जम्मू-काश्मीरच्या बुधालमधील गूढ आजाराचा शोध सुरूच

Story by  Pradnya Shinde | Published by  Pradnya Shinde • 1 d ago
गूढ आजाराचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य पथक गावात
गूढ आजाराचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य पथक गावात

 

गेल्या दीड महिन्यांपासून राजौरी जिल्ह्यातील बुधाल गावात अज्ञात आजाराने धुमाकूळ घातला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासनाने गावात कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू केली असून, बुधालला प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) घोषित करण्यात आले आहे. गावात प्रवेश करण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व मार्गांवर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. तसेच स्थानिक रहिवाशांसाठी अन्नधान्य आणि पिण्याच्या पाण्याची पुरवठा सुविधा सुरू करण्यात आली आहे.  

गूढ आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक व खाजगी कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. आरोग्य पथक गावात कार्यरत असून, आजाराचे मूळ कारण शोधण्यासाठी उपचार आणि चाचणी सुरू आहेत. आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.  

केंद्रीय तज्ज्ञ समिती तपास करत आहे  
या गूढ मृत्यूंमागील कारणांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय तज्ज्ञ समितीने तपास सुरू केला असून, २०० हून अधिक नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. गावात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची काटेकोर तपासणी केली जात आहे.आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, वैद्यकीय कर्मचारी आणि परिचारिका २४ तास कार्यरत असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. गंभीर रुग्णांना तातडीने राजौरीच्या रुग्णालयात हलवले जात आहे.  

दुसरीकडे, राजौरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) या आजाराचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. मात्र, कर्मचारी संख्या अपुरी असल्याने अडचणी येत आहेत. GMC राजौरीचे प्राचार्य डॉ. ए. एम. भाटिया यांनी आरोग्य सचिवांकडे अतिरिक्त मनुष्यबळ मागितले होते, त्यानुसार पाच बालरोगतज्ज्ञ आणि पाच भूलतज्ज्ञ तैनात करण्यात आले आहेत. तसेच हाय-टेक वैद्यकीय उपकरणे आणि अॅडव्हान्स केअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात आली आहे.  

एअर अॅम्ब्युलन्सची मागणी  
बुधालचे आमदार जावेद इक्बाल यांनी केंद्र सरकारकडे एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून रुग्णांना तातडीने मोठ्या रुग्णालयात हलवता येईल. या गूढ आजाराची लक्षणे ताप, घाम येणे, शरीरातील पाणी कमी होणे आणि शुद्ध हरपणे अशी असल्याचे समोर आले आहे.  

‘ऑर्गनोफॉस्फरस’ विषबाधेमुळे मृत्यू?  
जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील बाधाल गावातील १८ जणांचा मृत्यू हा ऑर्गनोफॉस्फरस विषबाधेमुळे झाला असण्याची शक्यता आहे, अशी शक्यता स्थानिक डॉक्टरांकडून सोमवारी व्यक्त करण्यात आली.अज्ञात आजाराने त्रस्त असलेल्या काही रुग्णांना ‘अॅट्रोपिन’ इंजेक्शन दिले असता सुधारणा दिसून आली, असे डॉक्टरांनी सांगितले. हे इंजेक्शन प्रामुख्याने ऑर्गनोफॉस्फरस विषबाधेच्या उपचारासाठी वापरले जाते.  

"सध्या या रुग्णांचे सर्व तपासणी अहवाल आलेले नाहीत. मात्र, हृदयाचे कार्य सुधारण्यासाठी दोन रुग्णांना ‘अॅट्रोपिन’ इंजेक्शन दिले असता चांगला परिणाम दिसून आला. त्यामुळे हा आजार ऑर्गनोफॉस्फरस विषबाधा किंवा तत्सम काहीतरी असू शकते," असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.  

सध्या या आजाराच्या कारणांचा शोध घेण्यासाठी विविध प्रयोगशाळांमध्ये चाचण्या सुरू आहेत. प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून लवकरच या गूढ मृत्यूंमागील सत्य समोर येण्याची अपेक्षा आहे.