भारतातील 'इतक्या' कोटी लोकांना भेडसावतोय लठ्ठपणा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 1 Months ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

वाढते शहरीकरण, बदलती जीवनशैली, आहारातील बदल, ताण, व्यायामाचा अभाव, मोबाईल किंवा तत्सम स्क्रीनवर जास्तीत जास्त वेळ घालवणे, यांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, लठ्ठपणा (स्थूलता) भारतासमोरील नवी समस्या बनत चालली आहे. याबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. 'द लॅन्सेट' या संस्थेने स्थूलतेबाबत अहवालात प्रसिद्ध केला आहे. त्यात सात कोटी लोक लठ्ठपणाचा सामना करत असल्याचे म्हटले आहे. हा अहवाल चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

लॅप्रोस्कोपिक आणि बॅरिए‌ट्रिक तज्ज्ञ डॉ. केदार पाटील म्हणाले, "भारतात सुमारे सात कोटी लोक लठ्ठपणाचा सामना करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे जीवनशैलीतील बदल हे आहे. शहरीकरणामुळे लोकांच्या जीवनशैलीत मोठे बदल झाले आहेत. यात व्यायामाचा अभाव, ऑफिसमध्ये तासन् तास एका जागी बसून काम करणे, मानसिक तणाव आणि अपुरी झोप, आहारातील बदल या कारणांचा समावेश आहे. झोप कमी झाल्यामुळे शरीरातील हार्मोन्सचे असंतुलन होते. ज्यामुळे भूक वाढते आणि शरीरात चरबी साठते. यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, वंध्यत्व, आणि काही प्रकारच्या कर्करोग यासारख्या गंभीर आजारांनाही सामोरे जावे लागू शकते."
लठ्ठपणा म्हणजे आजारांना निमंत्रण पूर्वी लठ्ठपणा म्हणजे सुखवस्तू घरातील व्यक्ती अशी समज होती. मात्र, अधिक वजन हे आजारांचे माहेरघर आहे. यामुळे टाइप टू मधुमेह, उच्च रक्तदाब, व्यंधत्व, सांधेदुखी, मणकेदुखी, मूत्राशयाचा त्रास, इन्फेक्शन, कर्करोग, कोलेस्टोरॉलसारख्या समस्या उद्‌भवू शकतात. वेळेत वजन कमी केल्यास ६० ते ७० टक्के आजार नियंत्रणात येऊ शकतात, असे तज्ज्ञ सांगतात.

लठ्ठपणा वाढण्याची कारणे
  • कोरोना काळात जवळपास सर्वच विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू होते
  • मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झाले
  • बहुतांश मुले मोबाईल फोन, डिजिटल गॅझेट्सच्या आहारी
  • मोबाईलवर गेम खेळताना तासन् तास एका जागेवर बसून राहणे
  • घरात असल्याने प्रमाणापेक्षा जास्त खाणे, जंकफूडचे सेवन करणे
  • अतिउष्मांक असलेला आहार
  • अतिचरबीयुक्त प्रोटीन कमी असलेला आहार
  • व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली
  • वाढलेला स्क्रीनटाइम, झोपेचे बिघडलेले वेळापत्रक
 
दुष्परिणाम
• आत्मविश्वास कमी होणे
• नैराश्य, वंध्यत्व
• मुलींमध्ये मासिक पाळी लवकर सुरू होणे
• मासिक पाळी अनियमितता, रक्तस्राव कमी-अधिक होणे आदी गुंतागुंत
• या कारणांना ४० टक्के गुणसूत्रे व ६० टक्के वातावरण कारणीभूत

या उपाययोजना गरजेच्या
• मुलांनी मैदानी खेळ खेळण्याची गरज
• समतोल आणि सकस आहार
• नियमित व्यायाम
• पूर्ण झोप

बालरोगतज्ज्ञ,शरद आगरखेडकर म्हणतात, "पालकांनी आपल्या मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे.
व्हिडिओ गेम्स, इलेक्ट्रॉनिक गॅझेटसोबत एकाच ठिकाणी बसून खेळण्यापेक्षा, शारीरिक हालचाल
होणारे खेळ खेळल्यास मुलांचे वाढते वजन नियंत्रित येण्यास मदत होईल."