे.
तरुणाईलाही भुरळ
प्रसिद्ध कंपन्यांचे डिओरंट आणि परफ्युम तरुणवर्गात लोकप्रिय आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत तरुणांनी अत्तर खरेदीला प्राधान्य दिले आहे. मोठ्या कार्यक्रमासाठी अत्तर खरेदी करण्यासाठी तरुणाई गर्दी करीत आहे. कॉपर फ्रेंच, टेन फ्लॉवर्स या अत्तरांना विशेष मागणी आहे, तर ब्लू स्टोन, लोमनी, ग्रीन मस्क सारख्या अत्तरांची तरुणी खरेदी करीत आहेत.
फुलांचा सुगंध असणारी अत्तरे
बाजारात गुलाब, चमेली, केवडा, जुई, अंबर, मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध असणाऱ्या अत्तरांची दोनशे रुपयांपासून ते १ हजार रुपये प्रति तोळ्याने विक्री होत आहे. ‘पोरहान’, ‘अरेबियन स्टाइल’,‘पांढरी’, ‘खस’,‘शाही दरबार’, ‘गुलिस्ता’, ‘पुष्पराज’, ‘चंदन’, ‘कस्तुरी’, ‘हरबाब’, ‘फंटासिया’, ‘ओपन’, ‘मॅक्स’, ‘आर्यन’ अशा अनेक प्रकारच्या अत्तरांचा त्यात समावेश आहे.
अत्तर प्रकार (प्रतितोळा)
ऊद, कस्तुरी, हिना - ५०० रुपये
इतर अत्तर - २०० ते १ हजार रुपये
मुश्करिजाली - २०० ते ६०० रुपयांपर्यंत
हरबाब - २०० ते ८००
शनाया - १४०० रुपये
अत्तर विक्रेते रशीद शेख यांनी बाजारात आलेल्या अत्तराबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले, "बाजारात विविध कंपन्यांच्या परफ्यूममुळे ४० ते ५० टक्के ग्राहक अत्तर खरेदी करत होते; मात्र आता अत्तरांच्या मागणीत वाढ झाली आहे. रमजाननिमित्त अत्तर वापरणारे ग्राहक ९० टक्क्यांपर्यंत वाढले आहे."